Jump to content

पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/येशू ख्रिस्त

विकिस्रोत कडून




 येशू ख्रिस्त

जोइसवी सन सध्यां चालू आहे तो येशूच्या जन्मापासूनच धरलेला असल्यामुळे येशू केव्हां जन्मला हें निराळें सांगावयास नको. पॅलिस्तान प्रांतांतील गॅलिली परगण्यांत नाझारेथ येथें या थोर धर्मसंस्थापकाचा जन्म झाला. कोणी म्हणतात कीं, नाझारेथच्या नजीक असलेल्या बेथलेम गांवीं तो जन्मला. रोमन शकाच्या ७५० साली ऑगस्टस यानें आपल्या साम्राज्याची खानेसुमारी करविली. तेव्हां हुकुमाप्रमाणे सर्व लोकांना नांवनिशी द्यावयास ठाण्यावर जाणें प्राप्त होते. येशूचा बाप जोसेफ हाही आपल्या बायकोस घेऊन बेथलेम ठाण्यावर गेला होता. मेरी गरोदर होती. दिवस भरले होते, पण ठाण्यावर जाणें प्राप्त होतें. तेथे मुक्काम असतांच मेरी प्रसूत झाली. धर्मशाळेंत बाळंतिणीची व्यवस्था नीटशी लागेना. शेवटी मेरीनें मूल बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणीत निजविलें. पलीकडील रानांत मेंढपाळ आपलीं मेंढरें राखीत होते. एकाएकीं परमेश्वराचा दूत त्यांपुढें प्रगट झाला व म्हणाला, 'मी तुम्हांला शुभवर्तमान सांगावयास आलों आहें. तुम्हांस तारणारा आज जन्मला आहे. गांवांत जा आणि पहा. बाळंत्यांत गुंडाळून गव्हाणीत निजविलेलें जें बालक तुम्हांस दिसेल, तेंच तुमचा तारक होय'. धनगर भयानें व आश्चर्यानें चकित झाले ! कारण, हा दूत परम दैदीप्यमान होता व त्यानें सांगितलेली वार्ता त्यांना अभावितच होती. दूत अंतर्धान पावला व धनगर लगबगीनें बेथलेमकडे निघाले. येऊन पहातात तों गव्हाणीत एक गोजिरवाणें अर्भक निजविलेले दिसलें. असें असें वर्तमान आपणांस देवदूतानें येऊन सांगितलें, इत्यादि गोष्टी त्यांनी इतरांस सांगितल्या. सर्व लोक बालकाचें दर्शन घेऊन आश्चय करीत घरोघर गेले. आठ दिवस झाल्यावर तेथील पद्धतीप्रमाणे येशूची सुंता करण्यांत आली व त्याचे नामकरणही झालें. पुढें पहिला मुलगा म्हणून यरुशलेम येथील देवालयास ओहोरजत्रा करणे इष्ट असल्यामुळे सोयर सुटल्यानंतर आईबाप आपल्या मुलासह यरुशलेम येथे गेले. या शहरांत कोणी सायमन नांवाचा अत्यंत सदाचारसंपन्न असा एक गृहस्थ राहात असे. त्यास दृष्टान्त झाला होता होता कीं, 'तुला ख्रिस्ताचें दर्शन झाल्यावांचून मरण यावयाचें नाहीं'. येशूला आईबापांनीं देवळांत आणतांच या सायमननें या लहानशा अवतारी पुरुषाला आपल्या हातांत घेतलें व परमेश्वराची स्तुति केली. पुढें कांहीं दिवसांनीं पूर्वेकडील प्रदेशांतून कोणी मागी नांवाचे लोक यरुशलेम येथे येऊन बोलले कीं, 'यहुद्यांचा जो नवा राजा उत्पन्न झाला आहे तो कोठें आहे ? आम्हीं पूर्व दिशेला त्याचा तारा पाहिला व त्याला नमन करावयास आलों' हे ऐकून तेथील राजा हेरॉड फार घाबरा झाला. त्यानें मुख्य मुख्य पुजारी व बडवे यांस जमा करून विचारिलें कीं, 'मागी म्हणतात त्या येशूचा जन्म कोठें. झाला असावा?' ते म्हणाले, 'बेथलेम गांवीं. कारण, पूर्वीचें असें भविष्यच आहे कीं, वेथलेम सुभ्यांतून इस्रायल लोकांना पाळणारा अधिकारी उत्पन्न होईल'. हेरॉड यानें मागी लोकांस सांगितलें कीं, 'तुम्ही या नवीन अवताराचा चांगला शोध करा. तो कोठें आहे हें कळले म्हणजे मीही त्याच्या दर्शनास जाईन' मागींनीं त्याचें मनोगत ओळखिलें. डोईवरील तारा जाईल तिकडे मागी गेले. येशू ज्या घरांत होता त्या घरावर येतांच तारा थांबला. खूण पटून मागी घरांत गेले व त्यांनीं येशूस नमन केलें. आपले बटवे उघडून त्यांनी सोनें, ऊद व बोळ ह्रीं त्या मुलास अर्पिलीं व हेरॉड यास चुकविण्यासाठीं भलत्याच वाटेने ते आपल्या देशी निघून गेले. हेरॉडची ही दष्ट इच्छा जोसेफ व मेरी यांनी जाणून आपल्या गांवाहून मिसर देशाकडे पलायन केलें व हेरॉड मरेतोंपर्यंत तीं तेथेंच राहिली. जुन्या ख्रिस्ती पुराणावरून पाहतां हें असें घडून येईल अशी भविष्यवाणी आगाऊच झालेली होती. पुढे दरवर्षी मुलाला घेऊन आई-बाप यरुशलेमास जात. एकदां यात्रा संपवून परत जातांना त्यांना दिसून आलें कीं, येशू मागेच राहिला आहे. त्यांना वाटलें मुलें मुलें मिळून येत असतील; म्हणून तीं दोघें तशींच पुढें झटकली; पण तो येतां दिसेना. असें पाहून तीं दोघे पुन्हा यरुशलेमास आली. पहातात तो शास्त्री पंडितांच्या मेळांत बसून येशू कांहीं अध्यात्मचर्चा करीत आहे. त्याच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवरून हा मुलगा महान् बुद्धिमान् आहे असें सर्व लोक उमगले. चर्चा आटोपल्यानंतर आईबापांबरोबर येशू नाझारेथ येथें गेला. वास्तविक या वेळीं येशूचें वय केवळ बारा वर्षांचें होतें. पण एवढ्याशा वयांत त्याच्या बुद्धीला प्राप्त झालेलें परिणत रूप पाहून हा पुढें अवतारी पुरुष ठरणार अशी सर्वांची खात्री होऊन चुकली. हा अवतारी पुरुष आहे ही कल्पना करणें व ही कल्पना जुळणे फारसे अवघड नव्हतें. कारण अवतार येणार आहे अशी भविष्यवाणी अनेकदां उठली होती व नवीन अवताराची वाट मिसर देशांतील सर्व शहाणे लोक आतुरतेने पहात होते.
 पण ही अवताराची भूक समाजास कां लागली होती? अवतार हा शब्द ख्रिस्ती किंवा मुसलमानी धर्मतत्त्वांप्रमाणें चुकीचा आहे. त्यांचा खरा शब्द म्हणजे 'प्रेषित' हाच होय. 'ज्या ज्या वेळीं धर्माची ग्लानि होईल त्या वेळीं मी अवतरतों, सज्जनांचे संरक्षण व दुष्टांचें निर्दलन मी प्रत्येक वेळीं करीत असतो' असें आश्वासन हिंदूंच्या देवानें त्यांस दिलें आहे. ख्रिस्ती देव स्वतः केव्हांही अवतरत नाहीं, तर आपल्या पुत्रास धाडतो. देव स्वतः अवतरतो, कीं पुत्रांकरवीं कार्यभाग उरकून घेतो याचा निकाल करणें केवळ आध्यात्मिकांसच शक्य आहे; पण इहलोकची घडामोड पाहणारांस असें दिसतें कीं, कोणी ना कोणी- मग तो अवतार असो अथवा प्रेषित असो- भूलोकावर उत्पन्न होतो व त्या त्या ठिकाणच्या मनुष्ययोनीच्या जीवितांत जीं वैगुण्यें उत्पन्न झाली असतील किंवा योग्य त्या गुणांचा अभाव असेल, तीं दुरुस्त करून किंवा ते गुण उत्पन्न करून लोकांच्या जीविताचा गाडा सुरळीत चालू करून देतो. म्हणजे असें कीं, पूर्वी उत्पन्न झालेल्या पीठिका झिजत जातात व भाबडीं माणसें त्या पीठिकांच्या घसड्यांसच लोंबकळत राहतात. त्यांना नवीन बंधने हवी असतात. लोक जेव्हा जुन्या शास्त्राच्या विरुद्ध बोलूं लागतात तेव्हां त्यांना शास्त्रच नको असतें असें नाहीं; तर तें जुनें शास्त्र नको असतें. म्हणून नवीन शास्त्र उत्पन्न करून त्या गवसणीत ह्यांचें जीवित जो कोणी बरोबर बसवून देईल तो त्या युगाचा आरंभक होय. ही गोष्ट इतिहासांत वरचेवर झालेली आपण पाहातों. एखादा मनुष्य आपल्या पिढीपुरताच तत्त्वज्ञानी किंवा कार्यकर्ता ठरतो- दुसरा एखादा अशी करामत करतो कीं, आजूबाजूची शंभर वर्षे त्याच्याच नांवावर मोडतात; लोक त्याला सेंचूरियन म्हणतात. त्याची सद्दी संपली- म्हणजे त्याची शंभर वर्षे टिकणारी कल्पना संपली- म्हणजे नवीनाची सद्दी सुरू होते. हीच कर्तबगारीची व कल्पनेची व्याप्ति वाढत गेली म्हणजे आपल्या सामर्थ्यानें आजूबाजूच्या हजार वर्षांवर हुकमत गाजविणारा पुरुष निःसंशय उत्पन्न होतो असें दिसेल. यालाच कदाचित् लोक परमेश्वराचा अवतार अथवा प्रेषिताचें येणें म्हणत असतील. पण हें अवताराचें अथवा प्रेषिताचें येणें म्हणजे कोणच्याही ठिकाणी ज्याची घटना झाली नाहीं असा कांहीं उत्पात नव्हे. किंबहुना ज्याला आपण उत्पात म्हणून म्हणतों तो बिनचौकस बुद्धीला उत्पात वाटेल; कार्यकारणाची मीमांसा पाहणारांना वाटणार नाहीं. हे जे अवतारी किंवा प्रेषित पुरुष येतात त्यांच्या जीवितांतील संदेश केवळ त्यांच्याच तोंडून पहिल्याने बाहेर पडतो असें नव्हे. त्या संदेशाची जरुरी आणि त्याची गुणगुण हीं आधीं कित्येक वर्षे समाजांत चालू असतात. इतकेंच कीं, हळुहळू वाढत असलेल्या व मंद आवाजानें नादावत असलेल्या या संदेशाला त्याच्या हातीं भव्य व कदाचित् उग्र असें सुद्धा रूप प्राप्त होतें व मग झोपा काढणारे लोक एकमेकांस सांगतात कीं, 'उठा, अवतार झाला'; परंतु आधींच्या अज्ञानतिमिरांत जे 'संयमी' जागे असतात त्यांना प्रभातकालाचीं चिन्हें आधीं दिसूं लागतात. शुक्राचा तारा चमकूं लागतो व पूर्व दिशा उजळूं लागते. मागी लोकांना तारा दिसला व या ताऱ्याच्या मागोमाग येशूरूप ज्ञानसूर्याचा उदय खास होणार हे त्यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी निश्चित ओळखिलें होतें.
 पण तेवढ्यानेंच झालें नाहीं. आपापले जीवितहेतु न ओळखणारे आपण बहुतेक असतो. आपल्या मनाच्या आकांक्षा व आपापली सामर्थ्यं यांची तोलदारी कितपत आहे याचा हिशेब लागलेला नसतांनाच आपला जीवितहेतु निश्चित करणारे शेकडों लोक असतात व प्रत्येक ठिकाणीं फसगत झाल्यामुळे रोज नवीन कामाची उठावणी करतात; पण असेही कांहीं थोडे असतातच, कीं जे मागचे पुढचें पहातात, आपलीं सामर्थ्ये तोलतात व मग त्यांस मनापासून असें वाटतें कीं, अमुक एक काम हें आपलेंच होय. त्यांत सर्व हयात खर्च केल्यावर आपल्याहून बलवत्तर माणसाची ते वाट पहात बसतात. या कामी त्यांस मानहानि वाटत नाहीं. कारण ते तत्त्वज्ञानी असतात. येशू जन्मास येऊन आपले काम करूं लागावयाच्या आधीं त्या प्रांतांत जॉन दि बॅप्टिस्ट म्हणजे बाप्तिस्मा देणारा जोहान्न उत्पन्न झाला होता. हा योहान्न याच कोटींतील होता. लोक पातकी झाले आहेत, नीतिविचारांपासून भ्रष्टले आहेत, परमेश्वराचीं विकृत रूपें पूजीत आहेत आणि सर्वांहून वर, मानव्याचे सर्व विचार ज्याच्या रूपांत विलीन होतात त्याजवरची माणसांची श्रद्धा उडाली आहे, हें ज्ञाते लोक जाणतच होते; पण आतांच सांगितलेला जॉन समाजाची दुरुस्ती करण्याची कल्पना घेऊन उठला होता. हा धर्मसुधारक कडकडीत वैराग्यशील होता. कित्येकांच्या मतें हिंदुस्थानांतील बुद्ध- भिक्षूंच्या संन्यासविषयक कल्पना त्यानें हिंदुस्थानांतच अभ्यासिल्या होत्या. काषाय वस्त्रे अंगावर घालावीं; उंटाच्या लोकरीचीं वस्त्रे पांघरावींत; रानावनांत झाडाचा पाला खावा; टोळ तोंडी लावावे व फळांचा मगज खाऊन नरवंटीनें पाणी प्यावें; चाळीस चाळीस दिवस उपवास करून शरीर कष्टवावें व या देहदंडाने आत्म्यावरील पातकाचे लेप जाळून टाकावे; असें तो कित्येक वर्षे करीत होता. याप्रमाणें आपली तयारी केल्यावर लोकांस पुनीत करण्याचें काम त्यानें आरंभिलें. पण त्यास तरी शुद्ध कसें करावयाचें? येथून तेथून सारें राष्ट्र पातक्यांनीं भरून गेलें होतें. या सर्व पातक्यांचें पुढें काय होणार ही चिंता या योहान्नास लागली होती. जरुरीप्रमाणें तत्त्वज्ञान वळवितां येतें. या संकटावर इलाज म्हणून जॉनने ठरविलें कीं, लोक जर पश्चात्ताप पावतील व 'क्षमस्व' म्हणून परमेश्वरास शरण जातील तर ते उद्धरून जातील. ह्या इलाजाचा घोष त्याने सर्वत्र उठविला. 'तुम्हांस पश्चात्ताप होऊं द्या. पश्चात्तापाचें चिन्ह म्हणून मी सांगतों हा प्रोक्षणविधि पवित्र जॉर्डन नदीचे तीरावर करा म्हणजे तुम्हांला सद्गति प्राप्त होईल' हाच त्याचा संदेश होय. हजारों लोक कीं, ज्यांनीं पातकें आचरिली होती; पण ज्यांना थोड्या शिक्षेनें सद्गति हवी होती, त्यांना पश्चात्तापाचा इलाज अर्थातच मानवला असावा. परमेश्वर न्यायी आहे हे तत्त्वज्ञान पातकी लोकांना मोठें जाचाचें बनतें व म्हणून ते असें ठरवितात कीं, तो दयाळुही आहे. एकदां परमेश्वरास दयाळु म्हणून मानिलें म्हणजे 'माझे अपराध पोटांत घाल' अशी प्रार्थना कसल्याही पातक्यास सहजच करतां येते. परमेश्वराचें दयालुत्व जसें सोईचें आहे तसेंच पश्चात्तापाचें तत्त्वही सोईचेंच आहे. पण या प्रकरणांत उपरोधाचीही जरुरी नाहीं. पातक जर झालें असले तर त्याची निष्कृति पश्चात्तापानें होऊं शकेल याची मनोमय साक्ष सर्वांनाच आहे, असो. बाप्तिस्मा देणारा जॉन प्रायश्चित्ताचा विधि सांगून व जॉर्डन नदीमध्ये बुचकळी मारावयास सांगून शेंकडों लोकांना पावन करून घेऊं लागला. सहस्रावधि लोक अशा रीतीनें मुक्त झाले. ठराविक धर्मोपदेशकांना मात्र हें नवीन कुलंगडे काय आहे हे कळेना.
 हा वेळपर्यंत तिकडे येशू ख्रिस्त परमार्थविचारांत हळुहळू प्रगल्भ होत चालला होता. त्याच्या कानांवर जॉनच्या पराक्रमाची वार्ता पोहोंचलेली होती. येशूपेक्षां जॉन हा सरासरी दहा पंधरा वर्षांनी मोठा असेल. अर्थात् तितक्या मानानें, व तसेंच जॉनवें कडकडीत वैराग्य, त्याची फटिंग वृत्ति, लोकसेवेची आतुरता, व राजा असो की रंक असो, त्याच्या पातकाचा निषेध करतांना प्रवृत्तीस चढणारा त्याचा उन्माद यांमुळे, येशूला तो आपल्याहून श्रेष्ठ आहे असें सहजच वाटलें. अर्थात् हा वेळपर्यंत संभाषणपद्धतीनें त्याने जे चार दोन शिष्य बनविले होते, त्यांसह तो जॉनकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी गेला. जॉन जरी अगदीं कडकडीत व अधिकाऱ्यांशीं फटकळ असा होता, तरी तो चांगल्या माणसाशी फार विनयानें वागत असे. येशूस पाहून त्याला वाटलें कीं, हा पोरसवदा माणूस, पण आपल्याहून श्रेष्ठ आहे. तो म्हणाला, 'मी तुमचा जोडा पुसण्याच्या सुद्धां लायकीचा नाहीं. मीं तुम्हांस बाप्तिस्मा काय द्यावा?' येशू म्हणाला, 'आपण असें बोलूं नये. जी आशा मी. मनांत धरली आहे ती सफळ करावी'. मग जॉर्डनतीर्थावर जॉननें येशूस बाप्तिस्मा दिला. ख्रिस्ती लोक मानतात कीं, या वेळीं आकाशाचे दरवाजे उघडले आणि परमेश्वराच्या शुद्ध हेतूस शोभणारे असें एक पांढरें स्वच्छ कबूतर शांतपणे आकाशांतून खालीं येऊन येशूच्या मस्तका वर बसलें. जॉननें ओळखलें कीं, हा आपणाहून पूर्ण आहे. गोऱ्या कुंभाराच्या थापटणीनें वाजविलें असतें तर जॉनचें मस्तक बदबदलें असतें आणि येशूचें खणखणून वाजलें असतें. यापुढचा जॉनचा जीवितक्रम अतिशय संकटाचा व कष्टाचा गेला; पण आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाहीं. राजसत्तेशीं हुजत घातल्यामुळे त्याजवर हे प्रसंग आले, हे पाहून येशूनें राजकारणाकडे ढुंकूनही पाहिलें नाहीं. जॉनची शुद्धिकल्पना मात्र त्यानें जोरानें पुढे ढकलली व जॉर्डन नदीचें तीर मुक्त होऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंनी रोजच्यारोज फुलून जाऊं लागलें. त्याचें बोलणें गोड व त्यांतील अलंकार अगदीं साधे असून दाखले रोजच्या व्यवहारांतील असत. मांसाशन बंद करणे, ब्रह्मचारी राहणें, मद्यास स्पर्श न करणे या गोष्टी निदान धर्मद्रष्ट्यांना तरी जरूर आहेत असें तेव्हांचें मत होते. येशूनें हीं व्रतें संभाळिली होतीं असें दिसतें. सर्व पॅलिस्टिन प्रान्तांतून पापविमोचनासाठीं येशूच्या मागें लोक धावूं लागले; पण केवळ गोड बोलणें, सदाचार- संपन्न असणे येवढ्यानेंच येशूला यश मिळालें असें नाहीं.
 येशू हळुहळू चमत्कार करूं लागला होता आणि म्हणून लोक त्याच्या भोंवतीं जमूं लागले. तो एके दिवशीं आपल्या मावशीच्या घरी जेवणावळ होती म्हणून गेला होता. कदाचित् पाहुणे आयत्या वेळ जास्त आल्यामुळे पिपांतील द्राक्षारस संपून गेला. मावशीला आपल्या भाच्याच्या सामर्थ्याची कुणकूण आगाऊच लागलेली होती. ती बहिणीस म्हणाली, 'मुलाकडून माझी लाज राख'. येशूनें पहिल्याने कांहीं करून दाखविण्याचें नाकारिलें. पण मग त्यानें घरच्या चाकरांस पिपें पाण्यानें भरावयास सांगितली व त्या पाण्याकडे एकदा पाहून तो वाढप्यास म्हणाला, 'आतां तुम्ही खुशाल वाढावयास न्या'. वाढपे पाहातात तो उत्कृष्ट द्राक्षारस पिपांतून भरलेला दिसला! येशूने केलेल्या अनेक चमत्कारांतील हा पहिला होय.
 अर्थात् त्याच्या भोंवतीं शिष्यांचा मेळा झपाझप जमूं लागला. थोडासा जोर उत्पन्न होतांच दरसालच्या जत्रेसाठीं येशू यरुशलेमास गेला. देवाचें देऊळ हें भक्तीसाठी केलेलें. तेथें सत्त्वशील माणसांनी बसावें, भक्तांनी प्रार्थना करावी, आणि आर्तांना आश्रय मिळावा; पण तेथील देऊळ म्हणजे एक बडा सराफकट्टा झालेला होता. माणसें जमतात असें पाहून व्यापारी लोकांनी गुरामेंढरांचे बाजार तेथे सुरू केले होते, खबूतरें विकणारेही खबुतरांचीं खुराडी घेऊन बसत असत, आणि लोकांच्या जिनग्या डुलवावयास सोकावलेले सावकार तेथेच व्याजबट्टा करीत असत. हा तेथील प्रकार पाहून येशू पराकाष्ठेचा संतापला व चवताळून जाऊन त्यानें सराफांचीं खुर्द्यांचीं पोतीं उधळून दिलीं. चौरंग उलथेपाल केले आणि हातांत कोरडा घेऊन गुरेमेंढरें व सावकार या सर्वांना त्याने झोडपीत देवळांतून हांकून दिलें आणि तो उद्गारला कीं, 'मी परमेश्वराचा पुत्र आहे. माझ्या पित्याच्या मंदिराचा असा बाजार बनवूं नका'. अत्यंत शान्त व क्षमाशीलत्वाचा केवळ पुतळा म्हणून गाजत असलेल्या या धर्मसुधारकाच्या पूर्वचारित्र्यांतील संतापाचा कढ निःसंशय बोधप्रद आहे.
 येथून पुढे थोडीसुद्धां काचकूच न करितां येशू बेलाशक सांगूं लागला कीं, 'येणार, येणार' म्हणून गाजत असलेला परमेश्वराचा प्रेषित तो मीच होय. मला त्याने पाठविलें आहे व मी या पातकी जगाचा उद्धार करणार आहे. पातक्यांकडून मी इतकेंच वांछितों कीं, त्यांनी मजवर श्रद्धा ठेवावी. मनांत थोडेही किल्मिष न बाळगितां जो कोणी परमेश्वराच्या पुत्रावर म्हणजे माझ्यावर श्रद्धा ठेवील त्यास सद्गति मिळेल. अशा प्रकारचें निश्चयाचें बोलणें जॉनच्या हातून होईना. कारण आपला अपुरेपणा त्यास नेहमीं प्रतीत होत असावा. उलट येशूला असली शंका केव्हां शिवलीसुद्धा नाहीं. आपण परमेश्वराचे पुत्र ही गोष्ट येशूनें अनेक चमत्कार करून सिद्ध करून दिली. तो नाझारेथ येथे गेला व प्रतिपादनासाठीं त्यानें धर्मग्रंथ उघडिला, तों आरंभालाच अशी ओळ निघाली कीं, 'हीन, दीन, पातकी जे कोणी असतील त्यांस सद्गति मिळेल आणि परमेश्वराचें राज्य लवकरच सुरू होईल. हें शुभवर्तमान सांगावयास परमेश्वरानेच मला अभिषिक्त केलें आहे'. यांतील मर्म म्हणजे स्वतःकडे प्रेषितत्वाचा अधिकार घेण्याचा येशूचा हेतु श्रोत्यांच्या ध्यानांत आला. त्यांना हें खपलें नाहीं. त्यांनीं त्यास गांवाबाहेर घालविलें व 'तुझा कडेलोट करूं' अशीही धमकी त्यास दिली. येशू मुकाट्यानें तें गांव सोडून निघून गेला. यापुढें त्यानें हें श्रद्धेचे प्रतिपादन इतकें वाढवीत नेलें कीं, आपल्यावर जो श्रद्धा ठेवील त्याला सर्व पाप माफ करण्याची जिम्मेदारी त्याने स्वतःकडे घेतली. लोक म्हणत, 'एका देवावांचून पापाची क्षमा करण्याचा अधिकार कोणास असणार आहे?' येशू उत्तर देई, 'मी त्याचा पुत्र आहे. तो अधिकार मला आहे'. एकदा आपल्या या बोलण्याचें प्रत्यंतर त्यानें लगोलग दाखविलें. हातापायांची जुडी होऊन खुडुक बनलेल्या एका रोग्याला तो म्हणाला, 'तुला तुझ्या पातकाची मी क्षमा करतों; तूं जागचा ऊठ व डोक्यावर खाटलें घेऊन चालू लाग'. येशू इतकें बोलतांच तो कित्येक वर्षांचा जरत्करू तटकन् उभा राहिला! प्रतिपादन आणि त्याचें प्रत्यंतर हीं एकमेकांच्या इतकीं नजीक असल्यामुळें लोकांचा विश्वास अर्थातच बळावत चालला.
 पुढे आपल्या शिष्यांपैकीं त्यानें बाराजण निवडून काढिले व त्यांना 'प्रेषित' असें नांव दिलें. या बारा जणांस त्याने केलेले प्रतिपादन फार महत्त्वाचे आहे. तो म्हणे, "जे मनानें नम्र आहेत, ते विश्वाचें राज्य करतील. जे मनानें खिन्न झाले आहेत त्यांनाच शांति प्राप्त होईल. जे कोणी लव्हाळ्यासारखे नम्र आहेत, त्यांच्या वाट्याला पृथ्वीचे वतन येईल. ज्या कोणास खरी परमार्थाची तहान लागली आहे ते तृप्त होतीलच होतील. जे स्वतः लोकांवर दया करतात, ते स्वतः दयेस पात्र होतील. जे अंतःकरणानें शुद्ध, त्यांना परमेश्वर भेटेल. तुम्ही आज माझ्या मागें फिरत आहां, पण तुम्ही त्याच वेळीं धन्य व्हाल किंवा धन्य ठराल, कीं जेव्हां लोक तुमची निंदा करतील, तुमच्या पाठीस लागतील, व माझ्यासाठीं तुमच्या कपाळीं सर्व तऱ्हेचे अपवाद येतील. शपथ वाहूं नका; आकाशाची शपथ वाहूं नका, कारण तें देवाचें आसन आहे; पृथ्वीची वाहूं नका, कारण कीं, ती परमेश्वराची पायरी आहे; यरुशलेमची वाहू नका; कारण कीं, ती त्याची राजधानी आहे; इतकेंच काय, स्वतःच्या मस्तकाची सुद्धां आण वाहू नका; कारण कीं, तें तुमचें नव्हे. त्यावरचा एकही केंस आपल्या इच्छेप्रमाणे तुम्हांस काळा किंवा पांढरा करतां येत नाहीं. 'होय' म्हणावयाचे असेल तर 'होय' म्हणावें, 'नाहीं' म्हणावयाचे असेल तर 'नाही' म्हणावें. याहून जास्त जें बोलाल ती सैतानाची बरळ आहे. वाइटाचा प्रतिकार करू नका; इतकेंच नव्हे तर कोणीं तुमच्या उजव्या थोबाडीत मारली, तर डावा गाल त्याजपुढें करा. जर कोणी तुम्हांवर फिर्याद केली आणि अंगचा सदराही छिनवून नेला तर त्यांस म्हणावें, 'हें धोतरही घेऊन जा'. जो कोणी तुम्हांस वेठीस धरून मैलभर रखडीत नेईल, त्यांस म्हणावें, 'मी तुजबरोबर आणखी एक मैल येतों'. आजपर्यंत तुम्हांस सांगत आले आहेत कीं, शेजाऱ्यांवर प्रेम करावें व शत्रूंचा द्वेष करावा; तसेंच, डोळा फोडणाराचा डोळा फोडावा आणि दांत पाडणाराचा परत दांत पाडावा असेंही तुम्ही ऐकत आलां आहां. पण मी येशू तुम्हांस असें प्रतिपादितों कीं, तें चूक आहे. तुम्ही शत्रूवरसुद्धां प्रेमच करा. जे तुमच्यावर बोटें मोडतील, त्यांचे सुद्धां शुभ चिंतीत जा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांजवर उपकार करा. जे कोणी तुम्हांस छळतात आणि दुष्टाव्याने राबवितात 'त्यांना देव सुखी ठेवो' असें म्हणा. हें तरी मी तुम्हांस कां सांगतों? तर आपण परमेश्वराची लेकरें आहों या तुमच्या म्हणण्याला कांहींतरी अर्थ उरावा. परमेश्वर काय करतो पहा. भल्याच्या व वाइटाच्या घरांवर आपल्या सूर्याचा प्रकाश तो सारखाच पाडितो ना? न्यायी व अन्यायी यांच्या घरांवर त्याचे मेघ सारखेच वर्षतात ना? मग तुम्ही जीं त्याचीं लेकरें तीं सुष्टांशीं सुष्ट पण दुष्टांशीं दुष्ट काय म्हणून होणार? जो तुम्हांवर प्रेम करतो, त्यावर तुम्हीं प्रेम केलें किंवा तुम्हीं आपल्या भावासच नमस्कार केला तर यांत काय नवल? वाटचा चोरसुद्धां ही गोष्ट करतो. तुम्ही त्याच्याहून कांहीं जास्त असावें. परमेश्वर जसा समदृष्टि आहे तसे तुम्हीं असावें."
 त्या वेळपर्यंत चालत आलेल्या यहुदी तत्त्वज्ञानांत व धर्मविषयक कल्पनेंत येशू ख्रिस्तानें हा स्पष्ट फरक पाडिला. हे त्याचे थोर उद्गार उपहास्य मानणे अतिशय सोपें आहे; तें कोणालाही करतां येतें; पण आपल्याला जी गोष्ट व्यवहार्य बनवितां येत नाहीं, तिचें स्वयंभू उंचपण केवळ अव्यवहार्यतेच्या मुद्दयावरच कोणासही ठेंगणे करता यावयाचें नाहीं. तें उंचपण आपल्या मुठींत आलें नाहीं म्हणून उंचपणच नव्हे असें म्हणणें धाडसाचें होईल. दूर कां होईना, तें मनापुढे सारखे तेवत असले, तर त्याच्या हव्यासानें रोखठोक व्यवहारांत थोडी तरी मृदुता उत्पन्न होईल.
 येशूच्या चमत्कारांचा सपाटा सारखा चाललाच होता. आतांपर्यंत त्यानें रोगी तर कित्येक बरे केले होते; पण आतां एका गरीब विधवेच्या मेलेल्या मुलाच्या तिरडीला हात लावून त्यानें त्यास जिवंत केलें! या त्याच्या अद्भुत कृत्यामुळे त्याच्या भविष्यवादीपणाचा लौकिक सर्वत्र पसरला व आसपासच्या मुलुखांतून शेंकडों आर्त लोक दुःखमुक्त होण्यासाठीं जमूं लागले! असले पराक्रम जरी तो करीत होता आणि सर्व मनुष्ययोनीहून आपण श्रेष्ठ आहों अशी ग्वाही आपणच देत होता, तरी त्याच्या वृत्तीला उन्माद असा कध शिवलाच नाहीं. बोलणें गोड व विनयाचे असल्यामुळे आणि अंगिकारिलेलें व्रत पापाची क्षमा करणें हें असल्यामुळे, वाटेल त्या प्रकारचे पातकी त्याच्या भोंवतीं गोळा होऊं लागले. जो जो पातक्याचे अपराध जास्त, तो तों येशूला त्याचा कळवळा जास्त. पातक्यास क्षमा करणें हें एकदा ठरल्याने, जास्त पातक्यास जास्तच दया दाखविणें हें मूळ विचारास अनुसरूनच ठरलें. सामान्य लोकांना ही तर्कपद्धति पटेना. एके दिवशीं एक वाईट चालीची बाई त्याजकडे आली व रडत, स्फुंदत त्याच्या पायांपाशीं उभी राहून, तिनें पदराखालीं आणलेली तेलाची वाटी बाहेर काढली. येशूच्या पायांस तें तेल तिनें लाविलें व पश्चात्तापाने ती इतकें खळखळून रडली कीं, तिच्या अश्रूनच येशूचे पाय धुऊन निघाले! यावर तिनें आपले लांब सडक केंस हातांत धरून त्याचे पाय पुसले व शेजारी मोठ्या अदबीने उभी राहिली. येशू म्हणाला, 'तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. कारण, तूं मजवर प्रेम केलेंस व मजवर विश्वास ठेविलास'. वादळ शान्त करणें, पांच भाकरी व दोन मासे एवढ्यावरच पांच हजार लोक जेवावयास घालणे, पाण्यावरून चालणें, कोड्या लोकांस बरें करणें, जन्मान्धास दृष्टि देणें, मेलेल्यास जिवंत करणें, भुतें व झोटिंग काढणें अशांसारखे शेंकडों चमत्कार त्यानें भक्तमंडळास करून दाखविले.
 अर्थात् जो जो भक्तमंडळी जास्त जमा झाली, तों तों त्यास आपल्या सामर्थ्याची जाणीव उत्पन्न होऊं लागली. पूर्वी एकदा यरुशलेम नगरीतील देऊळ शुद्ध करण्याचा उपक्रम त्यानें केलाच होता. तीच गोष्ट पुन्हा एकदां करण्याचें त्याच्या मनानें घेतलें. अर्थात् हा प्रयत्न जर केला तर विरोधाची वावटळ जोरानें उठेल कदाचित् आपल्याला प्राणाचीसुद्धा किंमत द्यावी लागेल; पण द्यावी लागली तरी शुद्धीकरणाचा आपला हेतु खास तडीस जाईल असे विचार त्याच्या मनांत घोळू लागले. आपले मनोगत त्यानें शिष्यांस कळविलें. या त्याच्या भीषण कृत्यांत त्याला कोण मदत करणार? अर्थात् शिष्यमंडळींत बरीच भवति न भवति झाली असावी. त्यानें मात्र निक्षून सांगितलें कीं, 'ज्याला माझ्या मागें यावयाचें असेल त्यानें आपल्या जिवाची आशा सोडावी. आपला सूळ आपल्या खांद्यावर घ्यावा. जो कोणी जिवाची आशा धरून बसेल त्याला मृत्यु ठरलेलाच आहे. पण जो कोणी मरण पत्करील तो अनंत काल जिवंत राहील'. मग त्यानें आपले सहा सात शिष्य बरोबर घेतले व तो एका दूरच्या डोंगरावर चढला. तेथें उभे राहतात तो त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि त्याची वस्त्रें सूर्याच्या कान्तीसारखी शुभ्र झालीं व त्याच्या पूर्वी होऊन गेलेले मोठाले प्रेषित जे मोझेस व एलिया हे दोघे त्याच्याशी बोलत आहेत असें शिष्यांनीं पाहिलें. हे दिव्य पुरुष एकमेकांशी बोलतांना पाहून भक्तांचे डोळे दिपले व भयाने ते खालीं तोंड करून भुईवर पसरले. येशूने त्यांना धरून उठविलें व सांगितलें कीं, 'मी मरून पुन्हा उठेतोंपर्यंत आतां पाहिलेली गोष्ट कुणास कळवू नका'. येथून पुढे ते यरुशलेमास गेले. तेथे देवळांत येशूनें आपलें नवीन तऱ्हेचें प्रतिपादन जोराने चालू केलें. पुजारी, बडवे व उपदेशक यांच्यांत मोठी चुळबूळ चालू झाली. श्रोते म्हणूं लागले, 'हा बेधडक नव्या गोष्टी बोलतो आणि हे देऊळवाले तर हूं का चूं करीत नाहीत. त्यांची वाचा का बसली? येणार, येणार म्हणून म्हणतात तो प्रेषित हा नव्हे ना?' त्यांस उद्देशून येशू उद्गारला, 'मी असा तसा कोणी नव्हे. मला प्रत्यक्ष परमेश्वरानें धाडिलें आहे'. हे त्याचे शब्द ऐकून त्याच्या मुसक्या बांधाव्या म्हणून पुष्कळांच्या मनांत आले; पण कोणाच्यानेही त्याजवर हात टाकवेना.
 अशा प्रकारें त्याचा अंमल वाढत चालला. त्याचा उपदेश सर्व लोक मानूं लागले. एकानें त्याला विचारलें, 'मला अनंतकाल टिकावयाचें आहे, मी काय करावें?' येशू उपदेश करूं लागला: 'व्यभिचार करूं नको; हत्या करूं नको; चोरी करूं नको; खोटी साक्ष देऊं नको; कोणाला ठकवूं नको; आईबापांचा मान ठेव' मुमुक्षु म्हणाला, 'हें सर्व मी तर करीतच आलों आहें'. येशूनें उत्तर केलें, 'अजून एका गोष्टीची उणीव आहे. तुझ्यापाशीं तुझें म्हणून जें जें कांहीं आहे तें सर्व विकून टाक, तो पैका गरिबांला देऊन टाक, वधस्तंभावर येण्याचा निश्चय करून मग माझी पाठ धर. असे केलेंस म्हणजे तूं चिरंजीव होशील'. यरुशलेम येथे पुन्हा जाण्याचा त्याचा निश्चय कायम झाला. त्याने एक गाढव पैदा केलें आणि त्याच्यावर अंगावरील पंचा टाकून शिष्यांसह तो नगरांत शिरला. हा वेळपर्यंत त्याचें नांव सर्वत्र पसरलें होतें. बडे लोक काय वाटेल तें म्हणोत आपणांस तारावयासाठीं हा उत्पन्न झाला आहे अशी सामान्य जनसमूहाची बालंबाल खात्री झाली होती. त्याचे चमत्कार, त्याची शालीनता, पातक्यांवर कृपादृष्टि, उपदेशाचा सोपेपणा इत्यादींचा विलक्षण परिणाम लोकांच्या मनावर झाला होता. तो अशा गरीबीनेंसुद्धां शहरांत शिरतांच लोकांच्या झुंडीच्या झुंडी जमा झाल्या. त्यांनी आपल्या अंगावरील वस्त्रे काढून तीं त्याच्या मार्गावर अंथरिली. कित्येकांनी हिरवीगार पालवी पसरून त्याचा मार्ग सुशोभित केला. आणि त्याच्या नांवाचा जयजयकार करीत, टाळ्या पिटीत त्यांनी त्याची मिरवणूक काढिली. येशू सरळ देवळांत गेला आणि तेथील दुकानदार, गिऱ्हाईक, सावकार आणि कुळें, कोंबडेवाले इत्यादिकांस त्यानें हांकून दिले व तो म्हणाला, 'हें स्थळ प्रार्थनेसाठीं आहे. पण तुम्हीं त्यास उचल्यांचा खुंट बनविलें आहे'. मग कित्येक आंधळे, पांगळे त्याजकडे आले त्यांस त्यानें बरें केलें. त्यानें केलेले चमत्कार पाहून मुलेंसुद्धां जोरजोरानें 'दाउदाच्या पुत्राचा जयजयकार असो!' असें ओरडूं लागलीं. येशू देवळांतून बाहेर गेला व आपल्या शिष्यांजवळ अशी भविष्यवाणी बोलला कीं, 'या देवळाचा सत्यानाश होणार आहे. माझ्यामुळे तुमच्यावर संकटें येतील, खोटे भविष्यवादी उपस्थित होतील, तुमच्यावर आमची श्रद्धा आहे असें जे कोणी आतां म्हणत आहेत ते सर्व थंडावतील व जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल'. त्याला सांगावयाची होती ती गोष्ट आतां संपत आली. आपला जीवितहेतु संपला याची जाणीव त्याला आली.
 वार्षिक यात्रेसाठी पुन्हा यरुशलेमला जावयाचें त्यानें ठरविलें. काय असेल तें असो त्याला वाटू लागलें कीं, दोन दिवसांच्या आंत आपणांस मृत्यु येणार. मग आपल्या शिष्यांच्या मेळांत बसून एकदां जेवावें असें त्याने ठरविलें. नम्रता म्हणजे काय हें शिष्यांस दाखवावें म्हणून त्यानें आपल्या शिष्यांचे पाय धुतले व म्हणाला, 'मी तुमचा गुरु व स्वामी असतांना मी तुमचे पाय धुतले तर तुम्हींही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. उदाहरणासाठींच हें मीं केलें'. हे शब्द तो उच्चारीत आहे तोंच त्याला खिन्नता आली व तो म्हणाला, 'तुम्हांस खात्रीनें सांगतों, तुमच्यापैकींच एकजण मला शत्रूच्या हवाली करील'. तेव्हां सगळे शिष्य एकमेकांकडे संशयानें पाहूं लागले. येशू म्हणाला, 'मी तुकडा बुचकळून ज्याच्या हातीं देईन तोच माझा घात करील'. त्यानें तुकडा बुचकळला व सायमनचा मुलगा यहूदा इस्कारयोत याच्या हातीं दिला. शेवटचें सांगणें म्हणून येशूने त्यांना सांगितलें, कीं, 'माझें जसें तुमच्यावर प्रेम आहे तसें तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. तसें तुम्हीं केलें म्हणजेच तुम्ही माझे शिष्य आहां असें ठरेल. मुलांनो, मी आतां जातो. तुमचा माझा सहवास फार थोडा उरला आहे. मी जातो तेथे तुमच्यानें येववणार नाहीं'. सायमन म्हणाला, 'प्रभू, तूं कोठें जातोस? माझ्यानें तुझ्या मागें कां येववणार नाहीं? मी तुझ्यासाठीं जीव देण्याला तयार आहे'. येशूने उत्तर केलें, 'काय म्हणतोस? माझ्यासाठीं आत्मत्यागसुद्धां करशील? अरे भोळ्या शिष्या, तुझ्या हातून हे तर होणारच नाहीं. आतां रात्र पडली आहे. पण तुला सांगतों, पहांटेचा कोंबडा आरवण्याचे पूर्वीच तूं लोकांस त्रिवार सांगशील कीं, 'येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाहीं. येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाहीं, येशूचा आणि माझा कांहीं संबंध नाहीं'. मजवर तुमचें जर कांहीं खरोखरी प्रेम असेल तर तुम्हीं माझ्या आज्ञा पाळा. मी आतां खास जातो. पण मी तुम्हांस दुःखांत सोडून जातों असें समजूं नका. शांतिब्रह्म मी तुम्हांसाठी ठेवून जात आहे; तें चित्तांत सांठवून ठेवा. मी गेलों म्हणून खिन्न होऊं नका, भयानें गांगरू नका. मी तुम्हांस सांगतों, मी आतां गेलो तरी पुन्हा परत येईन, तुमचें मजवर प्रेम आहेना? मग मी माझ्या पित्याकडे जात असतां तुम्हांस खिन्नता का यावी? मी द्राक्षाचा वेल आहे, आणि माझा बाप बागवान आहे. तुम्ही माझ्या शाखा आहां, तुम्ही माझ्यांत व मी तुम्हांत आहे. जो माझ्यांत राहील तोच फळ धरील; पण जो मीरूप बुंध्यापासून तुटून जाईल, तो वाळून जाईल. येथून पुढे मी तुम्हांस सेवक म्हणणार नाहीं. कारण धन्याच्या मनात काय आहे हें सेवकांस कधीं कळत नाहीं. पण मी तर माझें सर्वस्व तुम्हांस सांगून टाकिलें आहे कीं, तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. म्हणून इतउत्तर तुम्ही माझे मित्र आहां'.
 मग तो आपल्या शिष्यांबरोबर गेतसेमाने येथील बागांत आला. आपल्यावर संकटें सांचत चालली आहेत, अधिकारी चवताळले आहेत, बडवे, पुजारी, शास्त्री त्यांचे कान फुंकीत आहेत; या सर्व गोष्टी त्याचे कानीं भराभर येत होत्या आणि पाखांडी माणसाला सुळावर ठोकून मारतात हेंही त्यास माहीत होतें. त्यामुळे तो कांहींसा घाबरा झाला व शिष्यांस म्हणाला, 'येथें माझ्या भोंवतीं जागे रहा'. पण रात्र पडली आणि शिष्यांना झोंपेनें ग्रासलें. तो म्हणाला. 'तुम्हांस थोडें जागवत नाहीं काय?' थोडक्याच वेळांत ते सर्व झोपी गेले. येशू निराशेनें म्हणाला, 'आतां खुशाल निजा. माझी घटका भरली. परमेश्वराच्या पुत्राचा विश्वासघात झाला. लबाडांनीं त्याला पातक्यांच्या हाती लोटलें'. इतकें तो बोलत आहे तोंच बुचकळलेला तुकडा स्वीकारणारा यहुदा व नागव्या तलवारी घेतलेले शेंकडों लोक आणि धर्मोपदेशक तेथें जमा झाले. तेव्हां येशू त्यांस तडफेनें म्हणाला, 'असे चोरासारखे रात्रीचे कां आलां? मी रोजच्या रोज तुमच्यादेखत प्रतिपादन करीत होतों ना?' त्यांनीं एकदम येशूस धरिलें. इतक्यांत येशूच्या लोकांपैकीं एकानें तलवार उपसली आणि मुख्य धर्मगुरूच्या एका चाकराचा कान कापला. येशू शिष्यास म्हणाला, 'तलवार चालवू नको. जे तलवार चालवितात ते तलवारीनेंच मरतात'. त्यास पेंचांत धरण्यासाठीं धर्मगुरूंनीं बरोबर साक्षीदार आणले होते. एकजण म्हणाला, 'येशू म्हणाला कीं, मी हें देऊळ पाडीन व तीन दिवसांत पुन्हा उभें करीन' 'तूं असें म्हणालास काय?' असें धर्मगुरूनें विचारिलें असतां येशू गप्पच राहिला. पुन्हा त्यानें विचारलें, 'तूं ख्रिस्त आहेस, नाहीं? तूं परमेश्वराचा पुत्र आहेस, नाहीं?' येशू गंभीर आवाजानें म्हणाला कीं, "होय. मीच तो आहें'. तेव्हां त्यांनीं त्याचे कपडे फाडिले, हा पाखंडी आहे असें ते म्हणाले, ते त्याच्या तोंडावर थुंकले आणि त्यांनी त्याला चपराका मारिल्या. हें होत असतां त्याचा आवडता शिष्य सायमन बाहेर बसला होता त्यास कोणी म्हणाले, 'तूंही त्याच्यापैकीच आहेस'. जणुं आपण त्या गांवचे नव्हों अशा स्वरानें सायमन तीनदां म्हणाला, 'जीजस माझा कोणी नव्हे!' त्यानें हें उत्तर करतांच कोंबड्यानें सांथ घातली. येशूचें भाकित खरें झालें. त्याच्या शिष्यां नीं त्याला फसविलें व ते सारे पळून गेले. शिपायांनीं येशूस पकडून सुभेदारापुढे उभे केलें. तोही बुचकळ्यांत पडला. तो दिवस सणाचा होता आणि म्हणून एका कैद्याला मुक्त करण्याचा अधिकार या दिवशीं त्याला होता. येशूबरोबरच बॅरॅबस नांवाचा एक बिलंदर डाकू कैद झाला होता. सुभेदारानें लोकांस विचारलें, 'या दोघांपैकी कोणास सोडूं?' ते अज्ञ लोक गर्जून म्हणाले, 'बॅरबस या सोडा'. संसारी लोकांनीं दरवडेखोर स्वतःसाठीं मागून घेतला आणि शांतिक्षमेचा पुतळा फांसावर चढविण्यासाठी सुभेदाराच्या हवाली केला! मग शिपायांनी कांटेरी मुकुट करून त्याच्या डोक्यावर घातला आणि 'अहो यहुद्यांचे राजे' असें म्हणून त्याची टवाळी केली, त्यास द्रोणभर आंब प्यावयास दिली, व शेवटीं त्यांनीं स्याच्या हातापायांवर खिळे ठोकून त्यास वधस्तंभाशीं कायम केलें. येशूची मान लटकी पडली. तो म्हणाला, 'परमेश्वरा! मला विसरलास काय?' तो असें म्हणाला काय, याविषयीं फार वाद आहे. असो. कांहीं वेळानें त्याचें प्रेत गुहेत ठेवण्यांत आलें व त्याच्या आड एक दगड उभा करण्यांत आला. तो पुन्हा जिवंत होणार आहे हें भाकित खोटें ठरविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सक्त पहारा ठेविला होता. तिसरे दिवशीं दगड काढून पहातात तो येशू आंत नाहीं! एकदम जिकडे तिकडे आरोळी उठली कीं, येशू ख्रिस्त जिवंत झाला. श्रद्धाळू ख्रिस्त्यांचा या कथेवर पूर्ण विश्वास आहे. येशू ख्रिस्ताचें हें पुनरुत्थान म्हणून समजलें जातें. असो. अशा प्रकारें या नवीन धर्मसंस्थापकाचा अंत झाला.