पाश्र्चात्य पुरुषश्रेष्ठ/मार्टिन लूथर
Appearance
मार्टिन् लूथर
इ० सन १५०१ सालीं लूथर मॅट्रिक्युलेट झाला. हा वेळपर्यंत बापाची सांपत्तिक स्थिति चांगली सुधारली होती. व आजपर्यंत आपल्या मुलाचे हाल झाले ते झाले, आता त्याला पदरखर्चानें कॉलेजांत घालावयाचें असें ठरवून त्यानें त्यास एरफूर्ट शहरी पाठविलें. तेथील विद्यापीठाचा लौकिक सर्व जर्मनींत मोठा होता. शिकविणारेही चांगले जाडे पंडित असत. तर्क, न्याय, तत्वज्ञान, अलंकार, खगोलविद्या इत्यादींचा अभ्यास लूथरने या ठिकाण केला. ग्रीक, लॅटिन भाषांतील अभिजात वाङ्मयाचीही त्याला आवड लागली. पण वाङ्मयाकडे त्याचा ओढा फार दिवस राहिला नाहीं. तो जात्याच विचारप्रवण असल्यामुळे तत्त्वज्ञानाविषयींचें चिंतन करण्यांतच तो मग्न होऊं लागला. अभ्यासाची हौस असल्यामुळे इ० सन १५०२ मध्ये तो बी. ए. झाला आणि इ० सन १५०५ सालीं एम्. ए. झाला. ही शेवटची परीक्षा झाली तेव्हां त्याला पराकाष्ठेचा आनंद झाला. एम्. ए. ची डिग्री देण्याच्या वेळीं तेव्हां मोठा दिमाख व बडेजाव करीत. या नव्या उमेदवाराची वाहवा तर होईच होई; पण मिरवणूक सुरू झाली म्हणजे त्याच्यापुढे ज्ञानदीप म्हणजे प्रत्यक्ष मशाली घरीत असत! अर्थात् उमेदवाराला मोठी ऐट वाटत असे. लूथरच्या बापाचा आनंद पोटांत मावेना. आपला मुलगा एम्. ए. झाला, त्याजपुढे मोठमोठ्या पंडितांच्या परवानगीनें ज्ञानदीप पाजळले हें पाहून आपण कृतकृत्य झालों असें त्यास वाटू लागलें आणि त्या आनंदांत मुलानें पुढें कायद्याचा अभ्यास करावा म्हणून त्याने पुस्तकेंही खरेदी केली. मुलगा कायद्याचीं लेक्चरें ऐकूं लागला. पण इतक्यांत कोणाच्या ध्यानीं ना मनीं अशी एक गोष्ट या नव्या होतकरूनें अचानक करून टाकली. सगेसोयरे, मित्रपरिवार यांना वाटलें कीं, हा आतां कायदेपंडित होणार; पण एके दिवशी बातमी कळली कीं, हें सर्व बाजूस सारून तो मुंडण करून मठांत जाऊन जोगी होऊन बसला आहे!
हा प्रकार ऐकून सर्व लोक चकित होऊन गेले. हातातोंडास आलेला मुलगा आतां प्रापंचिक बनून गृहस्थाश्रमाचे आचार चालवू लागावयाचा तो विरागी म्हणजे बैरागी झालेला पाहून बाप तर दगडासारखा निश्चेष्टच झाला. कोणाच्या मनांत काय गडबड चालू असते हें अगदी निकटच्या माणसांनासुद्धां पुष्कळदां कळत नाहीं. मागील पिढीच्या अपेक्षा आणि चालू पिढीच्या प्रवृत्ति यांत फरक पडत चाललेला असतो. तो स्थूल रूप धरून अशासारख्या रीतीनें बाहेर फुटला म्हणजे जुनीं माणसें स्तिमितच होतात. प्रस्तुत ठिकाणी हा फरक कां पडत चालला होता हें कळावयास हवें; कारण लूथरच्या जीविनांतील इतिकर्तव्यतेचे रहस्य समजावयास त्याचे ज्ञान जरूरच आहे. वर जी हकीगत दिली आहे ती केवळ बाह्य स्वरूपाची आहे. तिनें लूथरच्या या आकस्मिक विरागाचा उलगडा होण्यासारखा नाहीं.
धार्मिक आचार्यपीठाच्या अमलाखालून, म्हणजे त्यांच्या ऐहिक राजसत्तेखालून, युरोप हळुहळू मोकळा होत होता. पूर्वी धर्मगुरुच राज्याधिकारी असत. पुढे धर्मगुरु व राजे असे समाइकीने देशावर अम्मलदारी चालवू लागले. हाही प्रकार निर्लेप राजशासनाच्या दृष्टीनें कुचंबणेचाच होऊं लागला. एकाच लोकांवर धर्मगुरु आणि राजे यांचा दुहेरी अम्मल कसा चालू शकणार? इहलोकचें जिणें सुखाचें व्हावें म्हणून राजशासनाची आवश्यकता; पण त्यांत धर्मगुरूचीही छाप असली तर राजशासनपद्धति केवळ आपल्या एकान्तिक सामर्थ्यानें जितकी उपयोगी व्हावयाची तितकी होऊं शकेना. सर्वत्र असा आग्रह सुरू झाला कीं, धर्मगुरूंची ऐहिक सत्ता पार लयास जावी व भली कणखर अशी राजसत्ता निर्माण व्हावी. या आग्रहाचा जोर पाहून पोपमहाराजांनीही आवरतें घेतलें होतें. तरी पण अजून गांवोगांवच्या मठांकडे हजारों जमिनी लावलेल्या असत, लग्नादि संस्काराला धर्माधिकाऱ्यांची जरुरी असे, वारसे ठरविण्याच्या कामांतही त्यांचा हात असेच. अर्थात् हाही प्रकार बंद होत जावा, विशेषतः जमिनीचें जें लक्षावधि रुपयांचे उत्पन्न रोम शहरों पोपमहाराजांच्या खजिन्यांत जाऊन पडत असे ते तर मुळींच जाऊं नये असा रोंख सर्व राजे लोकांच्या दरबारी चालू होता. राजांना फौजा बाळगाव्या लागत; स्वाऱ्या करणें, परचक्रे सांभाळणे ह्या कामांना अतोनात पैका लागे. अर्थात् हा फुकाफुकी चाललेला पैसा घरच्या घरीं कां ठेवून घेऊं नये असा त्यांचा विचार होता. पोप चुळबूळ करूं लागले. अर्थात् खटक्यांचे प्रसंग वारंवार येऊ लागले. एकदा बिनसले म्हणजे परस्परांची उणीं काढण्याची प्रवृत्ति सुरू होते. पोप व त्यांचे अधिकारी तेवढे नीतिदृष्ट्या भ्रष्ट होते व राजे आणि त्यांचे साथीदार म्हणजे मोठे धर्मावतार होते असें मुळींच नव्हतें व नसावयाचेच. पण धार्मिकांच्या नांवाशीं अनीति नेऊन चिकटविली म्हणजे ती चांगली चिघळत जाते हें मर्म लोकांनी ओळखले होतें. शिवाय, कित्येक गांवचे भिक्षुक खरोखरच दुराचारी झाले होते व केवळ आचाराचें बंड शिल्लक राहिलें होतें. धार्मिक विचार स्पष्ट रूपाने समाजांत बळ धरून रहावे म्हणून कांहीं ठराविक आचार- विचार धर्मविचारांचे प्रणेते घालून देतात; पण कालांतराने त्या आचार-कांडांतील मूळ विचार शोषून जातो व घोटीव वळणाची कांहीं वाळकी उठाठेव मात्र शिल्लक उरते; पण ही माणसाची जाता कांहीं कांहीं वेळां अशी मद्दड बनते कीं, त्या त्या आचाराच्या भ्रमणकक्षेतून फिरत राहाण्यांत सर्व कांहीं आलें असा तिचा समज होऊन राहातो. उजळणी या शब्दाचा धात्वर्थ माणसें विसरतात. मलिन झालेला विचार उजळा देऊन जागृत करावा लागतो याची जाणीव राहात नाहीं. मूळ विचारांचें तेज नष्ट होऊन- ही वाडवडील करीत आले या भावनेचा रंग त्या त्या आचाराला गडद असा चढतो आणि कुंभाराचा हात सुटल्यानंतरही शतकानुशतक या चाकाचा गरगराट चालूच राहातो. लहान पोरें जशा समुद्राच्या रेताडांतील वाळक्या शिंपा ओंजळीत घेऊन त्यांजकडे पाहातात तसे आपण आचाराची टरफलें ओंजळीत घेऊन त्यांजकडे कौतुकानें पाहतों; पण आपण तरी दुसरें काय करणार? तीं टाकून दुसरें काय घ्यावयाचें हें कोणी दाखवीतोपर्यंत असेंच व्हावयाचें. असो. युरोपांत हेच झालें होतें. ठराविक वळणें बसून गेलीं होतीं. पण लूथर जन्मास येण्याच्या आधीं थोडी चलबिचल सुरू झाली होती. बुद्धिमान् लोक हीं कोंडाळीं पत्करीनात. खुद्द धर्माधिकाऱ्यांतही चळवळ सुरू झाली होती. धर्म व नीति ही एकत्र असावयास हवीं अशी घोषणा सर्वत्र उठत होती. केवळ विश्वास म्हणजे श्रद्धा कोणास पटेना. जो तो कारण विचारूं लागला. 'हें कां बरोबर?' असा जोराचा प्रश्न सर्व लोक करूं लागले. ज्याला त्याला मीमांसा हवीशी वाटू लागली. अर्थात् या सार्वत्रिक भावनेचे जोराचे पुरस्कर्ते उत्पन्न होणें ओघानेच प्राप्त झालें. बुद्धिमंतांतून इरॅस्मस हा धिटाईनें पुढे आला आणि धार्मिक विचारांच्या लोकांतून मार्टिन लूथर हा निघाला.
मार्टिनच्या घरीं रोजचें धार्मिक कर्म म्हणून त्यास कांहीं शिकविलेलें होतेंच; पण त्याचें रूप अगदी साधें होतें. म्हणजे एक दोन प्रार्थना, अष्टकें, स्तोत्रे इतकेंच; पण मागे उल्लेख आलाच आहे कीं, आपण पातकी आहों व यासाठीं परमेश्वर आपणांस शिक्षा करील, ही भावना लूथरच्या चित्तांत कायम झाली होती. लूथरच्याचशी काय, तत्कालीन सर्वच ख्रिस्त्यांच्या मनांत हीच भावना बद्धमूल झालेली होती. परमेश्वर म्हणजे कोणी एक तिरसट, आडदांड पंतोजी असून वेळोवेळीं खसाखस अंगावर येतो, त्याला दया-माया मुळींच नाहीं; तुम्ही पुढे जातांच एकाद्या तामसी संन्याशाप्रमाणे एकदां तुमच्याकडे करड्या नजरेनें पाहातो व सजा बजावितो इतकीच तत्कालीन ख्रिस्तीसमाजाची परमेश्वरविषयींची कल्पना होती. तो दयाघन आहे, पातकांची क्षमा करतो, त्याला दोन हात जोडून शरण गेलें तर तो आपले अपराध पोटांत घालतो अशा प्रकारचें परमेश्वराचें कारुणिक स्वरूप त्यांनी पत्करिलें नव्हतें. परमेश्वर म्हणजे एक केवळ कडकडीत पावित्र्याचा पुतळा, आपण पातक्यांनीं त्याच्या आसपासही फिरकण्यालागीं नाहीं, त्याच्या जाज्वल्य पावित्र्याला भिऊन त्याच्यापासून शंभर कदमांवर उभे राहावें व पतिताप्रमाणें दूर उभें राहून त्यास वंदन करावें असेंच त्यांस वाटे. प्रत्यक्ष येशू ख्रिस्त, की जो मनुष्ययोनीच्या पारमार्थिक कल्याणासाठीं फांसावर चढला, सर्व लोक शिक्षेतून मुक्त व्हावे म्हणून ज्यानें आपला आत्मा दंडनासाठीं परमेश्वराजवळ गहाण टाकिला, व दयालुत्व हेंच ज्याचें जीवितांतील सारसर्वस्व तोही महा कडक, करडा, भोंवतीं मोठी कदर उत्पन्न करणारा असाच होऊन बसला होता. एतावता काय कीं, देव ही आवडती आणि प्रेमाची वस्तु नसून शिक्षा करावयास टपलेल्या दंडेल अधिकाऱ्याचीच प्रतिमा आहे अशी सरसहा समजूत होती. परमेश्वर जर असा व आत्मिक कल्याण जर त्याच्या हातीं तर मग तें साधावें कसें? आपण तर पातकी हे खास; मग तरणोपाय काय? याला माणसाच्या व्यवहारज्ञ मनानें उत्तरही शोधून काढिलें.
येशू असेल कडक, पण त्याच्या दरबारांतील अमीर-उमराव जे Saints म्हणजे संत त्यांच्याकडे बोलणें लावले पाहिजे. तसेंच या येशूची आई जी महासाध्वी मेरी तिला शरण गेलें असतां तिला कळवळा येईल व हे संत व विशेषतः त्याची परमप्रिय माता यांनी भीड खर्च केली तर येशू इतकासा कठोर राहाणार नाहीं, त्यांच्या मुर्वतीस्तव तो आपल्याला क्षमा करील अशी समजूत झालेली होती व तीस अनुसरून संतपूजा व मेरीची पूजा सर्वत्र पसरली होती. पण येवढ्यानेंच झालें नव्हतें. येशूला वळवावयास मेरीच उपयोगी हें खरें; पण मेरी वळेना तर? अर्थात् तिच्या आईकडे म्हणजे ॲनकडे जाणें युक्त, असा कयास होऊन ॲनची पूजाही सुरू झाली होती. तिचें नांवही एका शहराला देण्यांत आलें होतें. म्हणजे काय कीं, परमेश्वराच्या मूळ स्वरूपासंबंधींच्या कल्पना लुप्त होऊन केवळ भीतीनंच त्यांची मनें त्रस्त झालेली असत. यांत आणखी एका गोष्टीची भर पडली होती.
सर्व युरोपांत प्लेगचा प्रसार जारी झाला होता आणि हा परमेश्वरी क्षोभ आहे अशी ठाम समजूत बनली होती. तिकडे उंडारलेल्या तुर्कांचेही भय सारखें मागें लागलें होतें. त्यांच्या फौजा बाल्कन् द्वीपकल्प पोटांत घालून वीएनापर्यंत येऊन थडकलेल्या होत्या व त्यांचा जोर असाच कायम राहिला तर थोड्याशा वर्षांत ख्रिस्ती राष्ट्रांची फटफजिती उडेल; इतकेच काय, ख्रिस्ती धर्म व संस्कृति हीं ठार होतील ही धडकी सर्वत्र पसरली होती. अर्थात् या भावी अनर्थांच्या आगाऊ निष्कृतीसाठीं व्रत- वैकल्ये, उपासतापास, जपजाप्य, यमनियम, तीर्थयात्रा, नवससायास यांचाही सपाटा सुरूच होता. लोकांना जादूटोणा, चेटूक इत्यादि गोष्टी खऱ्या वाटत. कारण सैतान जो तो श्रद्धाळू लोकांना भ्रष्ट करावयासाठी काय करामत करील न कळे अशी चिंता त्यांस वाटत असे.
खुद्द लूथर मोठा धर्मसुधारक खरा; पण तसा तो भित्राच असे. चेटकादीवर त्याचा विश्वास होता. ही जी तत्कालीन ख्रिस्ती मनाची ठेवण वर्णिली आहे तीच लूथरच्या मनाचीही होती. लहानपणापासूनच तो तरी एकदम खडखडीत निराळा कसा असूं शकणार? वयांत आल्याबरोबर पोटाच्या धंद्याला लागणारी सामान्य माणसें वर लिहिलेलें देवादिकांचे प्रकरण उमगतच; पण त्याच्या छाननीकडे लक्ष देण्यास, त्याची शहानिशा करावयास व अनुकूल प्रतिकूल असें कांहीं प्रत्यक्ष करण्याला त्यांस कामाखालीं उसंत तरी कोठली असणार? पण लूथरचें तसें नव्हतें. तो विद्वान् होता, आत्मानात्मविचारास त्याला सवड होती व जात्याच मनाची रचना धर्मविचारप्रवण असल्यामुळे या विचाराचा ठाव पाहिला पाहिजे अशी हौस त्याच्या ठिकाणीं उपजली होती. तो बुद्धीने चांगला चपळ व वादविवादाच्या कोटिक्रमांत चांगला सराईत होता. पण हे सर्व खरें असले तरी उपर्युक्त आत्मिक भीति त्याच्या चित्तास पोखरीत असे. या विचाराच्या मार्गे सारखे लागल्यावांचून आपल्या आत्म्याचें कल्याण होणार नाहीं, व हा परमेश्वरी शिक्षेचा ससेमिरा चित्ताला शांति मिळू देणार नाहीं, हें पाहून त्यानें जोगी होण्याचें ठरविलें. एकदां जोगी होऊन बसल्यावर मग खुशाल गूढ चिंतनांत वेळ घालवावयास सांपडेल, त्याच विचारांत वावरणारांशीं गांठीभेटी होतील व विचारांची देवघेव होऊन कांहीं उलगडा होईल असा त्याचा अजमास होता. कित्येक म्हणतात कीं, त्याला एकदम उपरति झाली व कांहीं आगापिच्छा नसतांना तो 'साधु' बनला. कसेही असो. हा विचारी पुरुष आपल्या गोतांतून तटकन् उठून बैरागी बनला.
आतां आत्मानात्मविचारास त्याला वाटेल तितका वेळ मिळू लागला. ऑगस्टिनियन बैराग्याच्या मठांत लूथर दाखल झाला होता. तेथें तरी थोडी उमेदवारी केल्याशिवाय त्याला मुंडावयास ते अर्थातच तयार नव्हते. त्याची बुद्धि, विवेचकपणा व तळमळ पाहून मुख्य महंतही खूष होई. तेथें आत्मविद्येचा अभ्यास चालत असे; पण लूथरनें भगवी वस्त्रे केवळ या अभ्यासासाठीं पांघरली नव्हती. त्याला आत्मिक कल्याणाची प्रत्यक्ष चिंता लागली होती. आत्मविद्येचा अभ्यास हा कदाचित बुद्धीचा विलास होऊ शकेल; पण माझ्या जीवाचें पुढें कसें होणार? हा निकडीचा विचार केवळ शिळोप्याचाच राहू शकत नाहीं. मी पातकांतून निघून कसा मुक्त होईन? परमेश्वर म्हणतो माझें आज्ञादशक नीट संभाळ म्हणजे सर्व कांहीं होईल; पण हें आज्ञादशक पाळणें तरी कसे शक्य आहे? हरघडी या आज्ञा मोडाव्या लागत आहेत. असें जर आहे, म्हणजे प्रत्येक मानवाला जर या आज्ञा मोडाव्या लागतात तर त्या करण्यांत तरी काय तात्पर्य व त्या पाळणेंच जेथें अशक्यप्राय तेथे मोडल्या म्हणून शिक्षा तरी काय म्हणून? नियमांतून जो घसरेल त्याला शिक्षा; पण घसरणे हाच जर नियम झाला, तर शिक्षा तरी कशी संभवते परमेश्वर म्हणतो, मी तुला क्षमा करीन- होय, पण ती केव्हां? तर तुला अनुताप होऊन तुझी चित्तशुद्धि होईल तेव्हां. पण हा अनुताप तरी इतका खोल व चित्तांतील किल्मिषें दग्ध करील इतका दाहक कसा व्हावा? एतावता काय कीं हा अनुताप होणें नाहीं; अनुताप नाहीं तर परमेश्वरी क्षमा नाहीं व केवळ आज्ञा पाळल्यानें मुक्ति मिळावयाची ती तर केवळ अशक्य. म्हणजे काय कीं, परमेश्वरी क्षोभ शिल्लकच उरतो. या विचाराच्या चक्रव्यूहांत लुथर भ्रमत असतां त्या मठांतील एका महंतानें त्याला मंत्र दिला कीं, तूं येशूवर श्रद्धा ठेव व केवळ तन्मय होऊन त्याच्याद्वारा परमेश्वरी पावित्र्य अंगीं आणण्याची खटपट कर म्हणजे त्यांत सर्व आलें. येशूच्या द्वारा माणसाच्या आत्म्याला परमेश्वराशीं अल्पांशीं तरी सरूपता प्राप्त करून घेतां येते, हाच या मंत्राचा निष्कर्ष असावा. या उपदेशानें लूथरचें चित्त शांत झालें. त्याच्या मनांतील हजारों संदेह मावळून गेले. त्याच्या चित्तास आनंद झाला व बैराग्याच्या वेषाचें चीज झालेंसें त्यास वाटूं लागलें.
इतकें होईतों एक वर्ष निघून गेलें व लूथरची बुद्धि व कडकडीतपणा पाहून मठाधिकारी महंतांनीं विचार केला कीं, ज्या पक्षीं हा आपल्या कसोटीस उतरला आहे त्या पक्षी त्यास मुंडावयास हरकत नाहीं. लवकरच त्याला उपाध्येपणाची दीक्षा यथाविधि देण्यांत आली. उपाध्याय व उपदेशक बनण्यांत कांहीं गैर आहे असा किंतुही लूथरच्या मनांत कधीं आला नाहीं. परमेश्वर क्षमा करतो पण व्हावयास येशूपुढें सश्रद्ध लीन झालें पाहिजे या गोष्टीवर त्याचा आतां पूर्ण विश्वास बसल्यामुळे इतरांना तो सांगावयास आणि संशयी आत्मे सन्मार्गावर आणण्यास संकोच बाळगण्याची जरूरी नाहीं असें ठरवून तो उपाध्याय बनला. नवीन निघणाऱ्या विटंबर्ग येथील विश्वविद्यालयांत शास्त्री म्हणून त्याची नेमणूक झाली. बुद्धिमान्, काटेकोर विचार करणारा व तळमळीनें बोलणारा असल्यामुळे हां हां म्हणतां सर्व जर्मनीभर उत्तम अध्यापक म्हणून त्याची कीर्ति पसरली. त्याचीं भाषणे ऐकावयास चोहोंकडून विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी जमा होऊं लागल्या. सहकाऱ्यांचाही त्याच्यावर विश्वास उत्पन्न झाला आणि लवकरच कांहीं कामानिमित्त आपला प्रतिनिधि म्हणून त्यांनीं रोम शहरीं त्याची रवानगी केली.
ख्रिस्ती धर्माच्या या आचार्यपीठाश लूथरचा प्रत्यक्ष संबंध असा हा पहिलाच आला. रोमला जातांना आपण एका मोठ्या तीर्थास जात आहों अशी त्याची भावना होती. तेथील प्रकार पाहून मात्र स्याला पराकाष्ठेचा विस्मय व उद्वेग वाटला. जे उपाध्याय म्हणून मिरवत ते केवळ नास्तिकांसारखे वागत आणि खुद्द प्रार्थनेच्या वेळी फिदीफिदी हंसत. यांच्यावरचे जे उपगुरु ते शुद्ध बदफैली लोक होते. खुद्द आचार्य जो दुसरा ज्यूलिअस तो निदान संस्थानाचा कारभार तरी नीट चालवी; पण त्याच्या आधींचा जो अलेक्झांडर तो मात्र महा पागल म्हणून सर्वांना माहीत होता. यांत एक मात्र ध्यानांत ठेवावयास हवें कीं, रोमन लोक जर्मनांना शुद्ध नंदीबैल समजत व या त्यांच्या प्रवृत्तीमुळें लूथरचें मन अगोदरच पूर्वग्रहदूषित होतें असें म्हणावयास हरकत नाहीं. तिकडून परत आल्यावर विटंबर्ग येथे आत्मविद्येचा तो मुख्य अध्यापक झाला. इतर ठिकाणी ही जागा पत्करतांना 'पोपची आज्ञा उल्लंघिणार नाहीं' अशी शपथ घ्यावी लागत असे. तसें येथें नव्हतें. इतकेंच कीं, धर्मपीठानें जें मत त्याज्य मानिलें तें मात्र या अध्यापकांनीं पत्करणें गैरकायदा होतें. या ठिकाणचींही लूथरची प्रवचनें फार रसभरित होत. अर्थात् तरुण लोकांवर त्याची मोठी छाप बसली आणि लवकरच लूथर म्हणजे एक बडे प्रकरण होऊन बसलें. अशा प्रकारें सर्व प्रकार सुरळीत चालू असतां उत्पाताची वेळ नजीक येऊन ठेपली.
To sell indulgences हा शब्दप्रयोग इंग्रजी इतिहासांत सर्वांनी वाचला असेल व त्याचा अर्थ "पापविमोचन विकणे" असा स्थूलपणे समजण्यांत येतो. पण ही कल्पना बारकाईनें पाहिली पाहिजे, आणि तशी ती पाहिली तरच लूथरचें म्हणणें नेमके काय होतें हें ध्यानांत येईल. Indulgence म्हणजे सूट किंवा माफी. एकाद्याने पातक आचरिलें व त्यास अनुतापही झाला आहे असें जरी असले तरी, जुन्या ख्रिस्ती धर्म समजुतीप्रमाणे, या पातक्याने कांहीं तप करावें लागतें; म्हणजे प्रत्यक्ष देहदंड सोसावा लागतो. पण पातक झालें, पश्चात्तापही झाला; तरी देहदंडन सोसावयाचें होईना तर काय करावयाचें? अशा माणसाला सद्गति नाहींच काय? केवळ पश्चात्तापानें शुद्धि नाहीं म्हणून मुक्तीही नाहीं. पश्चात्ताप तर झालाच पाहिजे; पण त्यावर देहदंडनही सोसलें तर मात्र माणसाला सद्गति मिळते अशी जुन्या ख्रिस्त्यांची समजूत. पातक्याला अनुतापही होईना तर तो नरकलोकास जातो; अनुताप झाला तर हें वांचतें. पण देहदंडन झाले नसेल तर आत्म्याला भयंकर क्लेश देणारा असा दुसरा एक 'पर्डिशन' नांवाचा 'यातनालोक' आहे, तेथें जावें लागतें. पण अवश्य तें देहदंडनही झालें असेल तर या 'यातना-लोका'कडे आत्म्याची पाठवणी अर्थात् व्हावयाची नाहीं. अशा ह्या अनुतप्त व देहदंडित पातक्यास मुक्ति मिळावयाची अशी समजूत होतो. यांत एक गोम आहे. अनुताप होणें हा एक मनोधर्म आहे व तो पातक्याला होईलही. निदानपक्ष झाल्याचा देखावा तरी पातकी करील. खरे की खोटें हें पाहावयास अर्थात् कांहीं साधन नाहीं. पण 'यातना-लोक' चुकवावयास देहदंडन हवें व तें तर प्रत्यक्ष व्हावयास हवें. केवळ झालें म्हटल्यानें भागण्यासारखें नाहीं. अर्थात् येथें काय ती खरी अडचण होती. पातकी सगळेच असत व अनुताप झाल्याचा निदान बहाणा तरी सर्वांसच करतां येण्यासारखा होता. पण देहदंडाचें काय? बहुतेक वेळा अगदीं मरणाच्या द्वारी आल्यावरच माणसाला अनुताप होतो, मग त्याच्यापुढे त्यानें देहदंडन केव्हां सोसावयाचें? किंवा अनुताप होऊनही मनुष्य अशक्त असला, व्यथित असला किंवा वृद्ध असला तर त्यानें 'यातना-लोक' चुकवावयासाठीं देहदंडन कसे करावयाचें? अशा लोकांची कांहीं तर्तूद होणें जरूरच होतें व ती तशी झालीही. जर येशू ख्रिस्ताचे प्रतिनिधि जे धर्मगुरु ते म्हणाले की, "तुला देहदंड माफ आहे" तर देहदंडनाशिवाय पातक्याला सद्गति मिळूं शके. ही जी देहदंडाची माफी किंवा सूट देणें त्याचें नांव 'इन्डलजन्स' व या सुटीसाठीं दक्षणा घेणें त्याचें नांव selling indulgence सूटपत्र किंवा माफीपत्र विकणें. हा मोबदला होता म्हणून माफीचा विक्रय असें व्यावहारिक नांव त्यास मिळालें.
याच्या जोडीला दुसरीही एक कल्पना ध्यानांत ठेवावयास हवी. वर एके ठिकाणीं असें आलेच आहे कीं, येशू ख्रिस्तानें आपला आत्मा गहाण टाकिला व सर्व लोकांचें तारण केलें. येशूचा पुण्य-संचय एवढा मोठा कीं, अखिल मानव प्राण्यांना त्यांच्या पापांतून मुक्त करून स्वर्गी पोहोंचविण्यास त्याचा एकट्याचा पुण्यसंचय सहज पुरेसा आहे असें परमेश्वरानेंसुद्धां मानिलें. अखिल ख्रिस्ती समाजाच्या सर्व धर्ममताची उभारणी या पायावर कायम केलेली आहे. यांतूनच एक एक विचारतंतु कसा वाढला हें पाहाण्यासारखे आहे. सर्वांच्या उपयोगी पडणारा येशूचा हा पुण्यसंचय लोकदृष्ट्या मिळवणी न होतां राहू शकला नाहीं. आपापली मुक्ति साधण्यासाठी सर्वांनी येशूच्या पुण्यसंचयरूप गंगाजळींतून पुण्य घ्यावयाचें हें खरेंच पण या गंगाजळींत लोकदृष्ट्या शतकानुशतकें भर पडत चालली होती. येशू जसा मोठा तसे त्याचे शिष्यवर आणि संतमहंत हेही मोठे व येशूनें ठेविलेल्या गंगाजळींत यांचेही पुण्य सामील होऊन ती फुगत जावयाची. संतमहंत जसे मोठे तसे जे जे कोणी सत्कृत्ये करून पुण्य संपादितील त्यांचें पुण्यही या विशाल पुण्यकोशांत दाखल व्हावयाचें अशी विचारसरणी चालू झाली आणि ही विचार-परंपरा साहजिकच होती. येशूची पुण्याई जर इतरांच्या उपयोगी पडते, तर संतमहंतांची कां पडूं नये? व संतमहंतांची जर पडावयाची तर लहानसहान लोक आपापल्यापरी जो पुण्यसंग्रह करतात तोही कां उपयोगी पडूं नये? अर्थात् आजपर्यंत जें जें म्हणून पुण्य झालें आहे त्या सर्वांची एक प्रचंड गंगाजळी झाली आहे व होत आहे, असा लोकांचा समज. ज्या पातक्यांना पापविमोचन हवें असेल त्यांनीं या खजिन्यांतून जरूर व शक्य तेवढें पुण्य उचलावें असा विचार त्या काळच्या लोकांत स्पष्टपणे रूढ झाला होता; पण या सार्वजनिक खजिन्यांतून तरी पुण्यांश कोणास मिळावयाचा? तर वर सांगितल्याप्रमाणे जे कोणी पातकी अनुतप्त झाले; परंतु देह-दंडनास मात्र अपात्र ठरले त्यांसच फक्त मिळावयाचा आणि बहुतेक सगळेच लोक एवंगुणविशिष्ट असल्यामुळे सर्वांनाच मिळावयाचा. आतां जिवंत माणसास हा पुण्यांश मिळणें जर शक्य व युक्त आहे तर यातना-लोकांत अडकलेल्या मृतांस त्यांच्या पुत्रपौत्रांच्या द्वारे तो मिळणें तितकेंच शक्य व युक्त होतें. हा पुण्यांश मिळणें म्हणजेच वर सांगितलेली देहदंडनाची माफी किंवा सूट मिळणें होय. इकडे एका 'क' नांवाच्या गृहस्थास धर्मगुरूच्या द्वारां माफी मिळाली म्हणजे तिकडे सावर्जनिक गंगाजळींत तितकें पुण्य खर्ची पडलें असा न्याय मानीत असत. ही सूट मिळवितांना प्रायश्चित्तदक्षिणा देणें हेंही सामान्य लोकांच्या दृष्टीनें अगदीं ओघानें येणारेंच होतें. जें आपणांस धर्मशास्त्रांत सांगितलेल्या पद्धतीच्या देहदंडनानें साधतां येईना तें इतर ठिकाणीं आपला देह झिजवून आपण जें द्रव्य संपादिलें असतें तें खर्चून कां साधतां येऊं नये? देहदंड विहित पद्धतीनें सोसावयाचा त्याच्या ऐवजीं लौकिक पद्धतीनें सोसून जें द्रव्य संपादिलें तें त्याच कामासाठीं खर्च केलें म्हणजे देहदंडनाचें श्रेय मिळावयास हरकत असूं नये असा व्यवहारज्ञानी माणसांचा हिशेब असावा. हा सर्व लोकोपयोगी पुण्यसंचय येशूचे प्रतिनिधि जे धर्मगुरु म्हणजे रोम शहरचे पोपमहाराज त्यांच्यापाशीं असतो अशी सार्वत्रिक समजून होती व या पोपनें आज्ञापत्रे काढिली म्हणजे गावोगावच्या धर्माधिकाऱ्यांस या गंगाजळीच्या बळावर दक्षिणा घेऊन माफीपत्रे विकतां येत असत. अशी ही माफीपत्रे विकण्याची कल्पना होती.
ही माफीपत्रे घेण्याचा सपाटा सर्वत्र सुरू झाला. पोप दहावा लिओ यानें बांधूं घातलेल्या एका देवळाचें काम खितपत पडलें होतें. तें पुरें करावयास पैसा पाहिजे होता. हा माफीपट्टा त्याने विकावयास काढून गांवोगांव आज्ञापत्रे धाडलीं. वर दिलेल्या इतक्या बारकाव्यांत सामान्य लोकांना शिरतां येईना. ते समजूं लागले की, हा माफीपट्टा एकदां विकत घेतला की काम झालें. देहदंडन लांबच राहिले; पण अनुतापाची सुद्धां जरूर नाहीं असा त्यांनी समज करून घेतला. वास्तविक लूथरच्या मतानेही केवळ तत्त्वदृष्ट्या यांत म्हणजे वरील बारकाव्यांत कांहीं गैर होतें असें नाहीं. पण लोक त्याचा भलताच अर्थ करतात व अनुतापाचीसुद्धां जरूर नाही असे मानितात, ही गोष्ट त्याला फार भयप्रद वाटली. उपाध्याय म्हणून तो जेव्हां आसन्नमरणांची जबानी घ्यावयास जाई तेव्हां ते माफीपट्टा दाखवीत आणि म्हणत 'आतां पातकाचा पोटउकला करण्याची जरुरी काय?" हें पाखंड बंद झालेच पाहिजे, असें ठरवून त्यानें आपले शस्त्र उगारिलें व मठाच्या दरवाज्यावर माफीपट्ट्यांतील प्रमेयांचे खंडन छापून चिकटवून दिलें. जिकडे तिकडे याचा गवगवा झाला, लूथरचें म्हणणें कीं, पातक्याला अनुताप हा झालाच पाहिजे व देवाने सांगितलेला अनुताप झाल्याशिवाय आचार्यपीठासही माफी देतां येत नाहीं. उत्तरोत्तर वादाचें मूळ या बाबींतून लांबत चाललें. अनुतापादि प्रकारांसंबंधीं लूथरप्रमाणेंच हजारों विद्वानांचें मत होतें. पण आचार्य-पीठास अमुक एक म्हणण्याचा हक्क वा योग्यता नाहीं हें जें लूथरचें म्हणणें तें पुष्कळांस मानवेना. तुमचें म्हणणें काय आहे तें मजपुढें प्रत्यक्ष येऊन मांडा म्हणून पोपनें लूथर यास आज्ञापिलें. रोम शहरीं गेल्यावर परत येण्याची शाश्वती नाहीं असें त्यास वाटल्यावरून राजे- महाराजे मध्यस्थी घालून, जर्मनींतच पंचायत झाली तर मी जबानीस येतों असें त्यानें कळविलें! पोपनें हें पत्करलें. ऑग्जबर्ग गांवीं कॅटेजन याच्याशीं तूं वाद करून आपलें म्हणणें सिद्ध कर असा इषारा त्यास आला. कॅटेजन म्हणूं लागला, तूं आपलें पाखंड पहिल्याने परत घे, मग तुझ्याशीं वाद करतां येईल. लूथर कबूल होईना. शेवटीं सभेतून कांहींच निघालें नाहीं आणि हें प्रकरण येथेंच थबकले. पण पोपला निकाल लावून घेणें भाग होतें. कारण लूथरनें माफीपट्ट्याचें खंडन प्रसिद्ध केल्यापासून त्याची विक्री सपाट्यानें बसत चालली व रोम शहरीं गल्ला जमा होईना! अर्थात् पोपनें मिल्टिझनाम्या दुसऱ्या शास्त्र्यास वादासाठीं पाठविलें. हा गृहस्थ शास्त्रही जाणी व घावडावही जाणी. त्यानें लूथरकडून लिहून घेतलें कीं, आचार्यपीठाविषयीं आपणास आदरभाव आहे; आणि माफीपट्ट्याला परमार्थ- विचारांत महत्त्व आहे. पण पोपमहाराजांच्या अधिकाराविषयीं प्रश्न उपस्थित झाला होता तो तसाच लोंबत राहिला. जॉन एक यानें या वादास रंग आणिला व प्रतिपादिलें कीं, पोपचा अधिकार मानिलाच पाहिजे, तरच ख्रिस्ती माणूस ख्रिस्ती राहू शकतो. यासाठी मोठी वादसभा भरली व तींत लूथर थोडासा नामोहरम झाला. तरीपण त्याचें मुख्य मत जें कीं, 'येशूवर श्रद्धा असली म्हणजे तो ख्रिस्ती; मग त्याला पोपचा अधिकार मान्य असो वा नसो', तें प्रतिपादावयास त्याने सुरुवात केली. 'धर्म ज्याचा त्याचा आहे, त्यानें पोपास मानिलेंच पाहिजे हें खोटें आहे; उलट धर्मासारखी स्वतंत्र वस्तु पोपनें आपल्या मालकीची करून ठेवून तीस बंदींत घातलें आहे; म्हणून सर्व ख्रिस्त्यांनीं स्वतंत्र व्हावें व हें करावयास पोपशीं जोराचा विरोध करावा.' असे विचार जर्मनीभर त्यानें पसरून दिले. माफीपट्टे लोकांनीं घेतल्यामुळे देशांतून खंडोगणती पैसा परदेशीं म्हणजे रोमकडे जात असल्यामुळे ठिकठिकाणचे राजे-महाराजे यांना हें लूथरचें प्रतिपादन पसंतच पडलें व त्यांनीं आंतून त्याला चांगलीच फूस दिली. कित्येक ठिकाणचे शास्त्री-पंडितही म्हणू लागले, कीं ज्या पवित्रशास्त्राच्या जोरावर पोप असला हक्क सांगतात त्या शास्त्राचा अर्थ करण्याचा मक्ता पोपासच कोणी दिला? पवित्रशास्त्रावरून पाहतां पोपला असली अम्मलदारी प्राप्त होत नाहीं. याप्रमाणे सगळीकडूनच अंगाशी येत आहे हें पाहून पोप थोडा चपापला; पण त्याच्या हातीं एक जबरदस्त शस्त्र होतें, तें त्यानें उपसले. त्यानें लूथरवर ग्रामण्य पुकारलें च आज्ञापत्र काढून फर्माविलें कीं, लूथर हा पाखंडमतवादी आहे, तो ख्रिस्ती धर्मांतून बहिष्कृत आहे व सर्व श्रद्धाळू ख्रिस्त्यांनी त्याच्याशी असलेला आपला संबंध तोडून टाकावा हें आज्ञापत्र कसलें, विजेचा लोळच तो. लूथर भला खंबीर होता व लोक आपल्या पाठी आहेत ही त्यास माहीत होते. पोपचें कृत्य कडकडीत, तसें लूथरचें प्रत्युत्तरही कडकडीतच हवें होतें. "पोपच्या आज्ञापत्राची संभावना काय करतों ती पाहावयास या" अशी दवंडी त्यानें पिटविली. दुसरे दिवशीं शहरांतील तमाम लोक मठापुढें जमा झाले. एका महंतानें एक चिता पेटविली. हातीं आज्ञापत्र घेऊन लूथर पुढे झाला आणि आज्ञापत्रास उद्देशून गरजला कीं, "त्वां येशूच्या परमेश्वरास अवमानिलें, दुखविलें, म्हणून मी आतां तुझी होळी करतों." असे म्हणून त्यानें तें पत्र आगीत झुगारून दिलें!
या त्याच्या भयानक कृत्यामुळे जिकडे तिकडे कल्लोळ माजला. मतांच्या बारीक बारीक छाया पडछाया समाजांत नेहमीच असल्यामुळे घरोघरीं मतभेद, भांडणें, केशाकेशी, ग्रामण्यें, बंडें यांचा सुकाळ झाला. सर्व युरोपभर या चितेचा उजेड पडला. हा शुद्ध मूर्खपणा आहे असें कोणास वाटलें. झालें तें ठीक झालें असें म्हणणारेही हजारों होते. असली बंडखोरी पायाखालीं ठेचून टाकिली पाहिजे अशी आरोळी श्रद्धाळू धार्मिकांतून उठली व रोमन आचार्यपीठाच्या वतीने मोठमोठाले राजे आपल्या फौजा या धर्मभ्रष्ट जर्मनीवर वळविणार असा बोभाटा उठला.
पोपनें सम्राट् चार्लस यांस हांक मारून कांहीं इलाज करा म्हणून सांगितलें. कारण पवित्र- रोमन- साम्राज्याचा मुकुटमणि तोच होता. त्याला मोठी पंचाईत झाली. त्याचे हितसंबंध यूरोपभर पसरले होते. त्याला कोणासही दुखवावयास नको होतें. जर्मनीतील आपले राजे- मित्र लुथरला अनुकूल आहेत हें त्यानें ओळखिलें होतें. म्हणून आपल्या हिताहिताची नीट व्यवस्था लावून त्यानें लूथर यास कळविलें कीं, "तुम्हांस इकडून अभय देण्यांत येत आहे; तुमचें म्हणणें आमच्या दरबारीं येऊन कथन करा." चार्लसचा दरबार म्हणजे हजारों राजे- रजवाडे, अमीर उमराव, आचार्य, शास्त्री, पंडित यांनी खेचलेला असावयाचा. लूथरनें आमंत्रण स्वीकारिलें. दरबार वर्म्स शहरीं भरला होता. तिकडे जावयास तो निघाला तो वाटेनें त्याचा मान एखाद्या विजयी वीराप्रमाणें होत चालला. दरबारांत त्याच्या सर्व लिखाणांचा एक ढीग रचून ठेविला होता. त्याजकडे बोट दाखवून खटला सुनावणारा म्हणाला, "हें सारें पाखंड आहे, तुम्ही परत घ्या." लूथर म्हणाला, "हें पाखंड आहे असें पवित्र शास्त्रांतील आधारांनी सिद्ध झाल्यास मी स्वतःच हे ग्रंथ जाळून टाकीन." चार्लसनें कळविलें कीं, "या प्रकरणाचा फैसल्ला सरकारने नेमलेल्या कमिटीनें पूर्वीच केला आहे, आतां आधारांची वगैरे जरुरी नाहीं. तुम्ही पोप इत्यादिकांविषयीं जें कांहीं बहकलां तें परत घेतां काय?" लूथर म्हणाला, "पोप हा केवळ प्रमादरहित आहे असें मी समजत नाहीं. तोही चुकीस पात्र आहे; म्हणून माझीं मतें शास्त्राच्या आधारें बरोबर कीं चूक तें ठरवावें." राजा म्हणाला, "सर्व पंडितांची सभा चुकली व तुम्ही तेवढे बरोबर हें तुम्हांस भावतें तरी कसें?" लूथरनें उत्तर केलें कीं, "जें बोललों आहें तें खरें आहे. त्यांतून कांहीं परत घेणार नाहीं. देवा, तूं मजवर दया कर." चार्लसने दरबार खलास केला व वायद्याप्रमाणें लूथर यास आपल्या गांवीं जाऊं दिलें, पण साम्राज्यांतून त्यास बहिष्कृत केलें. या प्रसंगीं लूथरच्या धैर्याची कसोटी लागली. तो जर लेचापेचा माणूस असता तर दरबारास जावयाचेंच टाळता. पण हें साहस त्यानें आपल्या मतासाठी हौसेने अंगिकारिलें. असो.
यापुढें कांहीं वर्षे लूथर यास आपल्याच देशांत पण अज्ञातवासांत रहावें लागलें. जर्मन राजे त्यास आंतून अनुकूलच होते. त्यांनी सम्राट् चार्लसचा हुकूम रद्दीवजाच मानिला. लूथरच्या अज्ञातवासांत त्याने सुरू केलेला मतसंप्रदाय व विशेषतः प्रतिपादनांतील बेफिकिरी सर्वत्र पसरली व ठिकठिकाणीं अतिरेक होऊं लागला. शेतकऱ्यांनीं धार्मिक मतसंसर्गानें पण आर्थिक बंडें केलीं. लूथरचें शुद्ध धार्मिक बंड रूपांतरित होऊं लागलें. अज्ञातवासांतून बाहेर पडून त्यानें स्थिरस्थावर करण्यासाठीं पुष्कळ खटपट केली पण एकदां पेटविलेला वणवा काय वाटेल तें जाळूं लागला. त्याला तो आवरतां येईना.
वरील दरबारप्रकरणानंतर सुमारें पांच वर्षांनीं या जोगी उपाध्यायानें ब्रह्मचर्य बाजूस ठेवून लग्न करण्याचे ठरविलें. खुद्द त्याचे अनुयायी लोकही विस्मत झाले. ही नवरी म्हणजे अर्थातच मठांतील एक जोगीण होती. पुढें त्यानें गृहस्थाश्रमही चांगला आचरिला. धार्मिक ग्रंथांचीं भाषांतरें करणें, प्रवचनें करणें, अनुयायांस शिस्त लावणें इत्यादि उद्योगांत त्याचीं पुढील वर्षे गेलीं. त्यांपैकीं कांहींच या लहानशा चरित्रांत सांगण्याचें कारण नाहीं. त्याचा मुख्य पराक्रम वर वर्णिला आहे. लोकांच्या हातीं त्याच्या मताप्रमाणें धर्माची केवळ टरफलें राहिली होती. लोकांच्या पारमार्थिक कल्याणाची त्याला खरी कळकळ होती. तो स्वतः अत्यंत श्रद्धाळू अशा प्रकारचा सुधारक होता. पण आपले मत प्रतिपादण्यांत त्यानें कधींही कसूर केली नाहीं, स्वकीयांची भीड राखिली नाहीं. आणि अधिकाऱ्यांची जरब मानिली नाहीं. त्याच्या चरित्राचें सार हेंच आहे. वयाच्या एकेचाळिसाव्या वर्षी लग्न करूनही तो पुष्कळ मुलाबाळांचा बाप झाला. व संसारांतील निरनिराळे रस सुखानें अनुभवूं लागला. त्याला बायको फार चांगली मिळाली होती. पुढें पुढें लूथरचा आदा बऱ्या प्रकारें वाढला आणि त्यामुळे वाढल्या प्रपंचांतही त्याला दारिद्र्याची हाय पोंचली नाहीं. धर्मविषयक तत्त्वांचें चिंतन हा जरी त्याच्या मनाचा मुख्य हव्यास असला तरी मित्रमंडळीशीं हास्यविनोद करणें, अशासारखे प्रकार त्यास आवडत असत. तो गायनाचा थोडा शोकी असून बांसरी फार चांगली वाजवीत असे. व अंगीं थोडें कवित्व असल्यामुळे त्याच्या या सर्व सांसारिक सुखांना मोठी चव उत्पन्न झाली होती. तो विद्वान् होता हें खरें आहे; पण महान् पंडित होता असें मात्र नव्हे. पण मतस्वातंत्र्य हाच त्याचा जीवितहेतु होय. एरवीं पाहूं जातां तो थोडा करडा, कांहींसा संतापी व थोडा कहरी स्वभावाचा होता. असा हा युरोपांतील स्वतंत्र मतपंथाचा आद्यस्थापक सन १५३६ सालीं ख्रिस्तवासी झाला.