पान:Sulabh Vaastu Shastra.djvu/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आभिप्राय वास्तुशास्त्र अगर घरे बांधावयाचे शास्त्र या विषयावर मराठी भाषेमध्ये पुस्तकें नाहीतच म्हटले तरी चालेल. रा. रा. रघुनाथ श्रीपाद देशपांडे, बी. ई., यांनी या विषयावर लिहिलेल्या ग्रंथाची प्रत आगाऊ मजकडे पाठविली ती मी काळजीपूर्वक वाचून पाहिली, जुनी घरे पाइन नवीं बांधणे हा काही आजच नवीन शोध नाही. पूर्वी देखील असला धंदा करणारे "घरमोडे " पुण्यात होते. ही घरमोज्यांचे "राजाध्यक्ष" झाले, तरी “घरमोडयांचे काम" कमी झाले नाही. उलट गेल्या १० वर्षांत तें इतक्या झपाट्याने वाढले आहे की, हल्ली स्वतःचे नवीन घर बांधणे हा एक प्रत्येक यशस्वी संसारयात्रेतील कार्यक्रम समजला जातो. ___ अशा वेळेस एकतर निरक्षर सुतार, मेस्त्री, अगर आजकालचा पूर्ण " आंग्लाळलेला आर्किटेक्ट " याजकडे धांव घ्यावी लागते. घर कसे असावें याविषयी फारच थोड्या लोकांनी विचार केलेला असतो. मुख्यतः ज्यांना घरांत सर्व दिवस काढावयाचा असतो त्या “ गृहिणींना" तर घर बांधण्यापूर्वी त्यांतलें कांहींच कळत नाही. घरांत रहावयास गेल्यावर त्यांतील गैरसोयी नजरेस येऊ लागतात; पण त्यांचे पर्यवसान कुरकुरीत होते. पुष्कळशी घरें " गृहे " न होता हवापाण्यापासून बचाव करणाऱ्या मोठ्या पेट्या होतात. ही आपत्ती टाळावयाची असेल तर प्रत्येक घर बांधणाराने, निदान त्याच्या गृहिणीने वास्तु- शास्त्राचे थोडेबहुत ज्ञान करून घेणे जरूर आहे. ही गोष्ट मातृभाषेत या विषयावर ग्रंथ असल्या खेरीज शक्य नाही. या दृष्टीने रा. देशपांडे यांच्या या कृतीबद्दल मी मनःपूर्वक अभिनंदन करितो. या ग्रंथाचे वैशिष्टय असे आहे की तो निव्वळ एकाद्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर नसून, त्यांत प्रत्येक विषयाचा विचार जुन्या व नव्या दोन्ही पद्धतींनी केलेला आहे. यांत पुष्कळ आकृत्या घातलेल्या असल्यामुळे ग्रंथाची उपयुक्तता वाढली आहे. तरी पण वास्तुशास्त्र शिकणारांच्या दृष्टीने पाहिल्यास जास्त चित्रे पाहिजे होती. काही माहिती जास्त विस्तृत करणे जरूर होते. उलटपक्षी साधारण वाचकांच्या दृष्टीने पुष्कळशा गोष्टी वगळल्या असत्या तरी चालले असते. विजेने गाड्या चालणाऱ्या या काळांत चारशे पानांचा ग्रंथ (कादंबरीखेरीज) वाचावयास लोकांस फुरसत मिळत नाही. यास्तव साधारण घर बांधणाऱ्यांकरितां एक व काम करणा-या इंजिनियर लोकांकरिता वेगळा, असे पुस्तकाचे दोन भाग केले असते तर बरे झाले असते असे मला वाटते. तरी पण पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. दगडमातीसारख्या विषयावर अगदी सोप्या भाषेत ग्रंथ लिहून रा. देशपांडे यांनी मराठी वाङ्मयांत बहुमोल भर टाकिलेली आहे. अशीच कामगिरी त्यांच्या हातून उत्तरोत्तर होवो. गं. नि. गोखले ( प्रिन्सिपाल ) ता. २०-३-१९३० सिव्हिल इंजिनियरिंग कॉलेज, करावी.