७३० २. ज्ञानोदय १८ डिसेंबर १८९० महात्मा फुले : समग्र वाङ्मय रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले यांचा मृत्यू THE LATE JOTIRAO GOVINDRAO PHOOLE सुबोध पत्रिकेवरून असे कळते की, रा. रा. जोतीराव गोविंदराव फुले हे गेल्या शुक्रवारी रात्री पहाटेस दोन वाजता परलोकवासी झाले. हे वर्तमान ऐकून त्यांच्या इष्ट मित्रांस व इतर पुष्कळ लोकांस वाईट वाटल्यावाचून राहणार नाही. त्यांचा जन्म पुण्यास होऊन त्यांनी आपले आयुष्यही पुण्यातच घालविले. मरणसमयी त्यांचे वय सुमारे ६५ वर्षांवर होते. रा. रा. जोतीराव हे जातीचे माळी असून त्यांचे फुले घराणे त्यांच्या जातीत श्रीमान, वजनदार व प्रमुख मानिले जात होते. त्यांच्या वडिलांनी रा. रा. जोतीराव यास प्रथम मराठी शिक्षण देऊन पुण्यातील इंग्रजी शाळेत इंग्रजी शिकावयास घातले. त्यांच्या योगाने त्यांचे विचार व ज्ञान बरेच वाढले व त्यांच्या मनात आपल्या देशाविषयी व देशबांधवांविषयी कळकळ उत्पन्न झाली. आपल्या देशाचे हित कधी होणे असले तर ते स्त्रियास व शेतकरी वगैरे खालच्या प्रतीच्या बहुजन समाजास शिक्षण मिळाल्यावाचून व्हावयाचे नाही. असा त्यांचा विचार ठरून त्यांनी या कामास सन १८४८ साली आरंभ करून बुधवार पेठेत मुलींकरिता एक शाळा स्थापन केली. त्या शाळेत मुली येतील असे करून त्यास शिकविण्याकरिता ते आपण स्वत: जाऊन आपल्या कुटुंबासही पाठवीत असत. या शाळेच्या स्थापनेने गावात लोक अगदी खवळून गेले. रा. रा. जोतीराव यांची पत्नी शाळेत जात असता त्या बाईस लोकांनी खडे व दगड मारावे. गावातील ब्राह्मण मंडळी येथेच न थांबता त्यांनी जोतीराव यांच्या वडिलांस कळवून तो उद्योग बंद पाडण्याच्या हेतूने आपल्या मुलास त्यांच्याकडून घरातून घालवून देण्याचा प्रयत्न केला. गोविंदराव यांनी लोकांच्या आग्रहामुळे जोतीराव व त्यांचे कुटुंब यास फक्त अंगावरच्या वस्त्रानिशी घरातून घालवून दिले. तथापि तो पुरुष डगमगला नाही. त्या शाळेचा खर्च आरंभी त्यांचे मित्रमंडळांनी चालविला. पुढे त्यांनी या स्त्री शिक्षणाच्या कामाकरिता युरोपियन व एतद्देशीय गृहस्थांस पत्रे लिहून त्याजकडून द्रव्य साहाय्य मिळविले. शेवटी नुकतीच स्थापन झालेली दक्षणा प्राईज कमिटी या मंडळीकडून दरमहा पाऊणशे रुपये मिळू लागले. हे काम सरासरी नीट चाललेसे पाहून त्यांनी आपले लक्ष थोडे कमी करून दुसऱ्या उद्योगास हात घातला.
पान:Samagra Phule.pdf/७७१
Appearance