Jump to content

पान:Samagra Phule.pdf/७७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बडोदावत्सल : ७ डिसेंबर १८९० मे. जोतीराव गोविंदराव फुले यांचा मृत्यू पुणे येथील प्रसिद्ध मे. जोतीराव गोविंदराव फुले यांस ता. २७ नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्रौ दोन वाजता देवाज्ञा झाली. हे वर्तमान ऐकून त्यांच्या इष्टमित्रांस, हितचिंतकांस व मुख्यत्वेकरून सत्यशोधक समाजाचे सर्व अनुयायांस फार वाईट वाटणार आहे. मे. जोतीराव हे पक्षघाताच्या व्याधीने आज बरेच दिवसांपासून आजारी होते व शेवटी त्यातच त्यांचा अंत झाला. जोतीरावांचे नाव या जगात त्यांच्यामागे चिरकाल राहील अशी त्यांनी अनेक परोपकाराची वगैरे कृत्ये करून ठेविली आहेत व हल्ली ती मोठ्या झपाट्याने वृद्धीही पावत आहेत. पुण्यास स्त्री शिक्षणास प्रथम आरंभ जोतीरावांनी केला. त्या कामात त्याजवर जरी अनेक संकटे आली तरी बिलकुल न डगमगता दीर्घ प्रयत्न करून स्त्री शिक्षणाचे काम पुढे आबाद चालेल अशी व्यवस्था लावून दिली. त्याचप्रमाणे महार-मांग, चांभार वगैरे वर्गातील लोकांस शिक्षण देण्यास प्रथमतः जोतीरावांनीच आरंभ केला. दीनबंधु वर्तमानपत्र सुरू करण्यात जे कित्येक पुढारी होते त्यात जोतीराव हे एक मुख्य होत. यांनी कित्येक ब्राह्मण मंडळींवर आपला पगडा बसविण्याकरिता "सत्यशोधक समाज" स्थापन केला. या समाजाच्या आज शेकडो शाखा सर्व देशभर स्थापन झाल्या असून या समाजाने आपले इच्छित काम आजमितीस जितके केले आहे तितके इतर कोणत्याही समाजाने केलेले नाही असे त्याच्या चालू स्थितीवरून वाटते. जोतीराव हे चांगले लेखक असून कवित्वाचे अंगही त्यांस बरेच होते. त्यांनी निरनिराळ्या विषयांवर अनेक अखंड लिहिले आहेत. त्यांची सर्व कवने एकत्र करून जर "जोतीबाची गाथा" या नावाने एक ग्रंथ कोणी बाहेर पाडील तर जोतीरावांचे लेख कायम राहून लोकांसही फार उपयोग होणार आहे. जोतीराव यांस एक मुलगा आहे. तो हल्ली इंग्रजी शिकत आहे. जोतीरावांनी आपल्या हयातींत जी एकंदर कृत्ये करून ठेविली आहेत त्यावरून त्यांस हिंदुस्थानातील लुथर म्हणण्यास हरकत नाही. मरणसमयी त्यांचे वय ६५ वर्षांचे होते. या दृढनिश्चयी पुरुषाने शेवटपर्यंत आपले व्रत एकनिष्ठपणे चालविले याबद्दल त्यांचे द्वेष्टेच त्यांची स्तुती करू लागले आहेत. “निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेचि फळ" या साधोक्तीनुरूप सज्जनांकडून त्यांची स्तुती होणेच अवश्य आहे. ईश्वर जोतीरावांच्या आत्म्यास शांती देवो. DOO