Jump to content

पान:Samagra Phule.pdf/६०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६४ वाङ्मय महात्मा फुले : समग्र टाइम्स" च्या २३ सप्टेंबर १९९० च्या अंकात प्रथम प्रकाशित केली. ती चौथ्या आवृत्तीत प्रथमच समाविष्ट केली. महात्मा फुल्यांचे एक सहकारी स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी १८८७ साली “ख्रीस्ती बंधुजनांस विनंती” नावाची पुस्तिका लिहून तीत बायबल व ख्रिस्ती धर्म यातील विसंगतीवर सौम्य टीका केली. ती जोतीरावांना मुळीच आवडली नाही. त्यांनी ८ सप्टेंबर १८८७ च्या "ज्ञानोदय" च्या अंकात "स्वामीबंधु" या टोपणनावाने एक कवन प्रसिद्ध करून अय्यावारूंवर झोड उठवली. ज्या भाषेत जोतीरावांनी अय्यावारूंचे वाभाडे काढले ती भाषा रामजी संतूजी आवटे यांच्यासारख्या सत्यशोधकांनाही रुचली नाही. आपल्या सहकाऱ्याच्या जिव्हारी लागेल अशा शब्दांत केलेल्या टीकेबद्दल जोतीरावांनी २७ ऑक्टोबर, १८८७ च्या "ज्ञानोदय" च्या अंकात दिलगिरी प्रदर्शित केली. "आपल्या तारीख ८ माहे सप्टेंबर सन १८८७ इ. च्या अंकात मित्र अय्यावारूंजींनी ख्रिस्ताविरुद्ध पुस्तक लिहिले आहे त्याचे खंडणार्थ मी केलेला अखंड छापिला आहे. यातील काही भाग पुस्तककर्त्यास अनुलक्षुन लिहिला आहे अशी त्यांची गैरसमजूत झाली आहे, असे कळते. परंतु आम्ही कोणत्याही व्यक्तिमात्रास अनुलक्षून ते लिहिले नाही. फक्त उपमापर लिहिले आहे. ग्रंथकर्त्याच्या अब्रुला उणेपणा आणण्याकरिता लिहिलेला सदरील अखंड नसून त्यांची उलट समजूत झाली असल्यास त्याबद्दल आम्ही फारफार दिलगीर आहोत.” आपण व्यक्तिमात्रास अनुलक्षून लिहिले नसून फक्त उपमापर लिहिले आहे असा जोतीरावांनी दिलगिरी व्यक्त करताना निर्वाळा दिलेला असला तरी तो समाधानकारक वाटण्यासारखा नव्हता. "दारूच्या तारेंत स्वामी खाती पिती । नळ्या फोडीताती । गीधापरी ।" किंवा 'पोटासाठी बहु राजरोस चोर । होती कंट्याक्टर । जगामाजीं ।" या चरणात जोतीरावांनी अय्यांवारूंवर वैयक्तिक स्वरूपाची टीका केली होती हे उघड दिसते. जोतीरावांच्या कवनातला पंधरावा चरण हा "ज्ञानोदय" च्या संपादकांनाही आक्षेपार्ह वाटल्याने त्यांनी तो छापलेला नसावा. अय्यावारूसंबंधी जोतीरावांनी प्रसिद्ध केलेले कवन प्रथम डॉ. स. गं. मालशे यांनी शोधले. त्यांच्या “तारतम्य" या १९८७ साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातून (पृ. २२-२३) जोतीरावांचे हे कवन घेतले असून ते डॉ. मालशे यांच्या अनुमतीने या विभागात समाविष्ट केलेले आहे.