Jump to content

पान:Samagra Phule.pdf/६०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अखंडादि काव्यरचना या विभागात तळेगाव ढमढेरे येथील विठोबा भुजबळ नावाच्या धुपारे, अंगारे, जादुटोणा करून गोरगरिबांना लुबाडणाऱ्या एका माळी जातीतील "कुन्हाडीच्या दांड्यावर" जोतीरावांनी रचलेले अखंड प्रथमच समाविष्ट केले आहेत. खरे म्हणजे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी प्रकाशित केलेल्या गुलामगिरीच्या आवृत्तीत तसेच १९२७ साली फुल्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पंढरीनाथ सीताराम पाटील यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या "महात्मा फुले यांचे चरित्र" या पुस्तकात हे अखंड प्रकाशित झाले होते. पण "महात्मा फुले : समग्र वाङ्मय" या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीचे संपादक श्री. धनंजय कीर व डॉ. स. गं. मालशे यांनी त्यांचा समावेश केला नव्हता. "समग्र वाङ्मय" म्हटल्यानंतर जे जे निर्विवादपणे महात्मा फुल्यांच्या हातचे लेखन आहे त्याचा समावेश करणे आवश्यक ठरते. म्हणून या तीन अखंडांचा चौथ्या आवृत्तीत प्रथमच समावेश करण्यात आला. १४ जून १८८७ रोजी नारायणराव काशीबा कन्हेकर न्हावी व गं. भा शिवूबाई विठोबा भुजबळ यांच्या आमंत्रणावरून पुण्यातील सत्यशोधक समाजाचे सभासद ढमढेऱ्यांच्या तळेगावी एका न्हाव्याचे लग्न लवण्यासाठी दाखल झाले. तेथील भटजींना हे आवडले नाही. त्यांच्या विनवण्यांना तसेच धाकदपटशाला दाद न देता गावातल्या बलुत्यांनी आधी ठरल्याप्रमाणें न्हाव्याचे लग्न भट ब्राह्मणास न बोलावता पार पाडले, ब्राह्मणांनी विठोबा भुजबळास पैसे चारले आणि त्याच्या प्रभावामुळे कासारवाडीतील एका माळी वधुवरांचे लग्न आपण ब्राह्मणाकरवी पार पाडणार असे वधुवरांच्या पालकांच्या तोंडून वदवून घेतले. मात्र लग्नासाठ आलेल्या माळी मंडळींनी आपल्या जातीतील मुलामुलींची लग्ने भटास न बोलवता आपणच लावायची असा निर्धार केला. या प्रकरणाची हकीकत दीनबंधु पत्राच्या ३ जुलै १८८७ च्या अंकात प्रसिद्ध झाली होती. या प्रसंगी जोतीराव हजर होते आणि त्यांनी विठोबा भुजबळाच्या कारवायावर प्रकाश टाकण्यासाठी तेथल्यातेथे अखंड रचलेले दिसतात. या विभागाच्या अखेरीस छापलेली "कुळंबीण" ही कविता प्रथमच प्रकाशित होत आहे. ती प्रस्तुत आवृत्तीच्या संपादकाने प्रथम फुले चरित्रकार पंढरीनाथ पाटील यांच्या खासगी संग्रहातून उतरवून घेतली होती. त्यानंतर डॉ. स. गं. मालशे यांनीही आपल्या संग्रहातील ही अप्रकाशित कविता पाठवून दिली. दोन्हीही कविता ताडून पाहिल्या असता तंतोतंत जुळल्यामुळे प्रस्तुत आवृत्तीच्या संपादकाने ती "महाराष्ट्र