इशारा ४१३ तथापि हल्लींचे कित्येक सुधारलेले विद्वान् आर्य ब्राह्मणांची, स्वकीय पेशवाई जुलुमांविषयीं पक्की खात्री झाली असून, केवळ आपल्या जातबांधवांच्या भयास्तव, आर्य ब्राह्मणांचे त्रासापासून अज्ञानी शूद्र शेतकऱ्यांची मुक्तता झाली. हें स्पष्टपणें उघड म्हणण्याची त्यांची छाती होत नाही. सबब कशी तरी वेळ मारून नेण्याकरितां मोठ्या सार्वजनिक सभास्थांनी उभे राहून, “पूर्वीपेक्षां हल्ली या तीस वर्षांत शूद्र शेतकऱ्यांची स्थिती बरी आहे," म्हणून जागोजाग व्याख्यानें देत फिरणारे व इंग्रज सरकारचे आपणांवर शतश: उपकार असून त्यांपैकी कित्येक नांवालासुद्धां न स्मरतां, राज्यास स्वाभाविक असणारे शुल्लक दोषांना सूक्ष्मदर्शक यंत्रदृष्टीने दाखविणारे जे कोणी आहेत व कित्येक वेडगळ जुन्या समजुतीचे आर्यभट ब्राह्मण फक्त जात्याभिमान दृढ मनीं धरून, त्यांचा पक्ष उचलल्यामुळे त्यांस सद्गुणांचे ओढूनताणून नकली रूप देण्यास झटणारे हल्ली सांगत आहेत की, “पूर्वी पेशवाईंत शूद्र शेतकऱ्यास जें सौख्य होतें तें सांगतां येत नाहीं. त्या सुखाचें हल्लीं लेश सुखदेखील नाहीं. त्या वेळची शूद्रांची राहणी काय, चालणी काय, रीतिभाती काय, सर्वच चांगलें होतें. सत्य, सद्गुण, सदाचार, प्रामाणिकपणा आणि धर्म हे गुण शूद्रांमध्यें अक्षय वास करीत होते. त्या वेळी शूद्र शेतकऱ्यांजवळ पैसा तरी किती असे कीं, जिकडे पहावें तिकडे शूद्रांच्या घरांतून सोन्याचा धूर निघत असे.' आतां तें सौख्य नाहींसें झालें. ती नीति नाहींशी झाली, तो धर्म नाहींसा झाला आणि ती संपत्तीही नाहींशी झाली. " या उभयतांचे बोलण्यांत किती तथ्यांश आहे, याविषयीं विचार करणें वाचकांकडे सोपवून येथें विषय संपवितो. १५ जून, सन १८८५ इ. पुणे पेठ जुनागंज --जोतीराव गोविंदराव फुले घर नंबर ३९५ --समाप्त-:
पान:Samagra Phule.pdf/४५४
Appearance