इशारा 'इशारा' या पुस्तिकेत जोतीराव फुल्यांनी कोठेही न्या. महादेव गोविंद रानड्यांचा स्पष्ट शब्दांत नामनिर्देश केलेला नसला तरी ही सबंध पुस्तिका रानड्यांच्या मताचे खंडन करण्यासाठी फुल्यांनी लिहिली होती हे लक्षात ठेवावयास हवे. मुंबई विद्यापीठाने १८६२ च्या एप्रिलमध्ये बी. ए. ची परीक्षा प्रथमच घेतली. त्यावर्षी या पदवी परीक्षेत पहिल्या वर्गात उत्तीर्ण झालेल्या रानड्यांना त्यांचे चहाते 'पदवीधरांचे मुकुटमणी' म्हणत असत. जोतीरावांनी मात्र 'इशारा' पुस्तिकेच्या उपोद्घाताच्या सुरुवातीस 'आर्य ब्राह्मणातील पहिला दिवाभीत' 'गृहस्थाचा डौल घालून पुण्याचा रहिवासी असता मुंबईकर बनलेला वाचाळ उपदेशक' अशा शेलक्या शब्दांत रानड्यांची संभावना केली आहे. आर्य ब्राह्मणातील दुजा नूतन शंकराचार्याचे तोलाचा विद्वान लहान मोठ्या सभांत उड्या मारून प्रतिपादन करीत फिरतो की 'पूर्वीच्या तीस वर्षापेक्षा हल्ली शूद्र शेतकऱ्यांची स्थिती बरी आहे' असा जोतीरावांनी केलेला निर्देशही रानड्यांच्या एका गाजलेल्या भाषणाच्या संदर्भात केलेला आहे. १८८५ च्या मे महिन्यात रानड्यांनी 'शेतकीची स्थिती' या विषयावर पुण्याच्या वक्तृत्वसभेच्या वतीने व्याख्यान दिले. त्या व्याख्यानात "तीस वर्षापेक्षा हल्ली शेतकीची स्थिती चांगली आहे" असे रानडे म्हणाले. “शेतकऱ्यांचे धान्य बाजारात सुलभ रीतीने जाते व दुसऱ्या अनेक सुधारणा झाल्या आहेत" असे सांगून रानड्यांनी म्हटले, 'दहा वर्षामागे दुष्काळ पडला तेव्हा स्थिती खालावली तरी पण आजची स्थिती तीस वर्षामागल्या स्थितीपेक्षा चांगली ठरते." (न. र. फाटक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे चरित्र, १९२४, पृ. ३७३ - ३७४) याच व्याख्यानात रानड्यांनी वतनी जमीनदार वर्गाचे कार्य उपयुक्त असते असा निर्वाळा देऊन या वर्गाची तरफदारी केली. जोतीराव फुल्यांना रानड्यांचे हे प्रतिपादन मुळीच रुचले नाही. 'इशारा' या पुस्तिकेत फुल्यांनी रानड्यांचे मतावर कडाडून टीका केली आहे. 'इशारा' ऑक्टोबर १९०५ च्या आवृत्तीमध्ये (मुकुंदराव पाटील संग्रह) पुस्तिकेच्या शेवटी पुढील मजकूर छापलेला आढळला.
पान:Samagra Phule.pdf/४४०
Appearance