पान:Samagra Phule.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना (पंधरा) हे विध्वंसक अतएव विकृत मनोवृत्तीचे लक्षण आहे. जोतीबा फुले यांची मनोरचना अत्यंत निरामय होती, शाश्वत नैतिक सत्याच्या आधारावर त्यांची विचारसरणी अधिष्ठित होती. त्यांना उच्चतर सामाजिक विकासाला कारणीभूत होणाऱ्या चिरंतर मूल्यांचा प्रत्यय आला होता. जोतीबा हे "सत्यशोधक" होते. हे सत्य मानवी जीवनाचे नैतिक सत्य होते. त्या चिरंतन सत्याचे स्वरूप म्हणजे विश्वमानवाच्या मुक्ततेचा सिद्धान्त. हा सिद्धान्त त्यांना आधुनिक पश्चिमी संस्कृतीने दिला व तो त्यांच्या काळी त्यांच्यासारख्या थोड्यांनाच घेता आला. इतरांना नाही. सत्यशोधक जोतीबा यांनी अनेक पुस्तके व निबंध लिहिले. सत्यशोधक समाज स्थापून त्यांनी सामाजिक आंदोलनाचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या मुळाशी काही विधायक स्वरूपाच्या ध्येयाचा विचार होता. हा विचार म्हणजेच मूलभूत मानवी हक्कांचा विचार होय. समाजातील बहुसंख्य जनतेचे सामाजिक शोषण बंद करून सर्व मानवांना मुक्त करणारा विचार म्हणजेच मानवी हक्कांचा विचार होय. “गुलामगिरी” व “सार्वजनिक सत्य धर्म" ही दोन मूलभूत पुस्तके एकत्र वाचली म्हणजेच त्यांच्या वैचारिक मूल्यांची जाणीव होते. “गुलामगिरी'मधील विचार हे मुख्यतः विध्वंसक होत. या विध्वंसक विचारांतून उत्पन्न झालेल्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्या विधायक विचारांत, म्हणजेच "सार्वजनिक सत्य धर्म' या पुस्तकात मिळते. "गुलामगिरी' हे पुस्तक वाचले म्हणजे सत्याचा अर्धा भाग मिळतो. अर्धसत्य हे नेहमीच धोकादायक असते. “गुलामगिरी' तील संदेश आपणास भारतातील परंपरागत, ब्राह्मण-प्रधान, धार्मिक व सामाजिक संस्कृतीच्या विरुद्ध उठाव करण्यास प्रेरित करतो. परंतु समोर असलेल्या परंपरागत समाजसंस्था नष्ट करून त्या जागी स्थानापन्न करावयाच्या सामाजिक संस्था या ज्या तत्त्वांवर आधारलेल्या असल्या पाहिजेत, ती तत्त्वे त्यांनी “सार्वजनिक सत्य धर्म' या पुस्तकात विशद करून सांगितली आहेत. ती तत्त्वे म्हणजे आधुनिक मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुत्व ही होत. ही तत्त्वे गृहित धरली म्हणजे जोतीबांना दिसलेल्या सत्याचे पूर्ण स्वरूप दृष्टीसमोर येते. "सार्वजनिक सत्य धर्म' या पुस्तकाचे योग्य व आवश्यक तितके मूल्यमापन केल्याशिवाय, जीवनातले जे सत्य शोधण्यासाठी जोतीबा जीवनसंग्राम चालवीत होते, त्याचा खराखुरा अर्थ कळणे अशक्य आहे. हे पुस्तक जोतीबांनी अर्धांगाचा झटका आल्यानंतर उजवा हात लुळा झाल्यावर, शरीरातील व्यथा सहन करीत, डाव्या हाताने लिहून पुरे केले आहे. “गुलामगिरी'मध्ये जे सत्य दाखविले आहे, ते अर्धसत्य आहे. त्याची दुसरी बाजू लक्षात घेतली नाही तर ते भयानक ठरेल, अशी त्यांची भूमिका होती. म्हणून शारीरिक व्यथा सहन करीत त्यांनी हे पुस्तक लिहून पार पाडले. जोतीबांच्या विश्व-कुटुंबवादाचा “सार्वजनिक सत्य धर्म" हा जाहीरनामा आहे. भारतीय लोकशाही क्रांतीची मूलभूत तत्त्वे विशद करून सांगणारा तो जाहीरनामा आहे. “सार्वजनिक सत्य