या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा
६९
सर्व तयारी पुन्हा केली परत हल्ल्यास ।
जाऊन भिडला मावळ्यास ॥
बाजी मार देई पठाण खचले हिमतीस ।
हटती पाहून मर्दास ॥
पराक्रम बाजीचा पाही खान खोच मनास ।
लावीला तीर कमानीस ॥
नेमानें तीर मारी मुख्य बाजी परभूस ।
पाडिला गबरू धरणीस ॥
सय्यद बाजी ताजीम देतो घेती बाजूस ।
भोगिती स्वर्गी मौजेस ॥
बाजी स्वर्गी बसे मावळे हटले बाजूस ।
सरले बालेकिल्ल्यास ॥
मोगल चढ करती पुन्हा घेती माचीस ।
धमकी देती मावळ्यास ॥
हेटकरी मारी गोळी फेर हटवि शत्रूस ।
पळवी इशानी कोणास ॥
वज्रगडाला शिडी लाविली आहे बाजूस ।
वरती चढवी तोफांस ॥
चढला मोगल मारी गोळे बालेकिल्ल्यास ।
आणले बहु खराबीस ॥
हेटकरी मावळे भ्याले नाहीं भडिमारास ।
मोगल भ्याला पाऊसास ॥
मोगल सल्ला करी शिवाजी नेती मदतीस ।
घेती यवनी मुलखास ॥
कुलद्रोही औरंगजीब योजी कपटास ।
पाठवी थैलि शिवाजीस ॥