पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पर्वतश्रेणी आणि किनारपट्टी तयार झाली. ह्या प्रवासाच्या मध्यावधीत आज सह्याद्रीला आच्छादणाय सपुष्प वनस्पती पृथ्वीवरच्या इतर खंडप्राय भूभागांवर फोफावल्या. त्याचबरोबर ह्या खंडांवर डायनोसॉरांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी मोठी उलथापालथ झाली. भारतभूमी सरकत सरकत पृथ्वीचे कवच अगदी पातळ असलेल्या भागात येऊन पोचली. त्या धक्क्याने कवच फुटून न भूतो न भविष्यति असा ज्वालामुखीचा उद्रेक झाला. त्यातून जो लाव्हा रस उफाळला त्या रसातून महाराष्ट्राचा कृष्णपाषाणदेह साकारला. नेमकी याच वेळी एक अतिप्रचंड उल्का पृथ्वीवर आदळली. धुळीने, राखेने वातावरण काळवंडले आणि पृथ्वी गारठली. ह्या हाहाकारात डायनोसॉरांचा नायनाट झाला. त्याचा फायदा मिळून सस्तन पशूंची, पक्ष्यांची भरभराट झाली. पृथ्वीवरच्या जीवसृष्टीचा असा कायापालट होत असताना भारत एक महासागरातले बेट होते. ह्या परावर्तनापासून दुरावलेले होते. क्रमेण पाच कोटी वर्षांपूर्वी आपला भूभाग आशियाला येऊन धडकला. ह्या टकरीतून हळूहळू हिमालय उंचावला. भूमार्गे इतरत्र उत्क्रांत झालेल्या सपुष्प वनस्पती, फुलपाखरे, पक्षी, पशू भारतावर बस्तान बसवू लागल्या. इथेही त्यांच्या नव्या जातींची उत्क्रांती होऊ लागली. नव्याने साकारलेल्या भारताच्या तीन भागांत भरपूर पाऊस पडायला लागून जीवसृष्टीला खास बहर आला. ते तीन प्रदेश होते, अंदमान-निकोबार बेटे, सह्याद्री आणि पूर्व हिमालय व त्याला जोडलेले ईशान्य भारतातले मेघालय- नागालैंड मणिपूरचे डोंगर. ह्यातला सह्याद्री सदाहरित अरण्याचे एक बेटच आहे. उलट पूर्व हिमालय आग्नेय आशियातल्या विस्तृत वनप्रदेशाला जोडून आहे. त्यामुळे आग्नेय आशियाच्या जीवसृष्टीचे वैभव पूर्व हिमालयालापण लाभले आहे. केवळ व्हिएतनामपर्यंतच्या आग्नेय आशियाचा विचार केला, तरी या प्रदेशात सपुष्प वनस्पतींच्या जाती सह्याद्रीच्या तिपटीने, तर सस्तन पशूंच्या, पक्ष्यांच्या जाती दुपटीहून जास्त आहेत. भारताच्या दृष्टीने हे तीनही गट अर्वाचीन आहेत; गेल्या पाच कोटी वर्षांत भारतात पोहोच. उलट साप - सरडे, बेडूक प्राचीन गट आहेत. त्यांचे पूर्वज भारत दक्षिण गोलार्धात असल्यापासून, पंधरा कोटी वर्षांहूनही जास्त काळ आपल्या भूमीवर वास्तव्य करून आहेत. म्हणून या गटांच्याही जास्त जाती पूर्व हिमालयात असल्या तरी सह्याद्रीच्या सव्वा-दीड पटच आहेत. सह्याद्रीची आर्त हाक!