पान:Sahyadrichi Aart Haak Dr. Madhav Gadgil 22nd May 2023.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रास्ताविक भूमिका निकोप निसर्ग हा मानवी जीवनानंदाचा, आरोग्याचा आणि अनेकांच्या उपजीविकेचा आधारस्तंभ आहे. मानवाच्या उपजत निसर्ग प्रेमातून वड-पिंपळ-उंबरांची पूजा, देवडोह व देवरायांचे संरक्षण अशा अनेक चांगल्या परंपरा निर्माण झाल्या. ह्याच भावनेतून आज अभयारण्ये, राष्ट्रीय उद्याने स्थापिली जातात, देशाचा एक तृतीयांश भूप्रदेश, तर त्याच्या दुप्पट दोन तृतीयांश डोंगराळ मुलुख वनाच्छादित असावा हे मान्य केले जाते. तेव्हा काही ठिकाणी खास करून, पण सर्वत्रच संयमशीलतेने, विवेकाने निसर्ग सांभाळणे श्रेयस्कर आहे. विशेषतः जीवसृष्टीच्या निवाऱ्यांचे भूमी तसेच जलाधारित नैसर्गिक अधिवासांचे तुकडे तुकडे पडू नयेत, त्यांच्यातले जोड, त्यांच्यातले दुवे टिकून रहावेत म्हणून सतत दक्षता बाळगली पाहिजे. निसर्गाला सांभाळावे म्हणूनच आपण प्रदूषण नियंत्रणासंबंधित वायू व जल कायदे, जैवविविधता कायदा, पिकांच्या वाणांचे संरक्षण व शेतकऱ्यांचे अधिकार कायदा, पर्यावरणावरील आघातांचे परीक्षण करण्याची तरतूद, पर्यावरणाची देखभाल करण्यामध्ये नागरिकांना सहभागी करण्याची पर्यावरण वाहिनी योजना हे सगळे घडवले. दुर्दैवाने ह्याची सुव्यवस्थित अंमलबजावणी होत नाही, ती काटेकोरपणे झाली पाहिजे, शिवाय पश्चिम घाटासारख्या खास निसर्गसमृद्ध टापूत शास्त्रीय माहितीच्या आधारे जैवविविधतेची निगराणी करण्याची व्यवस्था कार्यरत केली पाहिजे, अशी आमच्या पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाची भूमिका आहे. निसर्गप्रेमाच्या उज्ज्वल परंपरा असलेल्या आपल्या देशात निसर्गाची जपणूक दंडुकेशाहीने नव्हे, तर लोकसहभागाने व्हावी, व ह्यासाठी आपली लोकशाहीला मान देणारी ७३व्या व ७४व्या घटनादुरुस्तीनुसार रचलेली विकेंद्रीकृत पंचायत राज्य- नगरपालिका शासनव्यवस्था, तसेच आदिवासी स्वशासन, जैवविविधता व वनाधिकार कायदे ही सर्व चौकट ताबडतोब जारी करावी. आज अधिकृत निसर्ग संरक्षण केवळ लोकांना जाच करणाऱ्या शासकीय यंत्रणेद्वारा केले जाते. ही पद्धती भारतीय परंपरेला, सह्याद्रीची आर्त हाक! ५