पान:Aagarakar.pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आगरकर : व्यक्ति आणि विचार २० कत असली तरी सुंदर चिंध्या आणि खोटे मणी यांच्यापेक्षां त्यांची किंमत अधिक नाहीं हेंही पहाणा-यांच्या लगेच लक्षांत येई.

ही स्थिति विष्णुशास्त्र्यांनी आपल्या निबंधमालेनें पालटून टाकली. बाहुलीची हां हां म्हणतां अल्लड बालिका झाली. जॉन्सन आणि मेकॉले यांच्यासारख्या इंग्लिश पंडितांच्या लेखनाशीं स्पर्धा करणारे आकर्षक निबंध निबंधमालेतून भराभर प्रगट होऊं लागले. भाषा आणि देश यांच्या अभिमानानें स्फुरलेले विचार विद्युल्लतेप्रमाणें या निबंधांतून चमकूं लागले. अवघ्या सात वर्षात मराठी गद्याचा कायापालट झाला.
निबंधमालेचा आगरकरांच्या उमलत्या प्रतिभेवर किती परिणाम झाला असेल, याची सहज कल्पना करतां येईल. निबंधमाला १८७४ मध्यें निघाली. आगरकर १८७५ मध्ये मॅट्रिक झाले. अत्यंत संस्कारक्षम अशा या वयांत आतांपर्यंत कोणीही लिहिलें नव्हतें असें प्रभावी मराठी गद्य त्यांना प्रत्येक महिन्याला वाचायला मिळू लागलें. लेखणी तलवारीपेक्षां श्रेष्ठ आहे हें एक नुसतें सुंदर सुभाषितच नाहीं, तर तें शृंखलांनी जखडलेल्या राष्ट्रांतसुद्धां अनुभवायला येणारें ओजस्वी सत्य आहे हें विष्णुशास्त्र्यांच्या उदाहरणावरून त्यांना दिसून आले. लहानपणापासूनच त्यांची प्रतिभा आत्मविकासाची धडपड करीत होती; तिला निबंधमालेनें मार्ग दाखविला. आगरकरांच्या शैलीवर विष्णुशास्त्र्यांची छाया असल्याचा मधूनच जो भास होतो त्याचा उगम या परिस्थितींत आहे. मात्र निबंधकार या दृष्टीनें ते विष्णुशास्त्र्यांहून अत्यंत भिन्न आहेत. दोघेहि पंडित, दोघेहि देशभक्त, दोघेही भाषाप्रभु ! पण दोघांच्या मनाच्या बैठकींत मात्र दोन ध्रुवांचे अंतर. विष्णुशास्त्री पांडित्यात रमून जातात;आगरकर विषयाचे तर्कशुद्ध व मूलगामी विवेचन करण्याचे साधन म्हणून पांडित्याचा उपयोग करतात. दोघांची देशभक्ति सारखीच उत्कट पण विष्णुशास्त्र्यांची दृष्टि देशाच्या दिव्य अशा भूतकालाकडे अधिक वळलेली; आगरकरांची दृष्टि मुख्यतः त्याच्या उज्ज्वल भविष्याकडे लागलेली. विष्णुशास्त्र्यांनी लोकांचा भाषाभिमान व देशाभिमान जागृत केला हें खरें; पण त्यांच्या निबंधाचे विषय, प्रतिपादनाची पद्धत, भाषेचा विलास, या सर्वांचें स्वरूप मुख्यतः वाङमयीन आहे.-आगरकरांचे निबंध तसे नाहीत. ते अंतर्बाह्य सामाजिक आहेत. विष्णुशास्त्र्यांनीं हीन-