साधारण दीड वर्षापूर्वी नांदेड येथे कै. नरहर कुरुंदकरांच्या निवासस्थानी कागदपत्रांची छाननी करताना भांगडिया स्मारक व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे हस्तलिखित नजरेस आले. ही व्याख्याने कुरुंदकरांनी १९७८ मध्ये दिली होती व ती सेलू येथील मित्रांनी शब्दशः उतरून घेतली होती. मजकूर महत्त्वाचा होता. पण तो परिष्कृत करणे व कुठेतरी प्रसिद्ध होणे इष्ट एवढेच त्या क्षणी वाटले. याच विषयावर कुरुंदकरांनी वेळोवेळी केलेले स्फुट लेखन नजरेसमोर होतेच. मित्रांशी विचारविनिमय करताना हा लेखसंग्रह मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेने प्रकाशनासाठी घ्यावा ही कल्पना पुढे आली. या ग्रंथात कुरुंदकरांनी १९३८ पासूनच्या इतिहासाची मीमांसा केली आहे. १९२० - १९३८ या कालखंडाचा इतिहास परिषदेने वेगळा सिद्ध केला आहे व तोही याच ग्रंथाच्या समवेत प्रकाशित करण्याचे ठरत आहे. हे दोन्ही उपक्रम एकाच वेळी पूर्ण होऊन एक ऐतिहासिक कार्य परिषदेने पूर्ण केले आहे. मराठी वाचक तसेच जाणकार या उपक्रमाचे यथोचित स्वागत करतील असा भरवसा वाटतो.
हा ग्रंथ सिद्ध करताना अनेकांचे साहाय्य घ्यावे लागले. ह्या पुस्तकाची कल्पना स्फुरण्यापासून ते त्याच्या पूर्ततेपर्यंत आमचे मित्र श्री.आनंद साधले यांनी भरपूर परिश्रम घेतले. विशेषतः ध्वनिफितीवरील व्याख्यानांचे परिष्करण त्यांनी प्रकृती ठीक नसतानाही शुद्ध प्रत तयार केली. त्याबद्दल परिषद त्यांची ऋणी आहे. सेलू येथील नूतन विद्यालयाचे प्राचार्य श्री.द.रा.कुलकर्णी यांनी व्याख्याने प्रसिद्ध करण्यास अनुमती दिली व ध्वनिफीत कागदावर उतरण्याची आरंभीची जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्री.जोगदंड (मुंबई) यांनी आमची निकड लक्षात घेऊन त्वरित मुद्रणप्रत करून दिली. या सर्वांचे आम्ही आभारी आहो.
हा ग्रंथ प्रकाशनासाठी परिषदेकडे सोपविला याबद्दल आम्ही श्रीमती प्रभा कुरुंदकर यांचे ऋणी आहो.