पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साकार झाले आहे. तसेच आमचे ग्रंथप्रकाशक व वितरक सर्वश्री निर्मलकुमार सूर्यवंशी, जयप्रकाश सुरनर, दत्ता डांगे, मधुकर कोटलवार, डी. बी. देशपांडे यांनी ग्रंथवितरणातील सहभागाची शाश्वती दिल्यामुळेच आम्हाला बळ मिळाले.

 यानिमित्ताने एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते ती ही की, या ग्रंथातील कुरुंदकर गुरुजींची भाषणे व लेख १९८१ पूर्वीची आहेत. गेल्या १५-१६ वर्षात हैदराबाद मुक्तिलढ्यावर अनेकांनी पुस्तके लिहिली, संशोधन केलेले आहे. त्याचा आढावा घेणे आम्हाला जमले नाही. मात्र कुरुंदकर गुरुजींनी त्या त्या काळात व्यक्त केलेले मत जसेच्या तसे आम्ही वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम केलेले आहे. वाचकांनीही गुरुजींचे विचार त्या त्या संदर्भात लक्षात घ्यावे ही विनंती. अभिप्रायात आदरणीय गोविंदभाईंनी म्हटल्याप्रमाणे नवीन माहिती पुढे आलेली असली तरी जुने विचार, संशोधन चिकित्सा याचे मूल्य घटत नसते हे खरे !

 आमचे मोठे दीर प्रा. डॉ. विलास कुमठेकर व जाऊबाई प्रा. सौ. ज्योती कुमठेकर यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. त्यांचे प्रयत्न नसते तर हे पुस्तक आम्ही प्रकाशित करू शकलो नसतो एवढे सांगितले तरी पुरेसे आहे. या ग्रंथाचे सुबक मुद्रण अल्पावधीत करून दिल्याबद्दल राजमुद्रा ऑफसेट परिवाराचे हार्दिक आभार. तसेच हा ग्रंथ सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या व्यक्ति, संस्थांनी प्रत्यक्षाप्रत्यक्षरीत्या मदत केली आहे. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून मी हे निवेदन संपविते.

 आमचे काही हितचिंतक गेल्या १०-१२ वर्षांपासून समग्र कुरुंदकर वाङमय या प्रकल्पावर विचार करीत आहेत. प्रा. माधव कृष्ण सावरगावकर यांनी एका लेखात उल्लेख केल्याप्रमाणे कुरुंदकर गुरुजींचे एकूण साहित्य जवळजवळ सहा हजार पृष्ठांचे आहे. यातील बहुतांश ग्रंथ पुणे येथील ख्यातनाम ग्रंथ प्रकाशन संस्था देशमुख आणि कंपनी व इंद्रायणी साहित्य यांनी प्रकाशित केलेले आहेत. प्रस्तुत प्रकल्पात या संस्थांनी मनःपूर्वक सहकार्य केल्यास प्रकल्प सिद्धीस जाणे सहज शक्य आहे. या प्रकल्पासाठी जे संपादक मंडळ नेमण्याचा आम्ही विचार करीत आहोत त्यांत या संस्थांचे प्रतिनिधी तर असतीलच शिवाय गुरुजींना जाणणारे महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील ख्यातकीर्त साहित्यिक असतील. हा प्रकल्प येत्या ५-६ वर्षांत सिद्धीस जावा अशी आमची परमेश्वरास प्रार्थना आहे. सदर ग्रंथाच्या रसिक वाचकांस आम्ही वरील प्रकल्पात सर्वतोपरी सहकार्य व आशीर्वाद देण्याची आम्ही अतिशय नम्रतेने प्रार्थना करीत आहोत.

 धन्यवाद!

सौ. अनिता अ. कुमठेकर
 
 (प्रकाशिका)