पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कल्पना आहे काय? जेलमध्ये जावे लागेल.

 गांजवे यांनी अतिशय शांतपणे सांगितले की, ध्वज परदेशी नाही. आपल्या राष्ट्राचा ध्वज आहे. पोलिस म्हणाले, तुम्ही देशद्रोही आहात. हैदराबाद हे स्वतंत्र राष्ट्र आहे. हा हिंदुस्थानचा भाग नव्हे. गांजवे म्हणाले, आम्ही तर हैदराबाद भारताचा अविभाज्य भाग मानतो. ह्यानंतर शिवीगाळ, धमक्यांना आरंभ झाला. काही जण समजूत घालू लागले. समजूत घालण्यासाठी डी.वाय.एस.पी. नरसिंग प्रसाद यांनी बाजूला नेऊन गांजवे यांना सांगितले, भारतीय ध्वज लावणे हा गुन्हा असल्याच्या आज्ञा आमच्याकडे नाहीत. यामुळे आम्ही कायद्याप्रमाणे तुम्हाला ध्वज काढण्याची आज्ञा देऊ शकणार नाही, पण एकूण विचार करता तुम्ही ध्वज काढावा हे बरे.

 गांजवे यांचे म्हणणे असे की, ध्वज काँग्रेस ऑफिसवर आहे. काँग्रेसच्या आज्ञेनुसार लावलेला आहे. त्यामुळे आमच्या अध्यक्षांच्या आज्ञेशिवाय आम्ही ध्वज काढू शकत नाही. तुम्ही वाटल्यास मला अटक करा. मी जेलमध्ये बसण्यास तयार आहे. बरे, ध्वज काढायचा असेल तर उपाय सोपा आहे. ह्या किल्ल्या घ्या. वर जाऊन ऑफिस उघडा, ध्वज काढा, जप्त करा. रीतसर पंचनामा करा. किल्ल्या मला परत करा. माझी काहीच तक्रार नाही. मी मात्र ध्वज काढणार नाही. गांजवे जो उपाय सांंगत होते तो सर्वांत कठीण होता, समोरून त्या इमारतीत जाण्याची एक चिंचोळी वाट होती. तिच्या पायरीवर पाय ठेवताच आतून गोळीबार झाला असता. घराकडे मागून जाण्याचे सर्व रस्ते रोखण्यात आले होते. ते प्रतिकाराविना मोकळे होणार नव्हते. शे-दीडशे माणसे मरू द्यावी एवढ्याची तयारी, त्याच्या परिणामाची तयारी ठेवल्याशिवाय पोलिसांना त्या इमारतीत जाणे शक्य नव्हते. शासनाच्या आज्ञा आटोकाट प्रयत्न करून शांतता टिकवा अशा होत्या. नांदेडला त्या क्षणी भीषण दंगल शासनाला नको होती. रात्री आठपर्यंत विविध प्रकारचे इलाज वापरून संपले. शेवटी उद्या वाईट पारणाम भोगावे लागतील असे सांगून पोलिस परतले. ध्वज मात्र तसाच होता.

 दुसऱ्या दिवशी सकाळपासून ध्वज काढण्याविषयी नानाप्रकारचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले. हिंदूंना गांजवे सांगत, सर्वांचा विचार घेऊन ठरवतो. माझा काही हट्ट नाही. मुसलमानाना सांगून पोलिसांनी ध्वज जप्त करावा, माझी हरकत नाही. ध्वज मात्र डौलाने फडकत होता. सतरा तारखेला मुसलमानांची ईद आली. अठरा तारखेला त्यांची मिरवणूक होती. अठरा तारखेला मुसलमानांनी आणि रजाकारांनी शासनाला अल्टिमेटम दिले, ध्वजाखालून मिरवणूक जाणार नाही, ध्वज निघाला पाहिजे. नाही तर गावात

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८४