पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणीव होती. प्रचंड दंगल होण्याचा संभव दिसत होता. जाळपोळ, लुटालूट, अत्याचार असे अनन्वित प्रकार सुरू होतील हेही दिसत होते. विरोधी शक्ती म्हणजे पोलिस, रझाकार, गावातील अरब, रोहिले व पठाण ह्यांची शक्ती एवढी मोठी होती की, लढ्याला नामशेष व्हावे लागेल ह्याची सर्वांनाच जाणीव होती. तरीही ध्वज उभारायचाच असे ठरले.

 जिल्ह्याचे सेक्रेटरी गांजवे होते. त्यांनी १५ ऑगस्टला सकाळीच काँग्रेस ऑफिसवर राष्ट्रध्वज फडकावला. भगवानराव गांजवे हे सौजन्य व कणखरपणा यांचे एक नमुनेदार उदाहरण. त्यांनी काँग्रेस ऑफिसवर ध्वज लावला. ऑफिसला कुलूप लावले व स्वतःजवळ किल्ल्या ठेवल्या. निःशस्त्रपणे अत्याचारी नेतृत्वाला सामोरे जाणे व सर्वांसमोर उभे राहणे हा त्यांचा योग होता. उरलेले कार्यकर्ते वेळ आलीच तर सर्व होळी विभाग आक्रमणाविरुद्ध कसा लढवायचा या योजनेची सिद्धता ठेवण्यात गुंतले होते. शामराव बोधनकरांचे राहते घर हे कार्यकर्त्यांचे ठाणे होते.

 सकाळपासूनच हा ध्वज डौलाने फडकत होता. पुढे काय होणार याची चर्चा हिंदू मंडळी गटागटाने करीत होती. मुसलमानांच्या सशस्त्र टोळ्या धमक्या देत दहशत निर्माण करीत गावातून हिंडत होत्या. ध्वज काढून टाका, याचे परिणाम फार गंभीर होतील असे परस्पर निरोप येणे चालूच होते. हिंदूमधील ज्येष्ठ मंडळींना हे आततायी वर्तन नापसंत होते. त्यांच्याकडूनही सूचना येत होत्या. गांजवे यांचे दैनंदिन काम शांतपणे चालू होते. सर्वांना ते हसून शांतपणे सांगत, पोलिस काय म्हणतात ते पाहू नंतर सर्वानुमते निर्णय घेऊ. माझा हट्ट नाही. आमचे सगळे लोक म्हणाले ध्वज काढा तर काढू. ज्या सगळ्या लोकांचा गांजवे हवाला देत ती माणसे रस्त्यावरून हिंडत नव्हती. एखादा लोकांना भेटला तर गांजवे सेक्रेटरी आहेत, त्यांना विचारा, असे सांगत असे. आमचे काही म्हणणे नाही. म्हणणे व हट्ट तर कुणाचाच नाही, झेंडा तर निघत नाही हे पाहून शेवटी मुस्लिम नेत्यांनी पोलिसांना हस्तक्षेप करण्याची सूचना दिली.

 दुपारी चार वाजता सुमारे पन्नास पोलिस एक इन्स्पेक्टर यांच्यासह डी.वाय.एस.पी. नरसिंग प्रसाद घटनास्थळी हजर झाले. गांजवे यांचा शोध घेतला. ते स्वतःच्या घरी होते. तेथून त्यांना बोलाविण्यात आले. त्यांना पोलिसांनी विचारले, हा झेंडा कुणी लावला? गांजवे एखादी सामान्य गोष्ट सांगावी तसे म्हणाले - मी लावला. संतप्त होऊन इन्स्पेक्टरने विचारले, हा परदेशी झेंडा लावण्याचे परिणाम काय होतील याची

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ८३