पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/74

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानांच्या उर्मटपणाने व अत्याचाराने लोकमत क्षुब्धच इतके झाले होते की हिंमतवान माणसे प्रतिकाराला उभी होती. इतर मध्यम लोक चोरून मदत करीत. भित्री मंडळी सतत अधिकाऱ्यांच्या खुशामती करीत, लाचारपणे त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करीत. पण कुणी बातम्या शासनाला पुरवीत नसे. ग्रामीण भागात हा एकोपा फार मोठा होता. सतत खुशामत करीत जगणाऱ्यांनाही भूमिगत कार्यकर्ते भेटत. ही भित्री माणसे कार्यकर्त्यांना कळवळून उपदेश करीत, पण शासनाला कळवीत नसत की अमका अमुक ठिकाणी लपलेला आहे. स्वतंत्र हैदराबादला जाहीर रीतीने पाठिंबा देणारा अस्पृश्य वर्गही या वागणुकीला अपवाद नव्हता. ते मदत करीत नसत, पण हेरगिरी अगर चुगली करीत नसत. त्याचा परिणाम असा होई की, गावातील तीन हजार माणसांना जे पूर्णपणे माहीत असे त्याची कोणतीही वार्ता मुसलमानांना नसे. जे त्यांच्याकडे चाले ते आम्हाला कळत नसे. जणू एका गावात दोन गावे वसत होती.

 एक निर्णय असाही ठरला होता की, ज्याला जेवढे झेपेल तेवढे त्याने करावे. झेपणार नाही तिथे चक्क पाय धरून माफी मागून मोकळे व्हावे. जो हे करील त्याला कुणी निंदायचे नाही, त्याचा तिरस्कार करायचा नाही. मात्र त्याने कार्यकर्त्यांना दगा द्यायचा नाही. दगाबाजांना क्षमा नाही. सर्वत्र वातावरण असेच होते. कुरुंद्यात तर अगदी पक्के वातावरण असे होते. माझे एक चुलते पूर्णपणे ह्या मताचे होते की निजामाचे राज्य बुडणे शक्य नाही, कारण एका मुसलमान साधूचा त्याला तसा आशीर्वाद आहे. म्हणून ही सगळी चळवळ मूर्खपणाची असून तिचे अपयश नक्की आहे. ह्या गाढवपणाशी कोणताही संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा नव्हती. बहुतेक भूमिगत कार्यकर्ते निर्धास्तपणे त्यांच्या शेतावर जात, रात्री मुक्काम करीत. गावातून जेवण येई. जेवून मग विश्रांती घेऊन इतरत्र जात. ह्या माणसाविषयी कुणालाही कधी दुरावा वाटला नाही. गावचे एक प्रमुख कार्यकर्ते पाटील होते. त्यांनी कायदेभंग केला. पण पोलिसांनी त्यांना कोर्टासमोर उभे करण्याऐवजी त्यांना चौकशीनिमित्त ठेवून घेतले व छळाला आरंभ झाला. पाटील छळापुढे टिकले नाहीत. त्यांनी सरळ माफी मागितली. कोर्टाकडे दयेचा अर्ज केला. न्यायालयाने त्यांची माफी मान्य केली. दीड हजार रुपये दंड केला. पोलिसांनी त्यांच्याकडून हजार दोन हजार रुपये उकळले. पाटील सुटून गावी आले. त्यानंतर दहा महिने त्यांचे रोजचे उठणे, बसणे, जेवणे मुस्लिम अधिकाऱ्यांत असे. ह्या अधिकाऱ्याना प्रसन्न ठेवण्यासाठी महिना दोन-तीनशे रुपये पाटील खर्चीत.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७३