पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वामीजी असा हा प्राणांतिक संघर्ष होता. त्यात मवाळांना जागा नव्हती, तडजोडीची शक्यता नव्हती.

 हैदराबादचा हा स्वातंत्र्यलढा ७ ऑगस्ट १९४७ ला सुरू झाला. हा दिवस कुरुंद्यात अगदी शांतपणे गेला. कुरुंदा हे एक मोठयापैकी खेडे होते. पाच-सहा मारवाडी व्यापारी, २५-३० ब्राह्मणांची घरे, सर्व मिळून पाच हजार लोकसंख्या हे या मौज्याचे स्वरूप होते. मुसलमानांची लोकसंख्या खूपच मोठी म्हणजे हजारभर होती. सर्व अस्पृश्यांची मिळून लोकसंख्या सातशेच्या आसपास होती. उरलेली तीन-साडेतीन हजार लोकसंख्या मराठे, धनगर आणि लिंगायत, तेली, सुतार, लोहार अशी होती. सारे मराठे ह्या गावात ‘महानुभाव' ह्या आत्यंतिक अहिंसावादी पंथाचे होते. पण ते मनाने लढण्यास तयार होते. कुरुंदा हे काँग्रेसचेही बळकट केंद्र होते. रजाकारांचेही बलवान केंद्र होते. तरीही सात ऑगस्ट मोठ्या शांततेत गेला. कारण खेडेगावी कुणी सत्याग्रह करायचा नाही असा निर्णय घेण्यात आला होता. सत्याग्रही अहिंसक असतो. त्याने जाहीररीत्या कायदा तोडावा, शांतपणे अटक करून घ्यावी हे सारे तत्त्वज्ञान खेड्यात पाळले जाणे कठीण होते. रजाकारांना कायदेशीर वागणे मान्यच नव्हते. त्यांच्या गुंडगिरीकडे पोलिस दुर्लक्ष करीत.

 म्हणून असे ठरले की, सत्याग्रहींची नावे गुप्तपणे ठरवावी. दर आठवड्यास एक तुकडी याप्रमाणे त्यांनी गुप्तपणे जिल्ह्याचे ठिकाणी परभणी येथे जावे, तेथे सत्याग्रह करावा. परभणीलाच तुरुंग होता. सत्याग्रहींना अटक केली की कोर्टापुढे नेत. त्यांना शिक्षा होई. तिथून तुरुंगात नेत. अशा प्रकारे सुमारे शंभर सत्याग्रही गावातून परभणीस गेले. त्यांनी शांतपणे सत्याग्रह केला. शहराच्या ठिकाणी कायदेशीरपणाचा निदान देखावा असे. एक निर्णय असा होता की, जे भूमिगत सशस्त्र चळवळीत भाग घेऊ इच्छितात त्या साऱ्यांनी एके दिवशी गाव सोडावे. गावापासून डोंगर जवळ होता. रात्री आठ वाजता निघावे. डोंगरावर दहा साडेदहापर्यंत पोचावे व तिथेच मुक्काम करावा. डोंगरा-डोंगराने थेट निजामी हट्टीच्या बाहेर चार दोन दिवसात जाता येई. मार्गावर असलेल्या जवळच्या खेड्यांना बातमी असली म्हणजे ते स्वयंपाक करून ठेवीत. दिवस पावसाचे होते, म्हणून कार्यकर्त्यांना अन्नपाण्याचा फार अडचण नव्हती.

 सामान्यत्वे शंभर माणसे असली की चार-दोन घरभेदे त्यात असतातच. पण

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ७२