पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतःची मावशी लग्नाच्या वेळी चौदा वर्षांची होती. चौदाव्या वर्षी तिचे लग्न जुळवण्याला अतोनात अडचणी आल्या. कारण एवढ्या मोठ्या वयापर्यंत मुलगी अविवाहित ठेवणे समाज प्रशस्त मानीत नव्हता. ही इ.स. १९४२ ची गोष्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रात यावेळी फडके, खांडेकर जुने झालेले होते आणि महर्षी कर्वे यांंच्या कार्याला काही दशके उरलेली होती. माझे चुलत आजोबा जवळपास पंचावन्न वर्षांचे होते. त्यांनी एका सोळा वर्षांच्या मुलीशी लग्न केले. हे लग्न १९४२ चेच आहे. मोठ्या प्रमाणात नातेवाईक मंडळी या लग्नाला गोळा झालेली होती. चार दिवस आनंद सोहळा चालू होता. जमलेल्या शेकडो लोकांना काही गैर घडते आहे याचे यत्किंचितही भान नव्हते. आमच्याकडे जणू शारदा नाटक पोचलेलेच नव्हते. निरनिराळे जहागीरदार आपल्या तरुण देखण्या मुली निजामाला भेट देत असत. ही जहागीरदारांची राजाला भेट म्हणून मुली देण्याची प्रथा इ. स. १९४८ सालपर्यंत होती. पोलीस अॅक्शन झाल्यानंतर निजामाच्या जनानखान्यात विपन्नावस्थेत सापडलेल्या या दुर्दैवी स्त्रियांची संख्या साडेतीनशेच्या आसपास होती. निजामाच्या कारकीर्दीत एकूण जनानखान्यात किती मुली आल्या, ज्या तिथेच राहिल्या आणि मेल्या याचा आकडा उपलब्ध नाही. पण तो सहजच एक हजाराच्या आसपास असावा असे जाणकारांचे म्हणणे आहे. यात दासी, बटकी आणि हिजडे यांचा समावेश नाही. तो अकुलीनांचा भाग झाला. ही गणती कुलीन कन्यांची चालू आहे. असे जनानखाने इतर सरदार, जहागीरदारांचेही होते. माणसाला माणूस म्हणून काही अस्तित्व असते याची जाणीवच नव्हती.

 लोकसंख्येत शेकडा ८५ हिंदू होते. अकरा टक्के मुसलमान होते, पारशी, ख्रिश्चन आणि इतर मिळून चार टक्के होते. पण सर्व जीवनावर मुस्लिम वर्चस्व होते. एक म्हणजे सर्व राज्यकारभाराचीच वरपासून खालपर्यंत भाषा उर्दू होती. राज्यकारभाराचीच भाषा नव्हे तर सर्व शिक्षणाचे माध्यमच उर्दू होते. मातृभाषेतून शिक्षण इयत्ता चौथीपर्यंत असते. त्यात तिसरी आणि चौथीला उर्दू आवश्यक भाषा असे. पुढचे तर सर्व शिक्षण उर्दूतच असे. त्यामुळे मराठी, तेलगू, कानडी या भाषांच्यामध्ये शिक्षण नाही, त्यांना राज्यकारभारात वाव नाही. म्हणून त्यांच्या विकासाची सोयच नव्हती. सर्वांच्या भाषेवर उर्दूचे दाट संस्कार पसरलेले होते. बाकीच्यांचे सोडा पण निजामी राजसत्तेविरूद्ध संतापाने पेटून उठलेले व ज्वलज्जहाल देशभक्त असणारे आमचे स्वातंत्र्यवीर सुद्धा ज्या मराठी भाषेतून बोलत असत ती

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४३