पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/46

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मराठी उर्दूमय होती. माझ्या जिल्ह्याचे लोकप्रिय काँग्रेस नेते आपल्या व्याख्यानाचा आरंभ मराठीतून बोलताना “माझे अजिज परभणीच्या रहनेवालो आज मी तुमच्या सामने एक महत्त्वाची गुजारीश पेश करण्यासाठी खडा आहे." असा करीत असत. त्यामुळे सर्व जीवनावर संपूर्णपणे गाढ असे मुस्लिम संस्कृतीचे आक्रमण दिसून येत असे. त्याचा कुणाला संकोचसुद्धा वाटत नसे. हैदरावादेत जानेवारी, फेब्रुवारी हे महिने चालत नसत. अजूर, दये हे मुसलमानी महिने चालत. मोहरमची बारा दिवस सुटी असे. रमझान संपूर्ण महिना अर्धा दिवस सुटी असे. सर्व मुसलमानी सणांना सुटी असे. मोहरमच्या सणात हिंदू मंडळी ताबुतांच्या समोर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने 'धुला, धुला,' करीत नाचत असत.

 मशिदींच्या समोर वाद्ये वाजवायची नाहीत हा तर नियम होताच पण मशिदीच्या शेजारी कोणतेही घर मशिदीहून उंच असू नये असाही नियम होता. हिंदूच्या घराची खिडकी अशी असू नये की ज्यामुळे मुसलमानांच्या घरात पाहता येईल. गोषा सर्वत्र कसोशीने पाळला जाई. जाहीर सभा आणि व्याख्याने शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय घेता येत नसत. वर्तमानपत्रे बाहेरची फारशी आत येऊ द्यायची नाहीत, आत काढू द्यायची नाहीत, असे एक सूत्र होते. असा एक अलिखित कायदा होता की सरकारी शाळा फारशा काढायच्या नाहीत, खाजगी काढू द्यायच्या नाहीत. सामान्यपणे एका जिल्ह्यात लहानमोठी तेराशे गावे असत. इतक्या गावांच्यासाठी मिळून मुलांची दोन हायस्कूले आणि मुलींचे एक हायस्कूल पुरेसे आहे असे शासनाला वाटे. याहून वरच्या शिक्षणाची सोय तर फक्त राजधानी हैदराबाद इथेच होती. नोकऱ्यांचे दोन भाग पाडले जात असत. पहिल्याला ओहोदे कुलिया-महत्त्वाच्या नोकऱ्या असे म्हणत. त्यात सामान्यपणे सत्त्याण्णव ते अठ्याण्णव टक्के मुसलमान असत. दुसरा गट ओहोदे-गैर कुलिया हा असे. म्हणजे बिनमहत्त्वाच्या नोकऱ्या. त्यात पंचाहत्तर टक्के मुसलमान असत. लोकसंख्येत ते अकरा टक्के होते. यामुळे सर्व शासकवर्ग खालपासून वरपर्यंत मुस्लिम समाजातील असे. सावकारीसुद्धा अरब, रोहिले व पठाण मोठ्या प्रमाणात करीत. त्या खालोखाल मारवाडी सावकार असे. कुणालाही मुसलमान धर्म स्वीकारता येत असे. पण मुस्लिम धर्म कुणाला सोडता येत नसे. कुणाला फसवून अगर सक्तीने जरी मुसलमान केले असले, किंबहुना एक माणूस मुसलमान झाला आहे अशी नुसती अफवा जरी असेल तरी तो मुसलमानच समजावा लागत असे. कारण वेळ पडली तर

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४४