पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतंत्र राष्ट्र आहोत ही भूमिका आग्रहाने पुरस्कारणारी एखादी संघटना हैदराबादेत अस्तित्वात असली पाहिजे. या दृष्टीने निजामाने इत्तहादुल मुसलमिन ही संघटना अस्तित्वात आणली होती. निजामाच्या कृपेने अस्तित्वात आलेली आणि त्याच्या कृपेनेच बलवान झालेली अशी ही संघटना. हिचे नेते निजामाच्या कृपेनेच संघटनेचे नेते बनलेले नबाब बहादुर यार जंग हे होते. सगळ्याच गोष्टी मनाजोग्या घडत नाहीत त्यामुळे इत्तहादुल मुसलमिन ही संघटना व तिचे नेते बहादुर यार जंग हेही संपूर्णपणे निजामाच्या मनाजोगे घडले नाहीत. जवळ जवळ निजामाच्या राजकीय हेतूचे साधन असणारी ही संघटना काही प्रमाणात निजामाच्या हेतूच्या कक्षेबाहेर जाऊ लागली. यातूनच इ.स. १९३८ सालच्या सर्व आंदोलनाचा उदय झालेला आहे.

 या घटनेकडे अजून एका दुसऱ्या बाजूने म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाच्या बाजूनेही पाहिले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याचे आंदोलन आपल्या आरंभावस्थेत इंग्रजीतून चर्चा करणाऱ्या शहरातील सुशिक्षित मंडळीपुरतेच मर्यादित होते. शहर भागात का होईना आणि सुशिक्षित मध्यम वर्गाकडून का होईना निर्भयपणे काही कृती घडावी ही अवस्था भारतीय राजकारणात वंगभंगाच्या चळवळीमुळे आली. वंगभंगाच्या चळवळीनंतर तरुणांचे लक्ष मोठ्या प्रमाणात कृतीकडे वळू लागले. इ.स. १९२० नंतर भारतीय राजकारणाची सूत्रे गांधीजींच्या हाती गेली. महात्मा गांधींनी एकतर भारतीय राजकारण शहरांच्या बाहेर ग्रामीण भागापर्यंत सुशिक्षितांच्याकडून बहुजनसमाजापर्यंत नेण्याचा फार मोठा प्रयत्न केला आणि दुसरे म्हणजे जागोजागी सत्याग्रहाच्या रूपाने हे आंदोलन कृतीत रूपांतरित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण महात्मा गांधी जरी झाले तरी जन्मतःच ते काही सर्व विषयांचे ज्ञाते आणि जाणते असे नव्हते. तेही अनुभवाने आणि क्रमाक्रमाने शहाणे होत चाललेले होते. १९१८ पर्यंत तर महात्मा गांधींना असे वाटे की भारतावरील इंग्रजांचे राज्य आहे यात फारसे आक्षेपार्ह असे काहीच नाही. भारतावरील इंग्रजांचे राज्य सैतानी आहे आणि ते संपवलेच पाहिजे त्याशिवाय या देशाला तरणोपाय नाही या निर्णयावर एक मनोमन लाडका सिद्धांत असा होता की भारतातील सर्व संस्थानिक हे आपल्या गमावलेल्या स्वातंत्र्याचे अवशेष आहेत. हे सर्व भारतीय संस्थानिक मध्ययुगीन सरंजामशाही मनोवृत्तीत वाढलेले आहेत हे खरे आहे पण ही माणसे अस्सल राष्ट्रभक्त आहेत, त्यांचे भारतभूमीवर प्रेम आहे. त्यांनाही स्वातंत्र्याची इच्छा आहे. खरे भांडण इंग्रज राजवटीशी

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ४०