पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वतःला स्वातंत्र्य मागत होता ही गोष्ट उघडच आहे.

 निजाम आयुष्यभर या स्वातंत्र्याची सिद्धता करीत वसला. हैदराबाद संस्थानला स्वतंत्र नाणेव्यवस्था होती. ही नाणी एक पैशापासून शंभर रुपयांपर्यंत होती आणि या नाण्यांच्या जगातल्या बाजारात विनिमयाचा दर ठरलेला होता. निजामाने हैदराबादच्या चलनाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविलेली होती. हैदराबादची स्वतःची पोस्ट, टेलिग्राफ, रेल्वे इत्यादीची सोय होती. स्वतंत्र सिव्हिल सर्विस होती. स्वतःचे विद्यापीठ होते, इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, बेल्जियम, हॉलंड, ब्राझील, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, तुर्कस्थान, सौदी अरब, अफगाणिस्थान इत्यादी राष्ट्रांच्यामध्ये निजामाने परिश्रमपूर्वक स्वतःची एक लॉबी तयार केलेली होती, जगातल्या बँकांत याच्या ठेवी होत्या. हे सगळे उद्योग व्यवस्थितपणे हाताळणारा एक चाणाक्ष पाताळयंत्री पुरुष म्हणून निजामाचा विचार करण्यास आपण शिकले पाहिजे. या निजामासमोर इ.स. १९३५ सालापासून एक नवीन परिस्थिती उभी राहिलेली होती. इ.स. १९१९ साली ब्रिटिश सरकारने हे कबूल केले होते की भारतात भारतीय जनतेला जबाबदार असणारी राजवट निर्माण करणे हा इंग्रजांचा हेतू आहे. या हेतूच्या दृष्टिने काही निश्चित पुढची पावले टाकावीत असा भारतातील राजकीय नेत्यांचा आग्रह होता व त्या दृष्टीने अखिल भारतीय काँग्रेसने इ.स. १९२९ सालापासून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी सुरू केलेली होती. भारतीय जनता संपूर्ण स्वातंत्र्य मागत होती. ते देण्याची इंग्रजांची इच्छा कधीच नव्हती. पण सुधारणेचा एक नवा हप्ता देण्यास इंग्रज़ तयार झाले होते. त्या वाटाघाटीतून इ.स. १९३५ चा कायदा साकार होत होता. १९३५ च्या कायद्यात ब्रिटिश इंडिया बरोबर संस्थानांचाही विचार होता. या कायद्याच्या मागे संपूर्ण भारताचे एक फेडरेशन म्हणजे संघराज्य बनवावे असे एक सूत्र होते. संस्थानिकांनी आपआपल्या अटी घालून या संघराज्यात जायचे होते. प्रांतिक कारभार संपूर्णपणे भारतीय जनतेच्या आधीन, केंद्रीय कारभारात भारतीय जनतेचा सहभाग आणि सर्व भारताचे एक संघराज्य ही दिशाच निजामाला संपूर्णतः नापसंत होती. कारण सर्व भारतात लोकशाही आणि जनतेचे राज्य आले तर हैदरावाद संस्थानातही क्रमाने राजा नामधारी होणार म्हणजे स्वतंत्र राष्ट्राचे स्वप्न संपलेच. यामुळे निजामाचा संघराज्यात सहभागी व्हायला विरोध होता. एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून उरलेल्या भारताशी मैत्रीने वागण्याची त्याची तयारी होती. यामुळे इ.स. १९३७ च्या सुमारास निजामाने मनाशी काही निर्णय

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ३८