पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

निमित्ताने सांगण्याचा विचार आहे.

 हैदराबाद संस्थान आणि तेथील राजकारण समजून घ्यायचे असेल तर अतिशय चतुर आणि चाणाक्ष त्याचप्रमाणे अत्यंत सावध असणारे हैदराबादचे राजे शेवटचे निजाम यांचा थोडा परिचय आपल्याला असला पाहिजे. मुळात हैदराबाद संस्थान हे मोगल साम्राज्याचा एक भाग म्हणून अस्तित्वात आलेले संस्थान आहे. आलमगीर औरंगजेब याच्या तालमीत पूर्णपणे वाकबगार झालेला मीर कमरुद्दीन हा या संस्थानचा निर्माता होय. या कमरुद्दीनलाच चिन्किलीजखाँन म्हणजे छोटा तलवार बहाद्दर, निजाम उलमुल्क, आसफजहाँ इत्यादी पदव्या आहेत. मोगल साम्राज्याच्या ऱ्हासकाळी दक्षिणेच्या सुभेचा सुभेदार म्हणून कमरुद्दीनने कारभार सांभाळला आणि हळूहळू दक्षिणेच्या सुभ्याचे एका स्वतंत्र राज्यात त्याने रूपांतर केले (इ.स. १७२४) कधीही फारसा मोठा विजय न मिळवता सतत पराभवाचे तडाखे खात एखादे राज्य अस्तित्वात कसे आणावे यावाबत हा पहिला निजाम अतिशय धूर्त होता. त्याच्यानंतर क्रमाने या संस्थानच्या गादीवर निरनिराळे लोक आले. हे हैदराबादचे राजे निजाम म्हणून ओळखले जात. या गादीवरचा सातवा आणि शेवटचा निजाम इ.स. १९११ साली गादीवर आला. हा हैदराबादच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या शेवटच्या निजामाचे नाव उस्मानअली असे होते. सर्व जगभर या निजामाची प्रसिद्धी श्रीमंती व चिक्कूपणा यासाठी होती. निजाम हा अतिशय चिक्कू म्हणून प्रसिद्ध आहे. पण कायदा व सुव्यवस्थेचा एक तज्ज्ञ, महत्त्वाकांक्षी आणि पाताळयंत्री असा चाणाक्ष, मुत्सद्दी म्हणून त्याची फारशी कीर्ती नाही. खरे म्हणजे त्याने अतिशय कौशल्याने हैदराबाद संस्थानचे स्वातंत्र्य जवळ जवळ सिद्ध करीत आणलेले होते. हिंदुस्थानचा भाग नसणारे स्वतंत्र, सार्वभौम हैदराबाद नावाचे राष्ट्र अस्तित्वात आणण्याची महत्त्वाकांक्षा निजामाने जवळजवळ पूर्ण करीत आणलेली होती, योगायोगाने त्याची ही सर्व स्वप्ने त्याच्या मित्रांनी वेळेवर पुरेसा पाठिंबा न दिल्यामुळे धुळीला मिळाली. निजाम हा भारतीय राष्ट्रवादाचा शत्रू, हैदराबाद संस्थानातील जनतेचा आणि जनतेच्या स्वातंत्र्याकांक्षेचा शत्रू, पण म्हणूनच शत्रूची काळजीपूर्वक पारख आपण केली पाहिजे. आपल्या सगळ्या राजकारणात शत्रूची नीटशी ओळख नसणे हा नेहमीच कच्चा दुवा राहिलेला आहे.

 इ.स. १९११ साली उस्मानअली हे हैदराबादचे निजाम झाले, ज्यावेळी उस्मान

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ३६