पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






३.
१९३८ चा हैदराबादचा लढा

 इ. स. १९३८ हे वर्ष हैदराबादच्या राजकीय जागृतीत एक महत्त्वाचा टप्पा असणारे वर्ष आहे. हैदराबाद संस्थानातील सर्व राजकारण १९३८ नंतर एकदम वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचते. इ.स. १९४८ साली पोलिस अॅक्शनमुळे हैदराबात संस्थानचे अस्तित्व संपले आणि हैदराबाद हा भारतीय संघराज्याचा भाग बनला. ३८ ते ४८ हे दशक हैदराबादच्या संस्थानी जीवनात क्रमाने जागृती वाढत जाण्याचे आणि राजकीय आंदोलन उग्र; उग्रतर होण्याचे दशक आहे. या सगळ्या लढ्याला इ.स. १९३८ सालापासून आरंभ होतो यामुळे या टप्प्याचे महत्त्व आहे. वेगवेगळ्या मार्गांनी या आंदोलनाची पूर्वतयारी होत होती. हिंदू महासभेने आरंभिलेला भागानगर निःशस्त्र सत्याग्रह, आर्य समाजाने सुरू केलेले आंदोलन, हैदरांबात स्टेट काँग्रेसने आरंभिलेला सत्याग्रह, विद्यार्थ्यांनी सुरू केलेली वंदे मातरम्ची चळवळ आणि बहादूर यार जंग या मुसलमान नेत्याने गतिमान केलेली मुसलमानांची राजकीय चळवळ हे ठळकपणे समोर दिसणारे पाच घटक होते. या पाच घटकांच्या मागे अतिशय महत्त्वाचा असा दोन वृत्तींचा संघर्ष होता. त्यापैकी एका वृत्तीचे नेते हैदराबादचे अतिशय चतुर आणि चाणाक्ष असे नेते व राजे मीर उस्मान अलिखाँ बहादूर हे सातवे निजाम होते आणि दुसऱ्या वृत्तीचे नेते महात्मा गांधी होते. एखादी राजकीय घटना समजून घ्यायची असेल तर ती सुटी सुटी समजून न घेता तिच्या मागचे-पुढचे सर्व धागेदोरे सामग्र्याने समजावून घेतले पाहिजेत. १९३८ साली हैदराबाद संस्थानात जे राजकीय जागृतीचे पर्व सुरू होते त्यामागे असणारी जी पार्श्वभूमी - तिचा एक स्थूल आराखडा या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / ३५