पुण्यामुंबईला आम्ही गुन्हेगार ठरविलेले नाही. सगळे हैदराबाद संस्थान मागासलेलेच होते. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या हैदराबाद संस्थानात धर्मवेडी जातीय राजवट नांदत होती. कधी तरी हा अंधार संपणार होता. सर्व भारतभर पेटलेल्या स्वातंत्र्य आकांक्षेने हैदराबाद संस्थानसुद्धा पेटून उठणारच होते. हैदराबाद संस्थानात जागृतीचे अग्रदूत कोण होते? कुणी वामन नाईकांचे नाव घेतील, कुणी केशवराव कोरटकरांचे नाव घेतील. दोघेही मराठीभाषिक होते. मराठवाडाच हैदराबादच्या स्वातंत्र्य आंदोलनात अग्रभागी होता. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ. जन्माने कानडी पण मराठवाडा त्यांची कर्मभूमी. हे मराठवाड्याचे नेते. सगळ्या सशस्त्र आंदोलनाचे म्हणजे कृतिसमितीचे अध्यक्ष दिगंबरराव बिंदू मराठवाड्याचे. कृतिसमितीचे चिटणीस गोविंदभाई श्रॉफ हे तर आजही मराठवाड्याचे सर्वांत आदरणीय नेते मानले जातात. हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य लढ्यात मराठवाडा अग्रेसर होता. जागृतीतही आणि पुढे सशस्त्र आंदोलनातही.
हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य लढ्याचा अर्थ पुष्कळदा लोकांना कळत नाही. तो केवळ संस्थानाच्या विलीनीकरणाचा लढा नव्हता. भारताच्या प्रादेशिक अखंडतेचाच तो लढा होता. ज्या संख्येने इथे सत्याग्रह झाले, ज्या संख्येने सशस्त्र आंदोलनात लोक सहभागी झाले ते प्रमाण भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वोच्च प्रमाण आहे आणि जनतेवर जे अत्याचार झाले त्याचे प्रमाणही फार मोठे आहे. उठसूठ कोणत्याही छोट्यामोठ्या घटनेच्या वेळी रझाकारांची आठवण काढणारे लोक आहेत. त्यांना रझाकारांचे अत्याचार म्हणजे काय हेही माहीत नसते. आणि सशस्त्र रझाकार व सर्व धर्मवेडे साह्याला घेऊन शासन नागवेपणाने नाचत होते तरीही जी जनता झुंजत राहिली, जिचा कणा व मान ताठ राहिली त्यांच्यावर सहजासहजी पराभव लादता येत नसतो, हेही पुष्कळ मंडळी विसरतात. प्रतिकूल परिस्थिती व अनन्वित अत्याचार म्हणजे काय हे आम्ही भोगलेले आहे. तरीही हे सारे पाशवी सामर्थ्य मराठवाड्याला नमवू शकले नाही. या आमच्या स्वातंत्र्यलढ्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. आमचा स्वातंत्र्यलढाच कुणी पुसून टाकतो म्हटले तर ते जमणारे नव्हे. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत त्याग, बलिदानाच्या रोमहर्षक कहाण्यांत मराठवाडा नेहमी अग्रभागी राहिला. हुतात्मा गोविंदराव पानसरे, हुतात्मा बहिर्जी नाईक हे दोन हुतात्मे म्हणजे बलिदान करणाऱ्या अनेकांचे प्रतिनिधी. आमचा हा गौरवास्पद वारसा आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आम्ही पुढे होतो. राष्ट्रासाठी मरण्यात आम्ही पुढे होतो हे अभिमानाने सांगताना आम्हाला संकोच