पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/222

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात एकच आहे हे आपण लक्षात घ्या. उरलेली जी जनतेची चळवळ आहे तिच्याबद्दल मी फारसे सांगणार नाही. फक्त अजून एक गोष्ट सांगून मी दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहे.

 उमरी बँकेतील लुटीचे पैसे आले एकवीस लाख. ही रक्कम आमच्या लढ्याच्या दृष्टीने अत्यंत अपुरी होती. एकटे नांदेडचेच घेतले तर उमरखेड या ठिकाणी दोन हजार कार्यकर्ते होते. या दोन हजार लोकांचे खाणेपिणे, कपडे, इतर गरजा आणि कार्यालय यांचा खर्च गांजवे हे व्यापारी असल्याने त्यांनी नोंदलेला आहे. हा खर्च दरमहा साठ हजारांच्या घरात जातो. एकटे उमरखेड कार्यालय सांभाळण्याचा फेब्रुवारी अट्ठेचाळीस ते सप्टेंबर अठेचाळीसपर्यंतचा खर्च दरमहा साठ हजारांच्या घरात होता. यामध्ये माणसांचे कपडे, अंथरुणे, रहायचे घराचे भाडे, दोन वेळचे जेवण, कार्यालय खर्च, जाण्यायेण्याचा खर्च समाविष्ट आहे. दोन हजार माणसांना माणशी तीस रुपये महिन्याला असे स्थूल प्रमाण पडते. सकाळ-संध्याकाळ भाकरी, आठवड्यातून एक दिवस भात-भाकरी आणि भाजी, पंधरा दिवसांतून एकदा डोक्याला लावायला तेल, पंधरा दिवसांनी एकदा हजामत, एक घोंगडी, पांघरायला एक चादर, एका खोलीत दहा माणसे अशा निकृष्ट जीवनात कार्यकर्ते राहात असत. तरीसुद्धा फक्त एका उमरखेडचा खर्च साठ हजार महिना होता. यात शस्त्रास्त्र खरेदी नाही. त्या खरेदीचा खर्च वेगळा. आमच्याकडे जी शस्त्रे होती ती कोण्या ठिकाणी किती होती याचे आकडे नाहीत. उमरखेड कार्यालयाने किती शस्त्रास्त्रे पोलिस आणि कलेक्टर यांच्या स्वाधीन केली यांचा पंचनामा केलेला आहे. जी अधिकृत वैयक्तिक शस्त्रास्त्रे होती त्यांचा यात समावेश नाही. यामध्येसुद्धा दोनशेपन्नास रायफली होत्या; हातबॉम्ब होते. माझे मधले मामा रामचंद्रराव नांदापूरकर यांनी भारत सरकारला शस्त्रास्त्रे सादर केलेली आहेत. त्यात चौतीसशे हातबॉम्ब होते. आमच्या कार्यकर्त्यांनी जी एकूण शस्त्रे भारत सरकारच्या स्वाधीन केली त्यांची किंमत साठ लक्ष रुपयांहून जास्त आहे. तसेच वर एका शिबिराचा हिशोव सांगितला त्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या अनेक शिबिरांचा जो खर्च होईल तो लाखात मोजण्याच्या पलीकडचा आहे. हे सर्व लक्षात घेतले तर एकवीस लाखांनी काहीही भागत नाही हेही आपल्या लक्षात येईल. स.का.पाटील, जयप्रकाश नारायण, द्वारकाप्रसाद मिश्रा यांनी प्रचंड मदत केली. संस्थानी हद्दीतून मदत आली. कार्यकत्यांनी भिक्षा मागून कितीतरी पैसा मिळविला. हा सर्व या प्रचंड भुकेत संपलेला आहे. आंदोलने

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२४