पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/221

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वाधीन मोजून केले व त्याची पावती घेतली. पोलिस कारवाई संपल्याच्या नंतर या सर्व पैशाचा हिशोब पैन् पैपर्यंत आम्ही घेणार असे वल्लभभाईंनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. त्यामुळे कारवाई संपल्यानंतर पुण्याची एक हिशोबतपासनीस कंपनी बाळ आणि आगळे यांनी काँग्रेसचे त्या वेळचे सरचिटणीस शंकरराव देव यांच्या साक्षीने, हैदराबादमधील श्रीधर नाईक यांच्या बंगल्यात हे हिशोब तपासले आणि प्रत्येक पैचा हिशोब आहे असा दाखला दिला. या दाखल्याच्या प्रती करून ज्यांनी पैसे मोजून दिले त्या भगवानराव गांजवे यांनी एक प्रत, दिगंबरराव बिंदू यांनी एक प्रत व तीन प्रती शंकरराव देव यांनी घेतल्या. त्यातील एक अखिल भारतीय काँग्रेसला दिली. एक सरदार पटेलांना दिली. एक स्वतःपाशी ठेवली. हे प्रामाणिकपणाचे एक महान लोकविलक्षण पर्व आंदोलनात घडले.*

 आमच्या सर्वच माणसांचे चारित्र्य आणि निष्ठा या पातळीच्या होत्या असे नाही. कारवाई संपल्यावर आमचे कार्यकर्ते आत आले आणि त्यांनी वेगवेगळ्या मुसलमानांकडून त्यांचा जीव वाचवण्यासाठी पैसे घेतले. यश मिळाल्यावर चारित्र्याची पातळी शिल्लक राहिली नाही. दहा हजार, वीस हजार, पंचवीस हजार असे पैसे घेऊन कार्यकर्त्यांनी चोरांचे जीव वाचविले. ते लोक जेव्हा हे पैसे खर्चु लागले तेव्हा जो तो म्हणू लागला की ही उमरी बँकेची लूट आहे. आंदोलनानंतर अनेक वर्षे, मराठवाड्यातील जो कार्यकर्ता आंदोलनापूर्वी गरीब होता तो जरा चलता फिरता झाला की लोकांनी म्हणावे ही उमरी बँकेची लूट आहे. पण उमरी बँकेचा एक आधलाही कुणाला मिळालेला नाही. आता जी मंडळी सांगतात की उमरी बँक लुटत असताना आपण तिथे हजर होतो, त्यांतील फारच थोडे तिथे होते. जे तिथे होते त्यांना साहेबराव आबासाहेब लहानकर, रघुनाथ रांजणीकर, नागनाथ परांजपे, अनंत भालेराव इत्यादींनी दाखला दिला पाहिजे. इतरांवर कुणी विश्वास ठेवू नये. काशीनाथ शेट्टी आता हयात नाही धनजी पुरोहित गुजराथमध्ये आहेत. इतक्या प्रचंड प्रमाणात लुटीची योजना आखून ती आखलेल्या योजनेप्रमाणे पार पाडणे आणि पैन् पैचा हिशोब चुकता करणे ही घटना


  • ही पावती आपल्या साक्षीने व माहितीने झाली व सर्व व्यवहार चोखपणे पूर्ण झाला ही जाहीर घोषणा माजी मजूरमंत्री श्री. र.के.खाडिलकर यांनी हैदराबादेत एक व्याख्यानात १९७२ ला केली होती.

- संपादक

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२२३