पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/205

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिवेशनामध्ये या परिषदेच्यामधूनही कम्युनिस्टांना हाकलून देण्याचा ठराव पंडित नेहरूंच्या आग्रहाने मांडण्यात आला. असा प्रयोग करू नये असा आग्रह तिथे गोविंदभाईंनी धरला. पण त्यांचा सल्ला डावलून परिषदेतून कम्युनिस्टांना हाकून द्यावयाचे असेच ठरले. याच्या परिणामी मराठवाड्यात जे मार्क्सवादी होते त्यांना राष्ट्रीय आंदोलनाच्या बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला. सी.डी.; व्ही.डी.; आर.डी. या त्रिकुटाने हा निर्णय घेतला व ते संस्थानी काँग्रेसमध्ये आलेच नाहीत. त्यांनी महाराष्ट्र प्रांतिकपासूनसुद्धा फटकून वागायला सुरुवात केली. भाऊसाहेब वैशंपायन, गोविंदभाई श्रॉफ आणि त्यांचे अनुयायी यांनी राष्ट्रीय आंदोलनात राहावयाचे असे ठरविले. गांधींनी हे सगळे चालू दिले आणि पंचेचाळीस साली सांगितले की यापुढे मी हैदराबादला सल्ला देणार नाही; सल्ल्याची गरज असेल तर तो पंडित नेहरूंकडून घ्यावा. त्याप्रमाणे पंडित नेहरूंना सल्ला विचारण्यासाठी ही हैदराबादी मंडळी गेली. नेहरू म्हणाले की आता स्वातंत्र्याच्या वाटाघाटी चालू आहेत. आता वेगवेगळ्या संकल्पना पुढे येतील. आता हीच वेळ आहे. महाराष्ट्र प्रांतिक आणि आंध्र प्रांतिक यांनी आता स्पष्टपणे राजकीय भूमिका घ्यावी. हे ठरल्यावर महाराष्ट्र प्रांतिकचे अधिवेशन लातूरला झाले. त्याचे अध्यक्ष आ.कृ.वाघमारे होते. या अधिवेशनात ही भूमिका घेण्यात आली : हैदराबाद संस्थानमध्ये प्रौढ मतावर आधारलेली लोकशाही आणि संपूर्ण जबाबदार अशी राज्यपद्धती स्थापन करण्यात आली पाहिजे. ज्या मागणीसाठी संस्थानी काँग्रेसवर बंदी पडली तीच मागणी महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसने केली. पुढे दोन महिन्यांनी हीच मागणी आंध्र प्रांतिक आणि कर्नाटक प्रांतिक यांनी केली. आता निजामापुढे प्रश्न हा की या सगळ्या संघटनांना नव्याने पुन्हा बंदी घालायची की नाही? हा एक प्रश्न. दुसरे असे की अखिल भारतीय संस्थानी प्रजा परिषदेने असा आदेश दिला की निजामाने संस्थानी काँग्रेसवरची बंदी त्याच्याशी नानाप्रकारे पत्रव्यवहार करूनही उठविलेली नाही. संस्थानी काँग्रेसला असे वाटते की निजामाला अशी बंदी घालण्याचा अधिकारच नाही. म्हणून ही बंदी तातडीने उठविण्यात आली नाही तर ती बंदी अस्तित्वातच नाही असे काँग्रेसने मानावे व जाहीरपणे आपला कारभार सुरू करावा. म्हणजे नव्या सत्याग्रहाचे अंतिमोत्तरच! आता सबंध भारतभर स्वातंत्र्याच्या वाटाघाटी चालू आहेत. भोवती चोहीकडे सर्व प्रांतांत काँग्रेसची मंत्रिमंडळे चालू आहेत. केंद्रात काँग्रेसचे हंगामी सरकार यायचे घाटत आहे. अशा वेळी नव्या सत्याग्रहाच्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /२०७