पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/204

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

श्रॉफ हे बोलून चालून मार्क्सवादी होते. वैशंपायन मार्क्सवादी होते. जी.डी., आर.डी. आणि व्ही.डी. असे तीन महत्त्वाचे 'डी' त्यावेळी महाराष्ट्र परिषदेमध्ये होते. हे तिघेही मार्क्सवादी होते. पण मार्क्सवादी नसणारी बाबासाहेबांसारखी मंडळीही जमीनदाराच्या विरोधी होती. स्वामी रामानंद तीर्थ हेही जमीनदार विरोधी होते.

 इथे परभणीच्या मुकुंदराव पेडगावकरांचीही आठवण व्हावी. तेही तरुणांच्या बरोबरच होते. 'ठीक आहे. आताच वेळ आलेली आहे. मग आताच बोलायला काय हरकत?' अशी मुकुंदरावांची भूमिका. ते मार्क्सवादी नव्हते पण उदारमतवादी होते. जमीनदारांविरुद्ध बोलायला काहीच हरकत नाही असे त्यांचे मत होते. मुकुंदरावांचे शालेय शिक्षण फारसे नव्हते. ते सनातनीही होते. तरीही त्यांची मते जमीनदारीविरोधी होती. दुसरे प्रभावी नेते औरंगाबादचे माणिकचंद पहाडे. हेही मार्क्सवादी नव्हते. पण गोरगरिबांचे कनवाळू होते. त्यामुळे जमीनदार विरुद्ध अशी त्यांची भूमिका होती. त्यांचे असेही मत होते की अरब, रोहिले, पठाण यांच्या सावकारीला परिणामकारी शह देण्यासाठी सावकार, जमीनदार यांच्या विरोधी भूमिका हवी. महाराष्ट्र प्रांतिक परिषदेमध्ये जमीनदारविरोधी प्रवाह असा होता. याविरुद्ध स्पष्टपणे उभे राहून संघटनेचे दोन तुकडे करण्याची ताकद असलेला प्रभावी विरोध नव्हता. त्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक चालू राहिली. कर्नाटक प्रांतिकमध्ये पुरोगामी लोकांचा प्रभाव नव्हता; म्हणून तीही चालू राहिली. आंध्र प्रांतिकचे मात्र दोन तुकडे झाले. या प्रांतिक परिषदांची अधिवेशने क्रमाने चालत राहिली. ही चालत असताना हैदराबादमध्ये पुन्हा आंदोलन चालू करायला गांधींनी परवानगी दिली नाही. काही प्रमाणात चाळीसला वैयक्तिक सत्याग्रही, काही प्रमाणात बेचाळीसचे आंदोलन हैदराबादमध्येही झाले, पण संस्थांनी काँग्रेसचे अधिकृत कामकाज चालू नव्हते. महाराष्ट्र प्रांतिक परिषदेने अधिकृतपणे राजकीय भूमिका घेतलेली नव्हती. मात्र दर पावलावर ही परिषद राजकीय भूमिकेपर्यंत जाऊन पोचत असे.

 या अवस्थेत पंचेचाळीस साल उघडले. बेचाळीसच्या चळवळीनंतर पंचेचाळीस साली अखिल भारतीय काँग्रेसमधून कम्युनिस्टांना बाहेर काढले. ही हकालपट्टी जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झाली. कारण दुसऱ्या महायुद्धामध्ये देश स्वातंत्र्यासाठी लढत असताना रशिया इंग्लंडबरोबर होता म्हणून महायुद्धाला लोकयुद्ध ठरवून कम्युनिस्टांनी भारतीयांविरुद्ध इंंग्लंडला पाठिंबा दिला. यानंतर संस्थानी प्रजापरिषदेच्या जयपूरच्या

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन / २०६