पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/191

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्याही वर्षाचे अध्यक्ष होते. या तय्यबजींची मुलगी बिलग्रामींना दिलेली होती. तिची म्हणजे बिलग्रामींची मुलगी ही नबाब अलियावरजंग यांची बायको. त्यामुळे अलियावरजंग हे असे मनुष्य होते की त्यांचे सर्व भारतातील राष्ट्रीय मुसलमानांशी नाते तरी पोहोचत होते नाहीतर वाडवडिलांची ओळख तरी पोचत होती. हे अलियावरजंग निजामाचे खास सल्लागार. हे संबंध लक्षात ठेवायलाच पाहिजेत. आणखीही एक नाते सांगतो. मधल्या काळात मिर्झा इस्माईल यांना निजामाचे दिवाण म्हणून बोलावले होते. काही काळ हे मिर्झा इस्माईल वजीरे आझम म्हणजे पंतप्रधान होते. या मिर्झा इस्माईलना बिलग्रामींची दुसरी मुलगी दिली होती. म्हणजे हे अलियावरजंगांचे साडू. ही सारी नाती लक्षात ठेवल्यावरच अनेक राजकीय हालचालींचा नेमका अर्थ समजतो.

 अठराशे ब्याण्णवमध्ये हैदराबादला आर्य समाजाची स्थापना झाली. ही कुणी केली हे अज्ञात आहे. वर केशवराव कोरटकरांचा उल्लेख आला. वीस सालापासून केशवरावांनी आर्यसमाज आपल्या हाती घेतला. नंतर संपूर्ण हैदराबादभर मुसलमानविरोधी चळवळ करण्यासाठी ज्यांची ताकद उपयोगी पडेल असे वाटले, अशा आर्यसमाजाच्या शाखांची साखळी उभी करण्याचा प्रयत्न केला. एकीकडे हे निजामाच्या विश्वासातील. दुसरीकडे सबंध संस्थानभर आर्यसमाजाच्या शाखा कायम करीत हिंडले. आर्यसमाज हीच हैदराबाद संस्थानातील अशी पहिली संघटना की जिने हातात हत्यार घेऊन मुसलमानाविरुद्ध लढण्याची पहिली प्रेरणा हिंदूंना दिली. पहिल्या सगळ्या मारामाऱ्या आर्यसमाजाच्या नेतृत्वाखाली झालेल्या आहेत. आणि या समाजाचा संपूर्ण विकास निजामाचे अत्यंत विश्वासू केशवराव कोरटकर यांनी केलेला आहे. या केशवराव कोरटकरांच्या सगळ्या साहित्य संमेलनाशी संबंध. तेव्हा सगळे साहित्यिक यांच्यापुढे हात जोडून उभे. यांचे गांधीजींना सतत सांगणे असे की, हैदराबादमध्ये राजकीय आंदोलन सुरू झाले पाहिजे, मी मात्र त्याचा सभासद होणार नाही. लागणारा सर्व पैसा मी मिळवून देईन. गांधींचे म्हणणे असे होते की, हैदराबादमध्ये राजकीय आंदोलन करण्याची अवस्था अजून आलेली नाही. तुम्ही शैक्षणिक आंदोलनाने सुरुवात करावी. याच काळामध्ये आंध्र प्रदेशातील एक दारूचे मक्तेदार आणि जुन्या निजामातील एक

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९३