पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वतनदार वामनराव नाईक हे हैदराबादला आले.* निजामाच्या आतल्या गोटात प्रवेश, काही इतर व्यापारी उद्योग आणि दारूचे मक्ते यांच्या जोरावर त्यांचा उद्योग सुरू झाला. हे वामनराव नाईक मुसलमानांचे कडवे द्वेष्टे होते. हेही निजामाच्या अत्यंत विश्वासातले. यांनी जागोजाग हिंदूंचे व्यायामाचे आखाडे स्थापण्यास मदत केली. जिथे लाठ्याकाठ्या शिकणारे हिंदू असतील तिथे शेपन्नास लाठ्या, शेपन्नास लेझिम आणि दोनचार तरवारी पुरविण्यास आरंभ केला. हैदराबाद संस्थानात हिंदुमहासभा स्थापन झाली त्या वेळी हजर राहणाऱ्यात एक नेते वामनराव होते. म्हणून हैदरावाद संस्थानची हिंदुमहासभा वामनरावांना आपले संस्थापक पितामह मानते. या वामनराव नाईकांचाही गांधींना सतत आग्रह चालू होता की तुम्ही हैदराबादमध्ये राजकीय आंदोलन सुरू करा. हे जर तुम्ही सुरू केलेत व त्याला नेतृत्व आणि मार्गदर्शन केलेत तर मी माझे सारे आयुष्य त्याला समर्पण करीन. मग माझे काहीही होवो. या वामनराव नाईकांचा परभणीशी अत्यंत निकटचा संबंध. कारण त्यांची दारू गाळण्याची यंत्रणा (Distillery) परभणीला होती. त्यांची एक कापडाची गिरणी अजूनही परभणीत आहे. एक गिरणी नांदेडमध्ये आहे. सेलूमधील कापसाच्या व्यापाराशी त्यांचा संबंध आहे. असे हे वामनराव नाईक. यांचे चिरंजीव बॅरिस्टर श्रीधर नाईक हे महाराष्ट्र प्रांतिक बरोबर आणि स्वामीजींच्याबरोबर मरेपर्यंत राहिले. त्यांनी दुसरा काहीही उद्योग केला नाही. स्वामीजींच्या सहवासाचे काही फायदे त्यांना व त्यांच्या सहवासाचे काही फायदे स्वामींना म्हणजे आंदोलकांना मिळाले. याच तरुण मंडळींच्या कंपूत रामचंद्र नाईक नावाचा एक युवक होता. हा नुकताच बॅरिस्टर होऊन आला होता. हा वामन नाईकांचा पुतण्या. हा चांगला वक्ता होता. निजामी राजवटीविरुद्ध बेछूट बोलावयाचे काम याचे. वामनरावांनी याला सांगितले होते, तुझी वकिली चालो अथवा न चालो, तुला पाचशे रुपये महिना घरपोच येतील. काम एकच. रोज निजामाला शिव्या देत राहावयाचे. या उद्योगात तुला तुरूंगात जावे लागले तर जा. वर्ष दोन वर्षांत तुला


  • हेही चूक आहे. वामन नाईकांचे आजोबा वनपर्ति संस्थानचे जहागीरदार होते. ते येण्याचा प्रश्न नव्हता. त्यांचा स्वतंत्र व्यवसाय १९०५ ला आरंभ झाला. आरंभी ते रेल्वेचे कंत्राटदार, नंतर तांदूळ वगैरेचे व्यापारी होते. (जन्म इ.स. १८७८ मृत्यू ६ नोव्हेंबर १९३६) - संपादक.
    • १९४२ च्या औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रांतिकचे अध्यक्ष - संपादक.
      हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९४