पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/188

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गांधी अठराशे ब्याण्णवसाली सापडणार नाहीत. ब्याण्णव ते अठ्याण्णव महात्मा गांधी आफ्रिकेत होते. या काळात गांधींची भूमिका ही राहिली आहे की आम्ही ब्रिटिशांचे अत्यंत इमानदार सेवक आहोत. रानडे, गोखल्यांची भूमिका ही होती की आम्ही ब्रिटिश सत्तेचे चाहते आहोत व ती सत्ता लोकप्रिय करू इच्छितो. या राज्यामुळे आमच्या देशाचे आधुनिकीकरण होईल म्हणून आम्ही इंग्रजांच्या राज्याचे कौतुक करतो. या वेळेपर्यंत गांधींची भूमिका अशी बदललेली आहे की, तुम्ही आमचे कल्याण करा की न करा, आधुनिकीकरण करा की न करा, या देशाचे राज्य तुम्हाला दिलेले आहे. ईश्वराची इच्छाच ती आहे की हिंदुस्थानवर राज्य तुम्ही करावे. आम्ही तुमचे नागरिक आहोत. आमची अशंक निष्ठा संपूर्णपणे (Undoubted Absolute Loyalty) इंग्रजांच्या राज्याशी आहे. ही गांधींची भूमिका आहे. या भूमिकेने इंग्रजांना फार त्रास झाला. कारण ‘आमची तुमच्यावर निष्ठा आहे व तुम्ही न्यायी आहात' असे म्हणताच इंग्लंडमध्ये इंग्रज प्रजेचे जे अधिकार आहेत तेच भारतीय प्रजेला हवेत असा अर्थ निघाला. भारतीयांना हे अधिकार द्यावेत अशी इंग्रजांची इच्छा आहेच, परंतु ते दिले जात नाहीत कारण इंग्रजी अधिकारी अडाणी आहेत. यासाठी इंग्लंडचा राजा आणि प्रजा यांच्या आत्म्याला जागृत करण्याची आवश्यकता आहे; ही गांधींच्या भूमिकेची पुढची व्याप्ती. इंग्रजांचे हक्क भारतीयांना पाहिजेत या निर्णयावर गांधी कळत न कळत बावीस सालपर्यंत आहेत. आता ते आफ्रिकेचे नेते नाहीत. भारताचे नेते आहेत. ही गांधींची उपरिनिर्दिष्ट भूमिका बावीस नंतर लगेच बदलली असून त्या वेळी त्यांनी न्यायालयात असे सांगितले आहे की, इंग्रजांचे राज्य हे देवाचे नसून सैतानाचे आहे असे त्यांचे मत आहे. हे राज्य मोडून टाकून समाप्त केल्याशिवाय भारताचेही कल्याण होणार नाही व इंग्रजांचेही कल्याण होणार नाही. हे मत प्रकट करून गांधी म्हणतात, "तुमच्या कायद्यात जी सर्वांत जास्त शिक्षा दिलेली असेल ती मला द्या. तुम्ही जर मला सोडले तर तुमचे राज्य कसे मोडावे याचे शिक्षण मी जनतेला देईन. माझी भूमिका बरोबर आहे असे जर तुमचे मत असेल तर मग न्यायाधीश महाराज तुम्ही इकडे माझ्या बाजूला या. तुमच्या पदाचा राजीनामा देऊन या. म्हणजे दुसरा कोणीतरी तुमच्या आसनावर बसून आम्हा दोघांना शिक्षा देईल." हे बावीस सालाअखेर गांधींचे मत. अठ्याण्णव - नव्याण्णव सालापासून हे क्रमाने बदलत इथे आले.

 संस्थानिकांविषयीचे गांधीजींचे वीस सालच्या सुमाराचे मत पाहा : हे जे सारे

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९०