पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/189

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

संस्थानिक आहेत ते आपल्या प्रिय भारतभूमीने जे स्वातंत्र्य गमावले त्या स्वातंत्र्याचे अवशेष आहेत. संस्थाने स्वतंत्र आहेत असे गृहीत धरले पाहिजे. त्यांच्या डोक्यावर असणारा इंग्रजांचा हात काढून घेतला पाहिजे. म्हणजे भारताचा तेवढा प्रदेश स्वतंत्र झाला, आणि उरलेल्या प्रदेशावरचे इंग्रजांचे राज्य काढून टाकले म्हणजे सगळा भारत स्वतंत्र झाला. हे करीत असताना एका संस्थानिकाच्या ताब्यात जरी सर्व हिंदुस्थान द्यावा लागला तरी ते इंग्रजांच्या राजवटीपेक्षा चांगले आहे. कारण जो संस्थानिक हिंदुस्थानचा ताबा घेईल तो शेवटी भारताचाच राहील. गांधींनी एका लेखात असे म्हटले आहे की, निजामाच्या हातात सर्व हिंदुस्थान सोडून जरी इंग्रज जाणार असले तरी त्यांची (म्हणजे गांधींची) तयारी आहे. गांधींनी असेही म्हटले आहे की, अफगाणिस्तानचा अमीर जर भारतावर हल्ला करणार असेलं आणि लष्करी बळावर इंग्रजांचा पाडाव करून भारताला स्वतःचा गुलाम करणार असेल तर इंग्रजांचा गुलाम होण्यापेक्षा अफगाणिस्तानचा गुलाम होणे मी पत्करीन. ही सारी गांधींचीच वचने आहेत. ती उद्धृत करून गांधी हे कसे राष्ट्रद्रोही होते हे सिद्ध करता येईल. सत्तावीसपर्यंत गांधीजी या मताचे होते की, संस्थानामध्ये आपण लक्ष घालू नये. संस्थानात आपण लक्ष घातलेच पाहिजे असा निर्णय ज्या बड्या बड्या तरुण मंडळींचा होता त्या सर्वांत प्रमुख जवाहरलाल नेहरू होते. नंतर तीस साली गांधींना नेहरूंच्यामुळे असे वाटायला लागले की सगळेच संस्थानिक चांगले नाहीत. काही बरे होते; काही चांगले. काही

अगदीच वाईट आहेत. जेवढे चांगले आहेत तेवढेच स्वातंत्र्याचे अवशेष आहेत. जेवढे बरे आहेत त्यांच्यात काही भ्रम निर्माण झालेले आहेत. जे वाईट आहेत ते इंग्रजांच्यापैकीच आहेत. तेव्हा त्यांना काढून टाकले पाहिजे. पस्तीस साली गांधीजी या निर्णयावर आले की जेवढे म्हणून संस्थानिक आहेत त्यांतून कोणीच भारतीय स्वातंत्र्याचा अवशेष नाही. हे सारे आपल्यावर लादल्या गेलेल्या पारतंत्र्याचे खांब आहेत. म्हणून हे सारे संस्थानिक, पहिल्यापासून शेवटपर्यंत, बरे असोत, चांगले असोत की वाईट असोत पण या साऱ्यांना निकालात काढल्याशिवाय, सगळ्यांची एकजात समाप्ती केल्याशिवाय भारताचा अभ्युदय होणार नाही. पस्तीसच्या नंतर छत्तीस-सदतीसच्या सुमारास ज्या दिवशी गांधी या निर्णयावर आले त्या वेळीच हैदराबादमध्ये जनतेचे आंदोलन सुरू झाले पाहिजे व ते सुरू झाले तर त्याचे नेतृत्व आपण करू याही निर्णयावर गांधी आले. गांधीजी ही अशी एक अलौकिक विभूती आहे की, सतत योग्य दिशेने विकसित होत

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१९१