पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.






१५.
भांगडिया स्मारक व्याख्यानमाला

व्याख्यान दुसरे :

 आज सुरुवात करण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हैदराबाद संस्थानमधील सगळी जहागिरदारी, वतनदारी, जमीनदारी निजामाच्या पक्षाची होती. संस्थानी काँग्रेसमध्ये छुपी निजामाची माणसे होती. निजामाच्या बाजूचा हा काँग्रेसमधील मतकक्ष प्रबल होता. संस्थानातील संघर्षाचे स्वरूप भांडवलशाही विरुद्ध मजूर असे फारसे नव्हते. पण जमीनदार आणि कुळे यातील तीव्र संघर्ष असे त्याचे स्वरूप आरंभापासून शेवटपर्यंत होते. वतनदार, जमीनदार, जहागिरदार हे निजामाच्या बाजूचे आणि सामान्य शेतकरी कुळे-म्हणजे प्रजा निजामाच्या विरुद्ध. निजाम हा प्रजेचा शत्रू. केवळ हिंदू प्रजेचा असेच नव्हे. राज्यामध्ये असणारी मुस्लिम प्रजा तिचाही-तिला कल्पना नसली तरी-निजाम हा शत्रूच. प्रजा हिंदू असो अगर मुसलमान असो. सर्वच प्रजेचा जबरदस्त प्रतिस्पर्धी आणि शत्रू जनतेच्या साऱ्या कल्याणाचा आणि स्वातंत्र्याचा शत्रू असे आता निजामाचे रूप आहे. पण आपल्या सगळ्या चिंतनाचा एक कच्चा दुवा असतो. तो हा की आपण आपल्या शत्रूचे सामर्थ्य पूर्णपणे ओळखत नाही. ज्या शत्रूचा आपण पाडाव केलेला आहे त्याचेही स्वरूप आपण इतिहास शिकताना समजून घेतले पाहिजे. हा शत्रू होता तरी कोण? याची ताकदं किती? याचा मुत्सद्दीपणा किती? याचा पाताळयंत्रीपणा किती? याचे कर्तृत्व किती? हे आपण समजून घेतले नाही तर आपल्या विजयाचे स्वरूपही आपणास समजणार नाही. तुम्ही त्याच्याविषयी काही प्रेम बाळगावे, आदर बाळगावा असा त्याचा अर्थ

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८४