पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/183

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नसतो, तर भारताच्या इतिहासातील ही नेहमीची कच्ची बाब आहे की, आपण आपला शत्रू समजून घेण्यात कमी पडतो, ती या वेळी टाळली पाहिजे. शिवाजीने ही चूक कधीही केली नाही. पण आलमगीर औरंगजेब समजून घेण्याच्या बाबतीत पुढच्या काळात नेहमी चूकच झाली. पेशवेही ज्या शक्तींच्या विरुद्ध झगडत होते त्या शक्तींच्या सामर्थ्यांचा अंदाज त्यांना नेमका कधीही झाला नाही. आजच्या भारतीय नेत्यांमधील अगदी वरिष्ठ नेते जर सोडले तर इतरांना आपण ज्या शत्रूशी झगडतो आहोत त्या शत्रूच्या सामर्थ्याचा अंदाज, त्याच्या कर्तृत्वाचा अंदाज कधीच आला नाही. आणि त्यातूनच मग नानाविध प्रकारच्या दंतकथा निर्माण झाल्या. चुकीच्या प्रतिमा निर्माण झाल्या. आपल्या मनातील निजामाची चुकीची प्रतिमा काढून टाकावी याचा प्रयत्न मी काल केला आहे.

 आता पुढे जावयाचे म्हणजे निजामाचे हे जे राज्य होते ते सोळा जिल्ह्यांचे होते. ते चोवीस जिल्ह्यांचे झाले पाहिजे हा निजामाचा एक प्रयत्न राहिला; जे सोळा जिल्हे होते त्यांतील आठ जिल्हे तेलुगू भाषिक, पाच जिल्हे मराठी भाषिक आणि तीन जिल्हे कानडी भाषिक होते. पूर्वी जेव्हा निजामाने तैनाती फौजेचा अंमल स्वीकारला होता तेव्हा त्याला रायलसीमेचे दोन जिल्हे सोडून द्यावे लागले होते. हे सर्व पूर्वजांनी केलेले. हे दोन जिल्हे आता आपले आपणाला मिळावे अशी निजामाची मागणी होती, म्हणजे सोळाचे अठरा झाले. अठराशे त्रेपन्नमध्ये रघुजी भोसले यांच्या जहागिरीत जो वाटा मिळाला त्यातील चार जिल्हे ब्रिटिशांसाठी सोडून द्यावे लागले होते. ते परत मिळावे ही निजामाची मागणी होती. म्हणजे अठराचे बावीस झाले. टिपू सुलतानाविरुद्ध जी लढाई झाली त्या लढाईत रास्त वाट्यापेक्षा आपल्याला दोन जिल्हे कमी मिळाले अशा निजामाची तक्रार. तेही दोन जिल्हे आता मिळावे ही निजामाची तिसरी मागणी. म्हणजे बावीसाचे चोवीस झाले. निजामाच्या मागणीचा हा एक टप्पा झाला. हैदराबादला बंदर नाही. तेव्हा बंदर मिळावे हा दुसरा टप्पा. हैदराबाद संस्थान स्वतंत्र असे मानून भारत आणि पाकिस्तान यापेक्षा निराळे असे त्याचे स्वतंत्र राष्ट्र हवे हा तिसरा टप्पा. ही निजामाच्या भूमिकेची एक बाजू झाली.

 हैदराबाद संस्थानचा बराच भाग जहागिरींनी व्यापलेला होता. यातील सर्वांत मोठी जहागीर स्वतः निजामाची वैयक्तिक जहागीर होती. प्रत्येक जिल्ह्यात एक तालुका असे सोळा जिल्ह्यांत निजामाचे सोळा तालुके होते. यांना 'सर्फे खास' म्हणत असत.

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८५