पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

रझवी हे कळसूत्री बाहुले. सूत्रे निजामाच्या हाती. एल. इद्रूस हे निजामाचे सरसेनापती. ते कासिम रझवीला मूर्ख समजत. माईननबाबजंग हे निजामाचे थोर मुत्सद्दी. ते कासिम रझवीला मूर्ख समजत. अलियावरजंग तर रझवीला जवळ बसवून घ्यायलाही तयार नसत. होशियारजंग रझवीला मूर्ख समजत. दीनवारजंग रझवीला मूर्ख समजत. स्वतः निजामसुद्धा रझवीला मूर्खच समजत असे. कासिम रझवी हा व्याख्यान देण्यासाठी चांगला माणूस एवढीच निजामाची भूमिका. पूर्वीचीच अडचण पुन्हा उभी राहात होती की, रझवीला खूप मोठी लोकप्रियता लाभलेली होती; त्यामुळे त्याला वजनही आलेले होते. पण निजामाच्या लेखी तो फक्त एक हत्यार होता आणि हे हत्यार वापरणारे कुशल हात उस्मानअलिखां बहादुर निजाम यांचे होते.

 ज्या वाटाघाटी व्हावयाच्या त्यांच्या दिल्लीच्या टोकाला माऊंटबॅटन असल्याने निजामाने माऊंटबॅटन यांच्या घराण्याशी ज्यांचे अत्यंत निकट संबंध होते अशा सर वॉल्टर मॉक्टनला प्रचंड पैसे देऊन आपल्या बाजूने वाटाघाटी करण्यासाठी बोलविले होते. हेच सर वॉल्टर हैदराबादचे प्रतिनिधी म्हणून दिल्लीला जात. गंमत पाहा. सर वॉल्टर मॉक्टन हे अर्ल ऑफ माऊंटबॅटन यांच्या घराण्याचे इंग्लंडमधील वकील. म्हणजे हिंदुस्थानच्या वतीने जो गव्हर्नर जनरल वाटाघाटीला बसतोय त्याचाच स्वतःचा वकील निजामाच्या बाजूने वाटाघाटीला बसतोय. निजाम इतका धूर्त होता. ही सगळी रचना लक्षात घेतल्याशिवाय हैदराबादच्या राजकारणाच्या खाचाखोचा कळणार नाहीत. या राजकारणाचे सगळे टप्पे नीट पाहायला पाहिजेत. या राजकारणाला क्रमाक्रमाने गती घेत गेलेली आहे. एका टप्प्यामधे सत्तावीस-अठ्ठावीसच्या घटना येतात. पुढच्या टप्प्यावर आपण तीस-बत्तीसपर्यंत येतो. या काळामधे भारताचे धोरण सुद्धा बदलतच असते. आज आपण इथे थांबू. भारताचे बदलते धोरण, हैदराबादच्या राजकारणाची बदलती भूमिका, निजामाची बदलती भूमिका या क्रमाने कशा साकार होत गेल्या या घटनेकडे आपण उद्या जाऊ.

***

(सेलूच्या नूतन महाविद्यालयात दि. ३,४ व ५ जुलै १९७८ या दिवसात भांगडिया व्याख्यानमाला संपन्न झाली. त्याचे शब्दांकन प्रा. प्रकाश कामतीकर व प्रा. कुलकर्णी यांनी केले असून परिष्करण महाकवी कै. आनंद साधले यांनी केलेले आहे.)

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८१