पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विजित केलेला भाग आहे आणि पाकिस्तान ही नुसती कल्पना आहे, हे खरे नव्हे. खरे म्हणजे तीन वेगवेगळी मुसलमान राष्ट्रे आहेत. एक पंजाब, सिंध, वगैरेचा पाकिस्तान. दुसरे बंगाल, ओरिसा, आसाम इत्यादींचे वजिदिस्तान, आणि तिसरे हैदराबादचे उस्मानिस्तान. एकोणीसशे बत्तीस साली गोलमेज परिषद झाली त्या वेळी अखिल भारतीय मुस्लिम लीगने उस्मानिस्तानला मान्यता दिली. चौतीस साली चौधरी रहमतअली यांनी पाकिस्तानसंबंधी पहिली पुस्तिका लिहिली व इंग्लंडमधे वाटली. या पुस्तिकेमध्येही उस्मानिस्तानला मान्यता दिलेली आहे. भारतीय मुस्लिम लीगने हैदराबाद हे विजित राष्ट्र आहे या भूमिकेलाही मान्यता दिलेली आहे. त्यांचे पुढे जाऊन म्हणणे असे की, सार्वभौमता जी आहे ती मुसलमानांची आहे. अधिराज्य आहे ते मुसलमानांचे. निजामाला सार्वभौमता लाभते ती तो मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणून, घटनात्मक सम्राट म्हणून. बहादुर यारजंगने या भूमिकेचा पाठपुरावा केला. ती भूमिका लोकमान्य होऊ लागली. निजामाला ती मान्य नव्हती. त्याच्या मते तो स्वयंभू सार्वभौम होता, मुसलमानांचा प्रतिनिधी म्हणून नव्हे. त्यामुळे बहादुर यारजंगची प्रतिष्ठा वाढू लागली तेव्हा निजामाने त्याला सांगितले की, त्याने इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्षपद सोडावे. बहादुरला सोडायला लावलेले हे अध्यक्षपद नंतर निजामाने अब्दुल हसन सय्यदअली याला दिले. नंतर बहादुर यारजंगला सांगण्यात आले की त्याने यारजंग पदवी परत करावी. त्याने ती पदवी परत केल्यावर संशयास्पद स्थितीत एकोणीसशे त्रेचाळीस साली त्याचा मृत्यू झाला. सर्वसामान्य भूमिका ही आहे की स्वतःला गैरसोईच्या असणाऱ्या माणसाचा खून करविण्यात निजाम पटाईत होता. निजामाची सार्वभौमता स्वयंभू नसून तो मुसलमानांचा घटनात्मक प्रतिनिधी म्हणून ती त्याला लाभलेली आहे. ही भूमिका बहादुर यारजंगनंतर यापुढे कोणी घेतली नाही; ती पुन्हा शेवटच्या दोनतीन महिन्यांत, पोलिस कारवाईच्या आधी कासिम रझवीने घेतली. जर पोलिस कारवाई झाली नसती, जर स्वतंत्र राष्ट्र म्हणून हैदराबाद उरले असते तर मुझाहिदे आझम कासिम रझवी हैदराबादच्या रस्त्यावर कुत्र्याच्या मौतीने मेले असते. कारण सार्वभौमता निजामाची नसून मुसलमानांची आहे हे कबूल करावयास निजाम कधीच तयार नव्हता. पण सबंध इत्तेहादुल मुसलमीनची निर्मिती त्याची आहे. मूळच्या खाकसार संघटनेचे सशस्त्र रझाकार संघटनेत रूपांतर निजामाने केलेले आहे. या संघटनेचे शास्त्रशुद्ध लष्करी शिक्षण निजामाच्या आज्ञेने झालेले आहे. सगळ्या नाड्या निजामाच्या हाती असत. कासिम

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१८०