पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

योजनेस संमती मिळवली. निझामाने नंतर कुरकूर केली, पण वऱ्हाड निझामाच्या हातून निसटला तो निसटलाच. एकीकडे वंगभंगाची योजना राबविणारा कर्झन व दुसरीकडे निझामाच्या विस्तारवादी धोरणाला शह देणारा कर्झन. जर वऱ्हाड निझामाच्या ताब्यात तेव्हा गेला असता तर उत्तरोत्तर निझाम बलवान झाला असताच व पुढे १९४७ ला तो भारत सरकारला मोठी डोकेदुखी ठरला असता. भारताच्या स्वातंत्र्याला फार मोठे ग्रहण लावण्याचे सामर्थ्य त्या सत्तेत आले असते. म्हणून लॉर्ड कर्झनची महत्त्वाची कामगिरी म्हणून ही घटना वेगळ्या संदर्भात, वेगळ्या अर्थाने ध्यानी घ्यावी लागते. सातवा निझाम गादीवर आल्यानंतर पहिल्याप्रथम त्याने सर अली इमामची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली (१९०१). हे इमाम म्हणजे इंग्रजांच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलचे सदस्य. वजनदार असामी. त्यांच्या नेमणुकीमागचा हेतू वऱ्हाड मिळवणे हाच होता. त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन प्रचंड पैसा खर्च केला. त्यांच्या प्रयत्नांचा जो आरंभ झाला तो पुढे पुढे बराच वाढत गेला. त्यातूनच एका सॉलिसिटर कंपनीचे वकील व लॉर्ड माऊंटबॅटन यांचे स्नेही लॉर्ड मॉक्टन निझामाच्या मदतीसाठी आले. ही घटना १९४० पूर्वीची आहे. लंडनच्या कॉवर्डचान्स अँड कंपनीचे ते एक सॉलिसिटर होते व इंग्रज सरकारकडे वऱ्हाडची वकिली करण्यासाठी कंपनीने त्यांची नियुक्ती केली. केवळ या एका कंपनीसाठी निझामाने १९ लाख पौंड खर्च केल्याची नोंद आहे. ह्याच लॉर्ड मॉक्टननी नेहरू, पटेल यांच्या गळी "जैसे थे" करार उतरविला होता, ह्याच काळात निझामाच्या घटनाविषयक खात्यातील अधिकारी नबाब अलियावर जंग यांचा व त्यांचा संबंध आला. पुढे तो १९४० ला जगासमोर दृष्टोत्पत्तीस आला. आरंभी या सगळ्या प्रयत्नांचे सूत्र होते वऱ्हाड मिळवणे. त्या प्रयत्नांचा भाग म्हणजे निझामाने खुद्द बॅ.महंमद अली जिना व जाफरुल्लाखान यांना वार्षिक हजार पौंड मोबदल्यावर दीर्घकाळ नियुक्त केले होते, यच्चयावत ब्रिटिश वृत्तपत्रे, पार्लमेंटचे सभासद तर मदतीला होतेच. सगळा इतिहास येथे सांगण्यास सवड नाही, पण १९०१ ते १९४७ पर्यंत निझामाने वऱ्हाड मिळवण्यासाठी अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा केली. खुद्द ब्रिटिश सम्राटाच्या समोर गाऱ्हाणे पेश झाले. पण इंग्रज सरकार बधले नाही. एकीकडे इंग्रजांशी सहकार्य करायचे, युद्धात मदत करायची व दुसरीकडे आपण भारतातील अन्य संस्थानिकांपेक्षा निराळे आहोत व काही विशेष अधिकार आपणास मिळावे, नव्हे आहेत; अशी भूमिका घ्यायची ही प्रारंभीच्या निझामाची भूमिका १९११ नंतर अधिक स्पष्टपणे दृग्गोचर झालेली दिसते. एकदा तर व्हॉईसरॉय लॉर्ड रीडिंग यांना लिहिलेल्या एका पत्रात आपल्या या भूमिकेचा निझामाने निःसंदिग्ध पुनरुच्चार केला व लॉर्ड रीडिंग