पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नसता. पण जवाहरलाल नेहरूंची भूमिका हैदराबादच्या बाबतीत कठोर होती. कोणत्याही बाबतीत भारताच्या अखंडत्वाला बांधा येईल अशी कोणतीही सवलत हैदराबादच्या राज्यकर्त्यांना द्यायला नेहरू तयार नव्हते. शेवटच्या क्षणी जेव्हा हा प्रश्न हाताळायची दिशा ठरली तेव्हा सरदार पटेलांनी तो दृढपणे हाताळला. हे श्रेय पटेलांचे आहे प्रश्नाचे सर्वांगीण मार्गदर्शन हे गांधी आणि नेहरूंनी केले आहे व शेवटची कार्यवाही पटेलांची आहे. पटेलांचा हात अंमलबजावणीपुरताच आहे. ध्येयवाद, जनतेच्या चळवळीचे रूप हे सर्व गांधी-नेहरूंचे आहे.

 तिसरी बाब म्हणजे हा जो संघर्ष आहे तो कासिम रझवी विरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ असा नाही. त्या वेळी मुसलमानांची जी संघटना होती तिचे नाव इत्तेहादुल मुसलमीन या संस्थेचे नेते होते कासिम रझवी. हे मुळात लातूरचे वकील सय्यद कासिम रझवी. यांना पदवी होती मुझाहिदे आझम - म्हणजे हुतात्म्यांचे सम्राट. हे शिक्षा भोगून संपल्यावर पाकिस्तानमध्ये जाऊन खाटल्यावर मेले. कुठेही हुतात्मा झाले नाहीत. तात्त्विक पातळीवर संघर्ष हा रझवी आणि स्वामीजी यांत नव्हता, तर निजाम मीर उस्मान अली हे हैदराबादचे राजे व महात्मा गांधी हे भारतीय संग्रामाचे नेते यांच्यामध्ये हा सरळ सरळ संघर्ष होता. ही तत्त्वाची बाजू झाली. व्यावहारिक राजकारणाच्या बाजूने हा संघर्ष निजाम मीर उस्मान अली विरुद्ध पंडित नेहरू असा समजावयाचा.

 या ठिकाणीच आपण मीर उस्मान अलीबद्दल असणाऱ्या सर्व चुकीच्या कल्पना बदलून घेणे आवश्यक आहे. आपली अशी कल्पना असते की, शेवटचा निजाम जुनाट मनोवृत्तीचा, धर्मांध, आधुनिक जगाचे भान नसणारा, अत्यंत अफूबाज, अत्यंत द्रव्यलोभी आणि कंजूष होता. हे बरोबर नाही. तो द्रव्यलोभी आणि कंजूष होता ही गोष्ट पुराव्याने खोटी ठरते. तो मागासलेल्या मनोवृत्तीचा होता ही गोष्टही खरी नाही. निजाम हा हैदराबादचे स्वतंत्र राष्ट्रात रूपांतर करून त्या राष्ट्राचा सम्राट होण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेला अतिशय चाणाक्ष, अत्यंत सावध, अत्यंत पाताळयंत्री असा बुद्धिमान सत्ताधीश होता. सत्ताधीश म्हणून अतिशय लायक असताही त्याचा पराभव का झाला? त्याची कारणे दोन, एक म्हणजे हिंदुस्थानचे लष्कर अधिक वरचट होते आणि दुसरे कारण म्हणजे या देशात जवाहरलाल नेहरू नावाचे एक गृहस्थ होते.

 नेहरूंनी स्वतःची अशी प्रतिमा निर्माण केली आहे की, आपण फार साधेभोळे आहोत. आपल्याला फूल आणि मूल यांचीच जास्त आवड आहे. आपण अंतःकरणाने

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१६६