पान:हैदराबाद विमोचन आणि विसर्जन (Hyderabad Vimochan ani Visarjan).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण जेव्हा त्या प्रश्नाचे उत्तर मी दिले तेव्हा ते म्हणाले, मुद्दा बरोबर आहे. माझे उत्तर असे आहे. जून महिन्यात बिंदूंशी बोलताना अगर स्वामीजींशी बोलताना भारतीय नेत्यांच्या डोळ्यांसमोरचा विचार स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे. ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा माऊंट बॅटन गव्हर्नर जनरल राहणार आणि इंग्रज सरसेनापती राहणारच. गव्हर्नर जनरल परत जाणे, भारतीय सरसेनापती पदाधिकार ग्रहण करणे या घटना घडण्यास स्थूलमानाने एक वर्ष लागणार. लष्करी कारवाईशिवाय हैदराबादचा प्रश्न सुटणार नाही. आणि ही कारवाई ब्रिटिश सरसेनापती व गव्हर्नर जनरल म्हणून निघून जाईपावेतो करता येणार नाही. म्हणून ही मंडळी वर्षभराचा वायदा करीत होती. २१ जून १९४८ ला चक्रवर्ती राजगोपालाचारी गव्हर्नर जनरल झाले आणि त्यानंतर तीन महिने संपण्याच्या आत हैदराबादचा प्रश्न संपला.

 माऊंट बॅटन जाण्याच्या पूर्वी सर्व योजना संपलेल्या होत्या. वाटाघाटीही संपलेल्या होत्या. माऊंट बॅटन गेल्यानंतर एका आठवड्याच्या आतच हैदराबाद संस्थानची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली. वाटाघाटी संपलेल्या आहेत आणि आर्थिक नाकेबंदी केली जात आहे या घटनेचा गंभीर अर्थ हैदराबाद शासनाच्या चटकन लक्षात आला. भारत सरकार अतिशय सावधपणे दोन बाबींचा विचार करीत होते. अजून काश्मीरमध्ये युद्धबंदी झालेली नव्हती. काश्मीरमध्ये युद्ध एप्रिल ते जुलै जोरात असे. आणि पुन्हा ऑक्टोबर,नोव्हेंबरमध्ये युद्धाला जोर असे. त्या दृष्टीने हैदराबादवर लष्करी कारवाई ऑगस्ट अगर सप्टेंबर या महिन्यात घेणे सोयीस्कर होते. म्हणून जुलैपासून सप्टेंबरपर्यंत वेळ काढला गेला. दुसरे म्हणजे हैदराबाद भोवताली कडक नाकेवंदी जर केली तर हैदराबादसाठी जगातून दडपण किती येते याचाही शोध भारत सरकारला घ्यायचा होता. नवोदित स्वातंत्र्य मिळविलेले नेते अंगलट येईल असे साहस करण्यास तयार नव्हते. सरदार पटेल खंबीर मनाचे आणि दृढनिश्चयी नेते होते. पण ते सुद्धा बेसावधपणे अगर उतावळेपणाने वागत नसत. जुनागढवर पोलिस अॅक्शन झाली त्यावेळी पाकिस्तानने पुष्कळ कुरकूर केली पण जगातील राष्ट्रांनी त्याकडे लक्ष दिले नाही. हैदराबादबाबतसुद्धा जगातून फार मोठे दडपण येणार नाही याची खात्री करून घेणे आवश्यक होते. जुलै-ऑगस्टमधील नाकेबंदीबाबत ऑस्ट्रोलियाने नापसंती नोंदविलेली दिसते. पण इतर कोणी याबाबत फारसा आक्रोश केलेला नव्हता. भारत सरकारला ही गोष्ट सुद्धा पुरेशी आश्वासक वाटली.

 इंग्रज गेल्याच्या नंतर सुरू झालेली नाकेबंदी आणि सीमेवर जमणाऱ्या फौजा

हैदराबाद-विमोचन आणि विसर्जन /१३४