पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५७

रात्रंदिवस सुरू होतो. हा प्रवाह थेट दक्षिणेकडून यावा, परंतु तसे होत नाहीं. तर नैऋत्य दिशेकडून येतो. ह्याचे कारण, पृथ्वीचे दैनंदिन गतीमुळे विषुववृत्तावरील पदार्थास जास्त जोराची गति आलेली असते, व विषुववृत्ताचे उत्तरेस अगर दक्षिणेस असलेल्या पदार्थांस उत्तरोत्तर कमी कमी गति प्राप्त झालेली असते. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, यामुळे विषुववृत्तावरील वाऱ्यास पूर्वेकडे जाण्याची गति प्राप्त झालेली असते. हा जास्त गतियुक्त वारा उत्तरेस जाऊ लागला म्हणजे तेथे पृथ्वीची गति कमी असल्याकारणाने हे वारे *नैऋत्येकडून आल्यासारखे होतात, व म्हणून यास नैर्ऋत्येकडील नियतकालिक वारा असे म्हणतात.

 जुलै महिन्याचे अखेरीस दक्षिणायन लागते व नंतर क्रमाक्रमाने सूर्य दक्षिणेस जाऊ लागतो. अशा रीतीनें सूर्य बराच दक्षिणेस जाईपावेतों, म्हणजे कर्कवृत्ताचे आसपास असेपावेतों ( सप्टेंबर महिन्याचे तारीख १५ पावेतों ) हे वारे सतत वाहात असतात.

 पहिल्या भागांत सांगितल्याप्रमाणे, हिंदुस्तानचे दक्षिणेस सर्व समुद्र असल्याकारणाने पाण्याचे धर्माप्रमाणे त्याचे बाष्पीभवन सतत होत असते. व त्यांतही हिंदुस्तानचे नजीक म्हणजे उत्तरगोलार्धात उन्हाळा असल्यामुळे हे बाष्पीभवन विशेष जोराने होत असते. ह्यापासून उत्पन्न झालेली वाफ समुद्रावरील हवेत मिसळत

-----

 * ह्या वाऱ्याची गति सर्व देशभर नैऋत्येकडील नसते. डोंगरांच्या रांगा व इतर स्वाभाविक कारणांनी ह्या गतीचा कांहीं कांहीं ठिकाणी बदल होतो.