पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

क्रमांत तरी जास्त काय कळते ? ' उष्णता,' 'विद्युत् ' वगैरे शास्त्रांवरील ग्रंथांत प्रायः मेघ, धुके, दंव वगैरेबद्दल साद्यंत वर्णन असते इतकेच; बाकी हिंदुस्तानचे पावसाळ्याबद्दल माहितीचा अभावच.

 इ०सन १८७६-७७ व १८७७-७८ साली जे लागोपाट बडे दुष्काळ पडले त्या वेळी पाऊस कमी पडण्याची कारणे काय व जंगलांचा आणि पावसाचा कांहीं संबंध आहे की काय ह्याबद्दल वर्तमानपत्रांतून बरीच वाटाघाट झाली. शास्त्रीय पद्धतीने ह्या विषयाची वाटाघाट करणे हा वर्तमानपत्रांचा विषय नव्हता हे उघड आहे. पुढे ह्या दुष्काळांचे संबंधाने चौकशी करण्याकरितां सरकारकडून एक कमिशन नेमण्यांत आले. त्या वेळी मात्र तज्ज्ञ लोकांची मते कमिशनने घेतली. त्यांत सरकारचे हवाखात्याचे रिपोर्टराचा निबंध छापला आहे. हिंदुस्तानांतील पावसाळ्या- संबंधाने पद्धतशीर वर्णन केलेले प्रथमचे वाङ्मय हेंच होय.

 पुढे सन १८८० अगर १८८१ साली, प्रायः वरील निबंधाचेच आधारें कै० प्रो० केरो लक्ष्मण छत्रे यांनी पुणे शहरी हिराबागेमध्ये मराठीत ह्याच विषयावर व्याख्यान दिले. व ते ज्ञानप्रकाशांत छापूनही निघालें होते. हे व्याख्यान फारच मनोरंजक रीतीने दिले होते. हिंदुस्तानचे पावसाळ्याबद्दल मराठींत सविस्तर उपलब्ध माहिती काय ती एवढीच.

 सरकारचे जंगलखात्याचे वाङ्मयांतसुद्धा ह्या विषयासंबंधाने पद्धतशीर माहिती आढळत नाही. जास्त पाऊस पडण्यास जंगले कशी कारणीभूत होतात व त्यांचे रक्षणापासून फायदे कसे होतात यांजबद्दल त्रोटक लेख अनेक आहेत. परंतु ह्या विषयाचे शास्त्रीयरीत्या केलेले विवरण आढळत नाहीं.

 अशा महत्त्वाचे विषयासंबंधाने प्रयासाने मिळविलेली माहिती एकत्र करून तिचे यथामति शास्त्रीय पद्धतीने विवरण करून आपल्या देशबांध- वांस सादर करावे ह्या हेतूने हे पुस्तक रचिलें आहे.

 झाडांची वृद्धि करणे ही गोष्ट आपल्या हिंदुस्तान देशास फारच अव-