पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/4

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



प्रस्तावना.
--------------------

 आजपर्यंत मराठी भाषेत मनोरंजक, ऐतिहासिक व इतर उपयुक्त विषयांवर अनेक ग्रंथ झालेले आहेत. ह्या ग्रंथांनी आपआपली कामें बऱ्याच चांगल्या रीतीने बजाविली असून पुढेही त्यांचा प्रसार व उपयोग व्हावा तसा होत जाण्यास काही अडचण येईलसे दिसत नाही, ही समा- धानाची गोष्ट आहे. परंतु, माझ्या मते, वास्तविक उपयुक्त ग्रंथ म्हटले म्हणजे शास्त्रीय विषयांवरील होत. अशा प्रकारचे व त्यांतूनही सोप्या व मनोरंजक भाषेत लिहिलेले ग्रंथ हे देशाचे उन्नतीस विशेष उपयोगाचे आहेत. परंतु असे ग्रंथ आपल्या भाषेत फारच थोडे झाले आहेत. हा विषय रुक्ष असल्यामुळे असल्या ग्रंथांपासून अर्थात् मनोरंजन होत नाहीं, म्हणून हे ग्रंथ वाचण्याची बहुतकरून कोणास गोडी वाटत नाही. आणि असल्या ग्रंथांचा खप सहजच कमी असल्यामुळे, ह्या विजयावर नवीन ग्रंथ रचणारास मिळावे तसे उत्तेजन मिळत नाही.

 शास्त्रीय ग्रंथांचे वाचनाने मनास बिलकुल आनंद होत नाही असे मात्र नाही. उलट अशी गोष्ट आहे की, ह्या विषयाची एकदां गोडी मात्र लागली पाहिजे, म्हणजे ह्याच्या अध्ययनानें मनास इतका आनंद होतो कीं, त्या पुढे इतर मनोरंजक विषयांवरील ग्रंथांच्या वाचनापासून होणारा आनंद कांहींच नाही. मात्र ह्या विषयांत शिरकाव होण्याला प्रथमारंभी वाचकाला यावरील सोप्या व मनोरंजक भाषेत लिहिलेल्या ग्रंथांचे साहाय्य मिळाले पाहिजे.

 ज्या एकाद्या गोष्टीचे कारण आपणांस बहुत दिवस समजत नव्हतें, त्या गोष्टीचे कारण आपणांस एकाएकीं समजलें तर किती आनंद होतो!