पान:हिदुस्थानातील पाऊस व झाडे.pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आणि ज्या गोष्टी प्रथम दर्शनी अगदी विसदृश दिसतात, त्या एकाच कारणाचे परिणाम आहेत असे समजल्यावर मनास किती आनंद होतो व किती आश्चर्य वाटते, ह्याचा पुष्कळांस अनुभव असेल.

 शास्त्रीय विषय समजून घेण्याची गोडी लहानपणापासून मुलांस लाविली पाहिजे. ही गोडी मोठेपणी लागण्याचा संभव फार कमी. आपल्या सभों- वतीं नित्य जे अनेक सृष्टव्यापार चाललेले असतात, त्यांचे स्वरूप व कारणे काय आहेत हे जाणण्याची इच्छा, मुलांस कळू लागल्यापासून स्वभावतःच उत्पन्न होते. "पाऊस कां पडतो," " विजा कां चमकतात,?" " गडगडते हे काय," तसेच "चंद्र काय आहे," "सूर्य काय आहे?" वगैरे प्रश्न लहान मुलें करतांना सर्वांनी ऐकलेच असेल. मुलांची ही जिज्ञासा योग्य उत्तरे देऊन तृप्त करणे हे आपले कर्तव्य आहे. परंतु अशा प्रकारचे प्रश्न विचारले असता, त्रासून जाऊन त्यांजवर रागावणे व या रीतीने त्यांची जिज्ञासा कुंठित करणे ह्यासारखी अनिष्टकारक दुसरी कोणतीच गोष्ट नसेल. कित्येक गोष्टींची कारणे मुलांस समजावून देणे हे आपल्या शक्ती- बाहेर असते हे खरे, परंतु अशा वेळीं न रागावतां त्यांस समाधान वाटेल अशी तांत्रिक माहिती सांगणे श्रेयस्कर आहे. प्रश्न तसाच कठीण अस- ल्यास पुढे उत्तर देण्याचे आश्वासन द्यावें; परंतु त्यांची जिज्ञासा कुंठित करू नये, असे केले असतां, त्यांच्या बुद्धीचा विकास होण्याचा योग्य पाया घातला असे होईल.

 अशा रीतीने पदार्थविज्ञानशास्त्राचा पाया देशामध्ये रोंवला गेला म्हणजे त्यापासून फारच हित होण्याचा संभव आहे. ह्याच शास्त्राचे अभ्यासाने युरोपखंडांतील लोकांची प्रगति झाली आहे. आगगाड्या, तारायंत्रं, आगबोटी वगैरे अनेक तऱ्हेचे शोध, ज्यांपासून मनुष्यमात्राचे सुखांत अनंतपट भर पडली आहे, हे सर्व अर्वाचीन शास्त्रांचे परिणाम होत.