पान:हिंन्दू सम्राट्.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सम्राट पृथ्वीराज चौहान.

(६१)

दैवाने या वेळीं त्याला हात दिला नाही ! तो घायाळ होऊन शत्रूचे हातीं सापडला व रजपुतांचा पराभव झाला. ह्या युद्धांत पुढे पृथ्वीराजाचा अंत कसा झाला, ह्याविषयी अद्याप बराच मतभेद आहे. ह्यानंतर दिल्लीला मुसलमानी तक्ताची स्थापना झाली, हे सांगावयास नकोच.

 ह्या शेवटच्या युद्धामुळे त्याच्या योग्यतेला कमीपणा येऊं शकत नाही. ( यश किंवा अपयश हे सर्वस्वी कोणाच्याही स्वाधीन नसतें.) ह्या विधानाच्या सिद्धतेसाठी पृथ्वीराजाबरोबर दिल्ली येथील पुढच्या मुसलमान राज्यकर्त्यांची देशरक्षणाच्या पात्रतेसंबंधी तुलना करून पाहूं-

१. गुलाम घराण्यांतील अल्तमशापासून वायव्य सीमेवर मोंगल लोकांच्या स्वान्यांना सुरुवात झाली. अल्तमश याच्या नंतरच्या राजांना त्यांनी पुरेसें केलें.
२. महंमद तघलघाने तर त्यांना पुष्कळ द्रव्य देऊन आपल्या राज्याचा बचाव करण्याचा यत्न केला.
३. तैमूरलंगाच्या स्वारीच्या प्रसंगी दिल्लीचा सुलतान राजधानी मोकळी टाकून गुजरात पळून गेला आणि दिल्लीतील निरपराध प्रजेची कत्तल झाली !
.४. इराणच्या नादिरशहाने मोंगल बादशहाला कैद केलें, भयंकर लूट व कत्तल केली, ती थांबविण्यासाठी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे नादिरशहापुढे त्याला हात बांधून दयेची याचना करावी लागली !

 ह्या सर्व ऐतिहासिक घटना लक्ष्यांत घेतल्या तर पृथ्वीराजाने व त्याच्या रजपुतांनी महंमद घोरीशीं घेतलेली झुंज अत्यंत अभिमानास्पद होती, असेच म्हणावे लागेल ! लागोपाठच्या ह्या दोन युद्धांतील जयापजय हे पृथ्वीराजाच्या भाग्यरवीचे मध्यान्ह आणि अस्त होत !
 पृथ्वीराजाचे पश्चात् त्याचा मुलगा 'रेणसी' ह्याजकडे महंमद घोरीने