पान:हिंन्दू सम्राट्.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


लेखकाचे निवेदन

 सुमारे तीन वर्षांपूर्वी 'भारत के हिंदु समाट' या नांवाचा हिंदी भाषेतील एक ऐतिहासिक ग्रन्थ एके ठिकाणी वाचावयास मिळाला, त्यांतील माहिती उपयुक्त असल्यामुळे आणि मला इतिहासविषयाची आवड असल्यामुळे मुख्य मुख्य गोष्टींचे टांचण काढून ठेवले. नंतर त्या पुस्तकांत वर्णिलेल्या चंद्रगुप्त, हर्ष इत्यादि सम्राटांप्रमाणे दक्षिणेतील अर्वाचीन राजांचीही माहिती मिळवावी, म्हणून पाहूं लागलो. इतक्यांत सुदैवाने 'विजयनगर' येथील साम्राज्याविषयी (षट्शताब्दि ) महोत्सवाच्या निमित्ताने वृत्तपत्रांतून थोडथोडी माहिती येऊ लागली व पुढे 'विजयनगरस्मारक ग्रन्थ ' ही प्रसिद्ध झाला. त्याच सुमारास ' राष्ट्रकूटांचा इतिहास ' ही हाती आला. अशा काही पुस्तकांचे आधाराने 'पुरुषार्थ' मासिकामध्ये 'हिंदुस्थानचे हिंदु सम्राट् ' ह्या शीर्षकाखाली एक लेखमाला गत वर्षी लिहिली. ती पुष्कळ वाचकांना पसंत पडल्यावरून त्यामध्ये आणखी बरीच भर घालून हे पुस्तक आज लिहीत आहे.

 इतिहासलेखनासंबंधी असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की, देशांतील नागरिकांच्या गतकालीन स्थितीच्या वर्णनाला त्या देशाचा इतिहास म्हणावे की त्या देशावर चढाई करून राज्य करणाऱ्या परकी लोकांच्या वर्णनाला त्या देशाचा इतिहास म्हणावें ? अर्थात् आपल्या देशाच्या बाबतींत विचार केला तर कोणीही मान्य करील की, ज्या वेळी हे परकीय लोक 'हिंद भूमीला ' मातृभूमि समजून आणि ह्या देशांतील बहुजनसमाजाच्या सुखदुःखांशी एकरूप होऊन जिव्हाळ्याने राष्ट्राची सेवा करूं लागतील, त्याच वेळी त्यांचे कर्तृत्व, बुद्धिमत्ता आणि वैभव आमच्या राष्ट्रीय इतिहासांत जमा करणे न्यायाचे होईल ! अशा तऱ्हेचे उदाहरण द्यावयाचे झाले, तर 'जायसी,' 'कबीर, ' किंवा 'दादाभाई नौरोजी' अशा थोर