पान:हिंन्दू सम्राट्.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छत्रपति शिवाजी महाराज.

(८१)

 छत्रपति शिवाजी हा हिंदुस्थानांतच नव्हे, तर सर्व जगांत एक लोको- त्तर पुरुष होऊन गेला ! इतिहासाचार्य कै० राजवाडे म्हणतात-

 'शिवाजीची योग्यता स्वयंसिद्ध आहे. त्याच्याशी तुलना करावयाची झाली, तर स्वदेशाला स्वातन्त्र्य मिळवून देणाऱ्या जॉर्ज वॉशिंग्टन् किंवा किंवा हॉलंडचा 'पहिला विल्यम्' अशा राष्ट्रपुरुषांशीं करावी लागेल. जगज्जेता 'अलेक्झँडर दि ग्रेट' प्रमाणे शिवाजीने जिंकलेल्या शहरांतील अमोलिक ग्रंथसंग्रह जाळले नाहीत किंवा आपल्या स्नेह्यांना मारिलें नाही, ज्यूलियस सीझरप्रमाणे धर्मपत्नीला निराधार सोडले नाही, नेपोलियनप्रमाणे राक्षसी महत्वाकांक्षेने इतर राष्ट्रांचे स्वातन्त्र्य हरण केले नाही. नेपोलियनपेक्षा शिवाजीचं खाजगी वर्तन पवित्र होतें. क्रॉम्बेलप्रमाणे एखाद्या प्रांतांतील लोकांची निष्ठुरपणे कत्तल उडविली नाही ! बाबर बादशहाप्रमाणे तो शूर व कंटक होता. अकबराप्रमाणे त्याने व्यवस्थित राज्यकारभार केला. औरंगजेब बादशहाची उद्योगशीलता “त्याचे अंगीं असून औरंगजेबाचें कपट, क्रूरता, विश्वासघात, परधर्माविषयी असहिष्णुता इत्यादि दुर्गुण शिवाजीमध्ये नव्हते !"

 शिवाजीचें चरित्र मराठी वाचकांच्या परिचयाचे असल्यामुळे येथे विस्ताराने दिले नाही. मात्र त्याच्या चरित्रांतील वैशिष्ट्य आणि प्राप्त झालेल्या अपूर्व यशाचे रहस्य स्पष्ट कळण्यासाठी मी यथाशक्ति सारांश- रूपाने थोडी चर्चा करीत आहे.

 शिवाजी जन्माला येण्यापूर्वी तीनशे वर्षे महाराष्ट्रांत मुसलमानी सत्ता चालत होती. त्या अमदानीमध्ये हिंदु प्रजेला कोणत्या स्थितींत दिवस कंठावे लागत होते, ह्याविषयी साधु एकनाथ म्हणतात-

गाई ब्राह्मणांसी जाण । पीडा करिती दारुण ||
क्षेत्र वित्तदाराहरण | स्वार्थी प्राण घेताती ॥१॥