पान:हिंदुसमाज संघटना आणि विघटना.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६ : प्रस्तावना

चालू आहेत. त्यांतील एक प्रवाह समाजाला उपकारक, त्याच्या कर्तृत्वाला पोषक आणि सर्व प्रकारे तेज, प्रज्ञा, बुद्धी, पराक्रम यांना संवर्धक असा असून दुसरा सर्व दृष्टींनी समाजविघातक, अपकारक व अधोगामी असा आहे. बुद्धिप्रामाण्य, परिवर्तनीयता, प्रवृत्तिवाद, समता, गुणनिष्ठ चातुर्वर्ण्य, राजधर्माचे श्रेष्ठत्व, समसंधी, समाजनिष्ठा, सहकार्य, पतितशुद्धी ही पहिल्या धर्माची तत्त्वे असून शब्दप्रामाण्य, अदृष्टप्रधानता, समन्वयपद्धती, अपरिवर्तनीयता, निवृत्ती, विषमता, जन्मनिष्ठ जातिभेद, कलियुगकल्पना, वैयक्तिकता, समाजविमुखता, रूढ़िवाद ही जे उत्तरकालीन निबंधकार शास्त्री पंडित त्यांच्या धर्माची तत्त्वे आहेत. इ. स. च्या दहाव्या शतकापर्यंत पहिल्या प्रवाहाचा, त्या विचारसरणीचा जनमनावर प्रभाव होता म्हणून त्या वेळेपर्यंतचा भारताचा इतिहास हा अत्यंत तेजस्वी व अभिमानास्पद असा झाला. दहाव्या शतकाच्या सुमारास त्या प्राचीन सनातन धर्माला अवकळा आली. त्या काळचे व नंतरचे धर्मशास्त्रकार हे अगदी मूढ़, अविवेकी व दृष्टिशून्य असे होते. त्यांनी जे धर्मशास्त्र सांगितले त्यामुळेच ही अवकळा आली आणि त्यामुळेच या भूमीलाही अवकळा आली.
 अनेक संशोधक, इतिहासवेत्ते व धर्मशास्त्रवेत्ते यांच्या आधारे हा विषय या प्रबंधाच्या पहिल्या चार प्रकरणांत मांडला आहे. पुढल्या चार प्रकरणांत आपल्या अर्वाचीन इतिहासाची मीमांसा याच दृष्टीने केली आहे. सर्व प्रकारे धर्म अधोगामी झाला असताना विजयनगरचे सम्राट व मराठे यांना हिंदुधर्म व हिंदुसंस्कृती यांचे रक्षण कसे करता आले असा प्रश्न उद्भवतो. त्यांनी काही अंशी तरी धर्मक्रान्ती केली, प्राचीन धर्मातील काही उत्कर्षकारक तत्त्वांचा अवलंब केला म्हणून त्यांना यश आले, असे त्या प्रश्नाचे उत्तर आहे. रजपूत व शीख यांच्या इतिहासाचा हाच सारार्थ आहे. या चार पराक्रमी लोकांच्या इतिहासाचा हा निष्कर्ष पाच ते सात या प्रकरणांत मांडला आहे. शेवटच्या आठव्या प्रकरणात गेल्या शंभरसवाशे वर्षांतील भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा याच दृष्टिकोणातून विचार केला आहे. या काळात या भूमीत अपूर्व अशी धर्मक्रान्ती झाली आणि बुद्धिप्रामाण्य, प्रवृत्तिवाद, समता, गुणनिष्ठा, समसंधी या प्राचीन धर्मतत्त्वांचा येथल्या धुरीणांनी अवलंब केला. यामुळेच भारतीय समाजाला स्वातंत्र्यलढा जिंकण्याइतके सामर्थ्यं प्राप्त झाले, हे अनेक इतिहास पंडितांच्या आधारे या प्रकरणात सिद्ध केले आहे. हेच उन्नतिकारक